Advertisement

'या' रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सेवेत सुविधांयुक्त प्रतीक्षालयं

सीएसएमटीप्रमाणेच याही रेल्वे स्थानकांवर सर्व सुविधायुक्त असे प्रतीक्षालय उभारण्याचा संकल्प रेल्वेने सोडला आहे.

'या' रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सेवेत सुविधांयुक्त प्रतीक्षालयं
SHARES

विमानतळाच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) प्रायोगिक तत्त्वावर उभारलेल्या प्रतीक्षालयाला प्रवाशांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर आता रेल्वेने दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)चा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटीप्रमाणेच याही रेल्वे स्थानकांवर सर्व सुविधायुक्त असे प्रतीक्षालय उभारण्याचा संकल्प रेल्वेने सोडला आहे.

६ महिन्यांनंतर ही प्रतीक्षालयं प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मात्र या प्रतीक्षालयाच्या सुविधेसाठी प्रवाशांना शुल्क मोजावे लागणार आहे. सध्या मध्य रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असलेलं प्रतीक्षालय, विश्रामकक्षात सुविधांची वानवाच आहे, तर त्यांचे दरही काहीसे जास्त आहेत. याशिवाय ते टर्मिनसवरील फलाटांपासून दूरच आहेत. त्यामुळे टर्मिनसवर सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्त्वावर नव्या प्रतीक्षालयाची उभारणी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला.

त्यानुसार, सर्व सुविधांनी युक्त असे प्रतीक्षालय सीएसएमटीत मेल-एक्स्प्रेसच्या १४ ते १८ नंबर फलाटाच्या प्रवेशद्वाराजवळच उभारण्यात आले. आता एलटीटी स्थानकात प्रतीक्षालय उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली असून दादर स्थानकातील कामासाठीही लवकरच निविदा प्रक्रि या राबविण्यात येणार असल्याचं समजतं.

निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात नव्या प्रतीक्षालयाच्या उभारणीसाठी ऑगस्ट महिना उजाडेल आणि त्यानंतर काही महिन्यांतच हे प्रतीक्षालय प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल. सीएसएमटीप्रमाणेच या प्रतीक्षालयातही सोफा, डायनिंग टेबल, प्रसाधनगृह, क्लॉक रूम, लायब्ररी, लॅपटॉपसह बसण्याची व्यवस्था, चार्जिंग पॉइंट, खानपान सेवा, पर्यटन साधने यांसह अन्य सुविधा उपलब्ध असतील.  मुंबई विमानतळावर प्रवाशांना आगमन व निर्गमन विमानांची माहिती मिळावी यासाठी स्क्रीन लावण्यात आले आहेत.

प्रतीक्षालयातही याच प्रकारची सुविधा असेल. प्रवाशांना मेल-एक्स्प्रेस गाड्यांची माहिती मिळावी म्हणून एलसीडी स्क्रिन बसवण्यात येतील. तसेच प्रवाशांना गाड्यांची माहिती मिळावी यासाठी तेथे उद््घोषणा यंत्रणाही बसविण्यात येणार आहे.

सीएसएमटीतील आरामदायी प्रतीक्षालयात एका तासासाठी दहा रुपये दरआकारणी निश्चित के ली आहे, तर खानपान सेवेसाठी पैसे द्यावे लागतात. शिवाय प्रतीक्षालयात येणाऱ्या प्रवाशांकडून सुरक्षा ठेव (डिपॉझिट) म्हणून ५० रुपये शुल्क आकारण्यात येते. प्रतीक्षालय सोडताना ग्राहकांना ही रक्कम परत के ली जाते. ५ ते १२ वयोगटांतील मुलांसाठी प्रत्येक तासाला ५ रुपये दर असून त्यावरील वयोगटांसाठी प्रत्येक तासाला १० रुपये दर आहेत.

५ वर्षांखालील मुलांना मात्र मोफत प्रवेश आहे. अशीच सुविधा दादर, एलटीटीतील प्रतीक्षालयात असेल, असे सूत्रांनी सांगितले. ठाणे, कल्याण येथेही प्रतीक्षालय उभारण्याचा विचार आहे. परंतु ठाणे स्थानकात प्रतीक्षालयासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची उभारणी करणे अशक्य आहे. तरीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.



हेही वाचा -

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण

दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा