Advertisement

वडाळा स्थानकातील चिकित्सा कक्ष बंद


वडाळा स्थानकातील चिकित्सा कक्ष बंद
SHARES

हार्बर मार्गावरील वडाळा रोड स्थानकात प्रवाशांना तत्काळ उपचार मिळावेत, या उद्देशाने आठ महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेले संजीवनी मेडिकल सेंटर आणि नर्सिंग होमचे आकस्मिक चिकित्सा कक्ष आकस्मितपणे बंद झाले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून रेल्वेने उभारलेले हे कक्ष प्रवाशांसाठी अडचण ठरत आहे.

वडाळा रोड स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर,17 ऑगस्ट 2016 रोजी प्रवाशांच्या सोयीसाठी चिकित्सा कक्ष रेल्वेच्या वतीने भाडे तत्वावर संजीवनी सेंटर आणि नर्सिंग होम यांना चालविण्यासाठी देण्यात आले. यात 5 डॉक्टर आणि स्त्री मदतनीस प्रवासी रुग्णांच्या सेवेसाठी या कक्षात उपलब्ध होते. प्रवाशांना प्राथमिक उपचाराबरोबर, सर्व प्रकारची रक्त तपासणी, इसीजी, औषधे, तात्काळ रक्त तपासणी, संपूर्ण आरोग्य तपासणी, गर्भवती स्त्रियांसाठी तपासणी आदी तापसण्या अल्पदरात उपलब्ध होत्या. मात्र येथे औषधोपचार घेण्यासाठी येणाऱ्या प्रवासी रुग्णांची संख्या कमी असल्याने या चिकित्सालयाचे दिवसेंदिवस नुकसान होऊ लागले होते. त्यात या कक्षाचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार या सर्व गोष्टी अवाक्याबाहेर जात असल्याने 1 फेब्रुवारी 2017 रोजी सदरील चिकित्सा कक्ष अखेर बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले हे कक्ष बिनकामाचे ठरत असून, फलाट क्रमांक 1 वरील जागा या कक्षाने व्यापल्यामुळे प्रवाशांना येथून प्रवास करताना अडचण होत आहे.

एखाद्या प्रवाशास अत्यावश्यक सेवेची गरज लागल्यास त्याला येथील सेंटरमध्ये उपचार घेऊन लाभ घेता येतील या उद्देशाने सदरील चिकित्सालय सुरू करण्यात आले. परंतु काही कारणास्तव गेल्या दोन महिन्यांपासून हे बंद आहे. लवकरच हे कक्ष दुसऱ्या एखाद्या सेंटरला हस्तांतरीत करण्यात येणार आहे 

- व्ही. जॉन, वडाळा रोड स्टेशन उपप्रबंधक

वडाळा रोड स्थानकातून हार्बर आणि पश्चिम मार्गवरील लोकल धावत असल्याने या स्थानकात सकाळी आणि सायंकाळी प्रचंड गर्दी असते. त्यात फलाट क्रमांक 1 वरील सीएसटी दिशेच्या महिला डब्याजवळ हे चिकित्सालय असल्याने फलाटावरील जागा अपुरी झाली असून, चालताना आणि लोकलमध्ये चढताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो 

-  कविता पाटकर, प्रवासी

गेल्या कित्येक दिवसांपासून हे केंद्र बंद आहे. जर हे केंद्र बंदच ठेवायचे होते तर उगाचच स्थानकात उभारले कशाला? प्रवाशांना तात्काळ सेवा मिळावी यासाठी प्रत्येक स्थानकात अत्यावश्यक केंद्रांची गरज आहे. पण ही केंद्रं कायम सुरू राहतील यासाठी रेल्वेने प्रयत्न केले पाहिजेत. तर स्थानकात केंद्रं हवेत याचा अर्थ ते फलाटावर बांधावेत असा नव्हे. योग्य जागा पाहून ते रेल्वेने उभारावेत, जेणेकरून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही 

- अभिजीत धुरत, अध्यक्ष, नवी मुंबई रेल्वे वेल्फेअर असोसिएशन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा