Advertisement

‘गोल्डन अवर्स’चा 'गोल्डन' फायदा, महामार्गावरील अपघातात घट

राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये ११ हजार ७८० अपघातांमध्ये राज्यात १२ हजार ९३५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत राज्य महामार्ग पोलिसांनी 'गोल्डन अवर्स' सुरू केल्यानंतर अपघातांच्या प्रमाणात घट होत आहे. २०१७ मध्ये राज्यात ११ हजार १७१ अपघातांमध्ये १२ हजार २१५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमधील बहुतांश अपघात हे चालकांच्या चुकीमुळे झाले आहेत.

‘गोल्डन अवर्स’चा 'गोल्डन' फायदा, महामार्गावरील अपघातात घट
SHARES

राज्य महामार्गांवर होणाऱ्या अपघातांचा वाढता आलेख रोखण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या 'गोल्डन अवर्स'मुळे अपघातांच्या संख्येत कमालिची घट झाली आहे. त्याचबरोबर लेन कटींग, ओव्हरस्पीड यावरही महामार्ग पोलिसांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईत वाढ झाली आहे.


काय आहे 'गोल्डन अवर्स'?

वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून पोलिसांनी सुट्ट्या आणि विकेंडच्या काळात राज्य महामार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घतली आहे. या नियमाला वाहतूक पोलिसांनी 'गोल्डन अवर्स' असं नाव दिलं आहे.


वर्षभरात किती फरक?

राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये ११ हजार ७८० अपघातांमध्ये राज्यात १२ हजार ९३५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत राज्य महामार्ग पोलिसांनी 'गोल्डन अवर्स' सुरू केल्यानंतर अपघातांच्या प्रमाणात घट होत आहे. २०१७ मध्ये राज्यात ११ हजार १७१ अपघातांमध्ये १२ हजार २१५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमधील बहुतांश अपघात हे चालकांच्या चुकीमुळे झाले आहेत.


मृतांमध्ये तरूणांची संख्या जास्त

आकडेवारीनुसार २००९ ते २०१६ या काळात राज्यात १, ०२, २१९ प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला. त्यातील ८८,१२५ (८६.२%) अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. २०१३ ते २०१६ दरम्यान राज्यातील महामार्गावर ५१, ९७९ जणांचा अपघाती मृत्यू झाला. यातील १६, ४०३ मृत हे १८-२५ वयोगटातील होते. त्यामुळे मागील ८ वर्षांपासून सरासरीनुसार दिवसाला ३५ जणांचा अपघातात मृत्यू होत असल्याने महामार्ग मृत्यूचे सापळे बनत असल्याचं दिसून येत आहे.


कारवाईची धास्ती

महामार्ग वाहतूक विभागाने 'गोल्डन अवर्स'सह लेन कटींग, स्पीडिंग करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरूवात केली. या दंडात्मक कारवायांची धास्ती घेत, वाहनचालकांनी महामार्गांवरील लेनची शिस्त आणि ओव्हरस्पीडवरचं पालन करण्यास सुरूवात केली.


१७५ कोटींचा दंड वसूल

मात्र आजही बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे. २०१६ मध्ये ११३ कोटींची रक्कम दंडात्मक कारवाईतून राज्य महामार्ग पोलिसांच्या खात्यात जमा झाली होती. त्याच्या तुलनेत २०१७ मध्ये दंडात्मक कारवाई अंतर्गत १७५ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.


महामार्ग वाहतूक विभागाची कारवाई:

वर्ष
कारवाई
दंडात्मक रक्कम(रुपये)
२०१७
९३,७०,४३७
१,७५,१९,८६,७१५
२०१६
७५,७२,३७२
१,१३,००,६८,३३०
२०१५
८०,२०,१९३
८९,१०,२६,७७०



नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो(एनसीआरबी) २०१५ च्या आकडेवारीनुसार

  • पादचाऱ्यांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असून एकूण अपघातांपैकी १७.७% (७,०८८ पैकी १,२५६) पादचाऱ्यांचा मृत्यू राज्यात झाला आहे.
  • दुचाकी अपघातात महाराष्ट्र तामिळनाडू पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर होतं. राज्यात अपघातांमध्ये ३,१४६ जणांचा मृत्यू झाला.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा