Advertisement

खुशखबर! मध्य रेल्वेवर येत्या वर्षभरात टॉकबॅक, सीसीटीव्ही आणि बरंच काही!

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी प्रशासनाने खूशखबर दिली आहे. पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरील प्रवाशांनाही लवकरच नव्या आणि अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत.

खुशखबर! मध्य रेल्वेवर येत्या वर्षभरात टॉकबॅक, सीसीटीव्ही आणि बरंच काही!
SHARES

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी प्रशासनाने खूशखबर दिली आहे. पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरील प्रवाशांनाही लवकरच नव्या आणि अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. मध्य रेल्वेवर धावणाऱ्या प्रत्येक लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यानुसार, मध्य रेल्वेवरील एकूण १५५ रेकमध्ये ११ हजार १६൦ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका रेकमध्ये ७२ सीसीटीव्ही असे एकूण ११ हजार १६൦ सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.


२७६ कोटींची तरतूद

सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणेचा समावेश असलेल्या २७६ कोटींचा प्रस्ताव बुधवारी बोर्डाने मंजूर केला. त्यानुसार, २०१८ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी दिली. तसंच, मध्य रेल्वेवर दररोज रखडणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक सुरळीत करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.


प्रत्येक महिला कोचमध्ये टॉकबॅक यंत्रणा

प्रत्येक महिला कोचमध्ये ४ टॉकबॅक यंत्रणा बसवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अशा एकूण ११०६ टॉकबॅक यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणांचं काम एकाच वेळी पूर्ण होईल, असंही डीआरएम यांनी सांगितलं आहे. टॉकबॅक यंत्रणेमुळे महिला प्रवाशांवर आपत्कालीन परिस्थितीत गार्ड अथवा मोटारमनसोबत संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे, संकटात असणाऱ्या महिला प्रवाशांना तातडीने मदत मिळणं शक्य होणार आहे.


हार्बर, ट्रान्सहार्बरवर ३१ जानेवारीपर्यंत २४ सेवा वाढणार

मध्य रेल्वेवर १५५ रेकच्या माध्यमातून तिन्ही मार्गांवर रोज एकूण १७०६ फे-या होतात. यात, मुख्य मार्गावर ८५६ फे-या, हार्बर मार्गावर ६०४ फे-या आणि ट्रान्स हार्बरवर २४६ फे-यांचा समावेश आहे. शिवाय, ३१ जानेवारीपर्यंत २४ नव्या सेवा हार्बर आणि ट्रान्सहार्बरवर धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली आहे.


२०१८ च्या शेवटपर्यंत कामे करण्याची डेडलाईन

२०१८ मध्ये पादचारी पूल, लिफ्ट, सरकते जिने यांसह ३६ प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी डिसेंबर २०१८ची डेडलाईन देण्यात आली आहे. शिवाय, वर्षाच्या अखेरपर्यंत किमान एक एस्कलेटर अर्थात सरकता जिना प्रत्येक स्टेशनवर बसवण्यात येणार आहे. उपनगरातील प्रत्येक स्टेशनवर ३१ मार्चपर्यंत एकूण ५२ सरकते जिने कार्यान्वित होतील.


३६ किमी लांबीची भिंत बांधणार

अपघात रोखण्यासाठी रेल्वे रुळांशेजारी ३६ किमी लांबीची भिंत उभारण्यात येणार आहे. ज्यामुळे अपघात रोखण्यासाठी मदत होईल. एप्रिल २०१८ पर्यंत १४ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकिय कक्ष उभारण्यात येतील. तसंच, ३०० नवीन टाईम इंडिकेटर बसवण्यात येणार आहेत. शिवाय, २५ पादचारी पुलांचं काम २൦१८ मध्ये पूर्ण करायचं आहे, असंही डीआरएम यांनी सांगितलं.



हेही वाचा

पश्चिम रेल्वे अत्याधुनिक सीसीटीव्हीच्या निगराणीखाली


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा