Advertisement

'या' कारणांमुळे बेस्ट उपक्रम तोट्यात

काही वर्षांपूर्वी ५५ लाख प्रवासी असलेल्या बेस्ट उपक्रमाकडे सद्यस्थितीत २८ लाख प्रवासी आहेत. यामुळे बेस्टचं उत्पन्न प्रचंड घटलं आहे. याशिवाय बेस्टला नेमका कुठल्या कारणांमुळे तोटा होत आहे आणि तोटा भरून काढण्यासाठी कुठले उपक्रम यशस्वीपणे राबवता येतील, यावर मंगळवारी झालेल्या बेस्टच्या अर्थसंकल्पीय बैठकीत चर्चा करण्यात आली.

'या' कारणांमुळे बेस्ट उपक्रम तोट्यात
SHARES

एकेकाळी मुंबईची लाइफलाइन अशी ओळख मिरवणारा बेस्ट उपक्रम सध्या तोट्यात आहे. यामुळे बेस्ट प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे. काही वर्षांपूर्वी ५५ लाख प्रवासी असलेल्या बेस्ट उपक्रमाकडे सद्यस्थितीत २८ लाख प्रवासी आहेत. यामुळे बेस्टचं उत्पन्न प्रचंड घटलं आहे. याशिवाय बेस्टला नेमका कुठल्या कारणांमुळे तोटा होत आहे आणि तोटा भरून काढण्यासाठी कुठले उपक्रम यशस्वीपणे राबवता येतील, यावर मंगळवारी झालेल्या बेस्टच्या अर्थसंकल्पीय बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत बेस्ट समिती सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी बेस्टच्या होणाऱ्या तोट्या बद्दल काही मुद्दे मांडले. बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी या मुद्द्यांची दखल त्रुटी दूर करण्याबाबत उपाययोजनांवर चर्चा केली.


ट्रायमॅक्स मशिनचा गोंधळ

बेस्टला आधुनिक करण्यासाठी तिकीट काढण्याकरीता ट्रायमॅक्स मशिनचा वापर सुरू झाला. पण या मशिन अनेकदा मध्येच बंद पडत असल्याने कर्मचारी आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन कर्मचाऱ्यांना ट्रायमॅक्स मशिन घेण्यासाठी आगारात १-१ तास रांगेत उभे रहावं लागतं. मशिन न मिळाल्यास कर्मचारी सुट्टी घेतात. यामुळे बेस्टला तोटा होतो, असं कवठणकर म्हणाले.


फेरीवाल्यांची अडचण

सद्यस्थितीत रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले दिसत नसले, तरी इतर ठिकाणच्या फेरीवाल्यांचा मोठा त्रास बस चालकाला सहन करावा लागतो. फेरीवाल्यांनी बहुतांश महत्त्वाचे रस्ते अडवल्याने बेस्ट अत्यंत धिम्या गतीने चालवावी लागते किंवा स्थानकाबाहेर बस बऱ्याचकाळ उभ्या राहतात. परिणामी बेस्टचे प्रवासी रिक्षा, टॅक्सी अशा इतर पर्यायांचा मार्ग धरतात.



मेट्रो कामाने खर्च वाढला

मेट्रोच्या कामांमुळे बेस्टच्या बसला मुंबईत अनेक वळसा घालून पुढे जावं लागतं. यांत इंधन देखील जास्त वापरलं जाते. परिणामी इंधनाचा अतिरिक्त खर्च मेट्रोकडून वसूल करण्याची मागणीही चर्चेत करण्यात आली.


अनधिकृत वाहने

अनधिकृत वाहनांमुळे बेस्टला मोठा फटका बसत आहे. काही खासगी कंपन्याच्या गाड्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोडायला स्टेशनला येतात. पण परत जाताना ते बेस्टच्या प्रवाशांना घेऊन जातात. अशा अनधिकृत वाहनांवर बेस्टने कारवाई केली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली.


किमान ५ प्रवासी आणा

बेस्ट उपक्रमातील प्रत्येक बस चालकाने किमान ५ प्रवासी बसमध्ये आणावेत, जेणेकरुन तोटा भरुन निघण्यास मदत होईल. बेस्ट वाचवायची असेल तर त्यात सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचंही यावेळी कवठणकर यांनी सांगितलं.


ग्रॅज्युइटी लवकर द्या

कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर ग्रॅज्युइटीची रक्कम द्या. ती न दिल्यामुळे बेस्टवर मोठं संकट येणार असल्याचंही ते म्हणाले. बेस्टचे २ कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याने न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत न्यायलयाने देखील ग्रॅज्युइटी १० टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश बेस्टला दिले आहेत. हे आदेश न पाळल्यास बेस्टला आणखी तोटा होऊ शकेल, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.



हेही वाचा-

भाडेवाढीचा 'बेस्ट'ला फायदा, ५०४ कोटींची तूट झाली कमी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा