Advertisement

'मरे' पावसाळ्यासाठी सज्ज


'मरे' पावसाळ्यासाठी सज्ज
SHARES

यंदा पावसाळ्यात मध्य रेल्वे प्रभावित होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने चंग बांधला आहे. पावसाळ्याची पूर्व तयारी म्हणून रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईला मध्य रेल्वेने सुरुवात केली आहे. मुंबईत पाऊस पडल्यावर मध्य रेल्वेतील सखल भागात पाणी साचते आणि त्याचा परिणाम रेल्वेवर होतो. हे टाळण्यासाठी मध्य रेल्वेने पावसापूर्वी आपली यंत्रणा सज्ज केली आहे.

पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सखल भागांत अगदी काही क्षणांत पाणी साचते. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन मध्य रेल्वे विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेच्या रुळांवर 950 ठिकाणी डिजिटल एम इंडिकेटर बसवण्यात आले आहेत. जेणेकरून सिग्नल यंत्रणेतील बिघाड टाळता येईल. तसेच पाणी साचणाऱ्या मस्जिद, सायन, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नानीपाडा, ठाणे, मुंब्रा, डोंबिवली या मुख्य मार्गांवर तसेच शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, टिळक नगर, चेंबूर या 20 ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील रेल्वेच्या हद्दीतील 90 हजार मीटरपर्यंत नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे. तसेच भूमिगत 76 नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. रेल्वेच्या आजूबाजूच्या परिसरातील धोकादायक दरडी पावसात कोसळू नये यासाठी सुमारे 604 ठिकाणे जाळ्यांनी सुरक्षित करण्यात आली असून, तेथील धोकादायक दरडी काढण्यात आल्या आहेत.

रेल्वेच्या मोटारमन गार्डसाठी सूचनावली पुस्तिका -

पावसात येणाऱ्या भरती ओहोटी आणि वातावरणाची माहिती रेल्वेच्या मोटारमन, गार्ड आणि इतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मिळावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणारी पुस्तिका रेल्वेने प्रकाशित केली आहे. तसेच पावसाळ्यात एखादा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे सात दिवस चालणारे नियंत्रण कक्ष पावसाळ्यासाठी खास तयार करण्यात आले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा