मेट्रो-3 साठी मुख्यमंत्र्यांची पुन्हा रात्रपाळी !

 Bandra
मेट्रो-3 साठी मुख्यमंत्र्यांची पुन्हा रात्रपाळी !
Bandra, Mumbai  -  

गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या प्रोजेक्ट साईटवर भेट द्यायचा धडाका लावला आहे. सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी सीप्झ ते कुलाबा मेट्रोची पाहणी केली होती. आता मंगळवारी मध्यरात्रीही त्यांनी वडाळा आणि वांद्रे पश्चिममधील मेट्रो कारशेडला भेट दिली. विशेष म्हणजे ही भेट मुख्यमंत्री दिवसाच्या कोणत्याही वेळी करत नसून मध्यरात्री करत आहेत. त्यामुळे हा सगळा प्रकार नक्की आहे तरी काय याविषयी राजकीय जाणकार आणि सामान्य मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंगळवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 7 च्या कामाची पठाणवाडी, मालाड येथे जाऊन पाहणी केली. तसेच मेट्रो 2 A च्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री रात्रीच डी एन नगर, अंधेरी आणि आईसी कॉलनी, बोरिवली येथे दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच मेट्रो-7च्या कामासाठी यू ग्राइंडर लावण्यात आले. यावेळी कामाची पाहणी करतानाच मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बसमधून प्रवासही केला.

मागील दोन दिवसांपासून आम्ही मेट्रोच्या कामाची पाहणी करत आहे. मुंबईसारख्या ठिकाणी काम करणे अवघड आहे. त्यामुळे मेट्रोची कामे आपण प्री कास्ट करत आहोत. मुंबईत जितक्या जलद गतीने मेट्रोचं काम सुरु आहे, तेवढं देशात कुठेही नाही. मेट्रोच्या मुंबईतल्या या नेटवर्कमुळेच 90 लाख प्रवासी चांगल्या प्रकारे प्रवास करू शकतात 

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मेट्रो 2 A साठी 6410 कोटी रुपये इतका निधी लागणार आहे, तर हा मार्ग 18.6 किमीपर्यंत असणार आहे. एकूण 17 स्टेशन्स या मेट्रो रुळावर असणार आहेत. मेट्रो 7 साठी 6208 कोटींचा खर्च येणार आहे. यासाठी 16.5 किमीचे मेट्रो ट्रॅक असणार आहेत. आणि या मार्गावर एकूण 16 मेट्रो स्टेशन्स बनवले जाणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लागोपाठ दोन दिवस मेट्रोच्या कामाच्या पाहणीसाठी रात्री दौरे केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांनी नेमका रात्रीचा मुहूर्त का निवडला? याविषयीही आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Loading Comments