Advertisement

माथेरानमध्ये आता धावणार ई-रिक्षा

माथेरान इथं पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आता ई-रिक्षातून प्रवास करता येणार आहे.

माथेरानमध्ये आता धावणार ई-रिक्षा
SHARES

माथेरान इथं पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आता ई-रिक्षातून प्रवास करता येणार आहे. माथेरान सनियंत्रण समितीने माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे नगरविकास खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण तज्ज्ञांनीदेखील याला सहमती दिल्याने ई रिक्षासाठी माथेरानमार्ग खुला होणार आहे.

शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या अमानवीय प्रथेतील हातरिक्षाच्या जोखडातून माथेरानमधील तरुणांची आता लवकरच सुटका होणार आहे. ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली मानद सचिव रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह नऊ सदस्यीय सनियंत्रण समितीची बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत पथदर्शी प्रकल्प म्हणून ई रिक्षा सुरू करण्याचा निर्णय झाला. ३ वेगवेगळ्या मॉडेलच्या ई-रिक्षा ३ महिन्यांसाठी चालवण्यात येणार आहेत.

ई रिक्षाच्या पथदर्शी प्रकल्पाला पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राकेश कुमार, डेव्हिड कार्डोझ, नगरविकास खात्याचे सचिव भूषण गगराणी, महेश पाठक, पर्यावरण उपसचिव जॉय ठाकूर, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रतीक भरणे यांनीदेखील सहमती दर्शवली आहे.

माथेरान हे प्रदूषणमुक्त राहावं यासाठी इथं वाहनांना बंदी आहे. याचा मोठा फटका स्थानिक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती व महिलांना बसतो. त्यांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागते.

हातरिक्षा व घोड्यांचा वापर अंतर्गत वाहतुकीसाठी केला जातो. शिवाय हातरिक्षा ही अमानवीय प्रथा आहे. देशातील इतर भागांतून हातरिक्षा केव्हाच हद्दपार झाल्या असल्या तरी माथेरानमध्ये त्या सुरूच आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा