Advertisement

२०१९ मध्ये परिवहन विभागानं घेतले 'हे' महत्वाचे निर्णय


२०१९ मध्ये परिवहन विभागानं घेतले 'हे' महत्वाचे निर्णय
SHARES

लोकल, बेस्ट बस, एसटी, रिक्षा-टॅक्सी, मोनो, मेट्रो यांच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरविण्यात येते. परंतु, मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करणं म्हणजे धावपळीचं जीवन. त्यामुळं मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा व्हावी तसंच, मुंबईकरांची धावपळाीच्या जीवनातून मुक्तता व्हावी यासाठी परिवहन विभागानं अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये बेस्ट उपक्रम, रेल्वे प्रशासन, एसटी महामंडळ, रिक्षा-टॅक्सी, मोनो, मेट्रो यांच्या माध्यमातून प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीनं निर्णय घेण्यात आले आहेत. जाणून घेऊया २०१९ वर्षीतील परिवहन विभागानं घेतलेले महत्वाचे निर्णय...


बेस्ट उपक्रम

 • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य
 • २० मिडी इलेक्ट्रिक बस
 • बेस्ट बसमध्ये पुढील थांब्याची घोषणा
 • बेस्टच्या भंगारातील बसगाड्यांमध्ये शौचालय
 • टाटा कंपनीशी चर्चा
 • ट्रायमॅक्स मशीनचा वापर
 • भाडेतत्वावर बस व बेस्टचा कंडक्टर
 • बेस्ट बसमध्ये पॅनिक बटन
 • शनिवार व रविवारी रात्री सीएनजी बसची तपासणी
 • स्पेशल फिडर बस
 • भाडेतत्वावर ४०० वातानुकूलित मिनी बसगाड्या
 • महिलांसाठी विशेष बस सेवा
 • बेस्ट आगारांमध्ये स्वस्त पार्किंगची सोय
 • बेस्ट कर्मचाऱ्यांची मुलं कंत्राटी बसचालक
 • बस थांब्यासमोर पिवळा स्टॉपर बॉक्स
 • १० इलेक्ट्रीक बस दाखल
 • बेस्टचं ट्विटर अकाऊंट
 • बेस्ट बससाठी स्मार्ट कार्ड
 • 'BEST PRAWAS' बेस्टचं अॅप लॉंच


बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

विविध मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी जानेवारी महिन्यामध्ये ऐतिहासील संप पुकारला होता. तब्बल ९ दिवस कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळं प्रवाशांचे मोठ्या प्रचंड हाल झाले होते. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयानं बेस्ट प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये मध्यस्थीसाठी मध्यस्थ नेमत ३ महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तर संपकऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं न्यायालयात दिली. त्यानंतर बेस्ट कृती समितीनं बेस्ट संप मागे घेण्याची ग्वाही देत संप मागे घेण्याचा निर्णय जाहिर केला.

२० मिडी इलेक्ट्रिक बस

आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेनं भाड्यानं बसगाड्या घेण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, बेस्ट उपक्रमानं २० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये खासगी बसगाड्या भाड्यानं घेण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर 'फेम इंडिया' अंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात वातानुकूलित आणि विनावातानुकूलित अशा प्रत्येकी २० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

बेस्ट बसमध्ये पुढील थांब्याची घोषणा

बेस्ट प्रशासनानं बस गाड्यांमध्ये एलईडी डिस्प्ले आणि स्पिकर लावले आहेत. ही सुविधा बेस्टच्या प्रवासी सुचना प्रणाली (PIS)चा एक भाग असून, बेस्टच्या २८०९ बस गाड्यांमध्ये या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. तसंच, बॅकवे - वडाळा बस डेपो या मार्गावर आणि पश्चिम उपनगरातील काही मार्गांवर या प्रणालीचा वापर करण्यात आला.

बेस्टच्या भंगारातील बसगाड्यांमध्ये शौचालय

'बेस्ट'ने भंगारात काढलेल्या बसगाड्यांमध्ये फिरते शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत शिवसेनेने मागणी केली होती. शिवसेनेच्या या मागणीला पालिकेच्या महासभेत बहुमतामे मंजूरी देण्यात आली होती. फिरत्या शौचालयाची सुविधा मुंबईकरांसाठी मुंबईतील महामार्ग, छोटे रस्ते, गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यामुळे नागरिक-प्रवाशांची गैरसोय टळणार असल्याचा विश्वास बेस्टला होता.

टाटा कंपनीशी चर्चा

उत्पन्नातील सर्वात मोठा वाटा टाटा कंपनीला दिल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित होतो. यावर पर्याय म्हणून बेस्टनं बेस्ट समितीच्या बैठकीत टाटा कंपनीसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला. विजेच्या रकमेतील ५० टक्के १ ते १५ तारखेपर्यंत आणि उर्वरित ५० टक्के रक्कम १५ ते ३० तारखेपर्यत देण्यास मान्यता घेण्याचा प्रस्ताव ठेवता येईल. या प्रस्तावामुळं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेक देता येईल, अशी सूचना देखील करण्यात आली होती.

ट्रायमॅक्स मशीनचा वापर

बेस्टकडं ट्रायमॅक्सच्या एकूण ९५०० मशिन आहेत. यामधील अनेक मशिन बंद झाल्यानं पुन्हा कागदी तिकिटांचा वापर करण्यात आला. मात्र, या मशीन दुरूस्त करण्यासाठी बेस्टनं अनेक प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आल्यानं पुन्हा ट्रायमॅक्स मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेतला. बेस्टच्या गोराई, मागाठाणे, मालवणी, मरोळ आणि मजास या ५ आगारांमध्ये मशीन दुरुस्त करून वापरात आणली जात आहेत. त्याशिवाय, दुरूस्त करण्यात आलेल्या या ट्रायमॅक्सच्या मशीनमध्ये चिप बदलून नवीन टाकण्यात आली आहे. तसंच, बॉडी आणि की पॅड बदलण्यात आलं आहेत.

भाडेतत्वावर बस व बेस्टचा कंडक्टर

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या भाडेतत्त्वावरील ४५० बसच्या कर्मचाऱ्यांबाबतही उपक्रमानं यावेळी निर्णय घेतला. या बसमधील चालक खासगी स्तरावरील असणार आहेत. तसंच, कंडक्टर हा बेस्टचाच कर्मचारी असणार आहे. त्यामुळं आता बेस्ट उपक्रमासह कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बेस्ट बसमध्ये पॅनिक बटन

बेस्टनं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आपतकालीन परिस्थितीत प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी बेस्ट बसमध्ये 'पॅनिक बटन'चा प्रयोग केला जात आहे. बेस्ट उपक्रमातर्फे पॅनिक बटन बसमधील चालकाच्या केबिनमध्येच बसवण्यात आलं असून, त्याची चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळं बेस्टच्या प्रवाशांचा प्रवास आता आणखीनच सुखकर होणार आहे.

शनिवार व रविवारी रात्री सीएनजी बसची तपासणी

बेस्ट बसला लागणाऱ्या आगीचा घटनांना आळा घालण्यासाठी बेस्ट प्रशासनानं खबरदारी म्हणून नियमित तपासणीबरोबरच दर शनिवार व रविवारी रात्रीच्या वेळेत सर्व सीएनजी बसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

नवे तिकीट दर

मागील अनेक वर्ष बेस्ट उफक्रम आर्थिक तोटा सहन करत आहे. त्यामुळं बेस्टची प्रवासी संख्याही कमी झाली आहे. मात्र, ही प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बेस्टनं ताफ्यात बस गाड्यांची वाढीसह तिकीट दरकपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला. बेस्टच्या या निर्णयाला बेस्ट समिती, महापालिका सभागृहा, राज्य परिवहन प्राधिकरणान यांची मंजुरी मिळाली. त्यानंतर प्रवाशांना बेस्टमधून ५ रुपयात प्रवास करण्याची संधी प्राप्त झाली.

स्पेशल फिडर बस सेवा

बेस्ट उपक्रमानं रेल्वे, मेट्रो, मोनो रेल्वेच्या २ स्थानकांमधील अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी फिडर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. महिला प्रवाशांसाठीही स्पेशल फिडर बस सेवा सुरू करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर व पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडं पत्राद्वारे केली.

भाडेतत्वावर ४०० वातानुकूलित मिनी बसगाड्या

बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावर ४०० वातानुकूलित मिनी बसगाड्या दाखल करण्याचा निर्णय बेस्ट समितीच्या बैठकीत घेतला. त्यानुसार, १०० गाड्या ऑगस्टमध्ये आणि उर्वरित गाड्या नोव्हेंबर महिन्यात दाखल करण्यात येणार होत्या.

महिलांसाठी विशेष बस सेवा

राज्य सरकारच्या 'तेजस्वीनी' बस योजनेनुसार शहरात गर्दीच्या वेळेस महिलांसाठी विशेष बस सेवा चालवण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांसाठी ३७ नव्या बस खरेदी करण्यात येणार आहेत. या नॉन एसी बस मध्यम (मिडी) आकाराच्या असतील. तसंच त्या डिझेलवर धावणाऱ्या असतील. यातील प्रत्येक बसची किंमत २९ लाख रुपयांच्या जवळपास असेल. या बससेवेसाठी बेस्ट प्रशासनाला ११ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. या सर्व बस खरेदीसाठी तेजस्वीनी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून निधी देण्यात येईल.

बेस्ट आगारांमध्ये स्वस्त पार्किंगची सोय

बेस्टच्या पार्किंगमध्ये ३ तासांसाठी टू व्हिलर पार्क करण्यासाठी २० रुपये द्यावे लागतील. तर कारसाठी ३० रूपये शुल्क असतील. हेच दर ६ तासांसाठी अनुक्रमे २५ आणि ४० रुपये होतील. तसंच १२ तासांसाठी अनुक्रमे ३० रुपये आणि ७० रुपये असतील. १२ तासांहून अधिक वेळेसाठी टू व्हिलरकरीता ३५ रुपये आणि कारसाठी ८० रुपये आकारण्यात येतील. मासिक पास अंतर्गत दररोज १२ तासांसाठी टू व्हिलरकरीता ६६० रुपये आणि कारकरीता १४५० रुपये द्यावे लागतील. तर दररोज २४ तासांसाठी टू व्हिलरकरीता १३२० रुपये आणि कारकरीता ३०८० रुपये द्यावे लागतील.

बेस्ट कर्मचाऱ्यांची मुलं कंत्राटी बसचालक

बेस्टच्या ताफ्यात ऑगस्ट महिन्यापासून दाखल होणाऱ्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांवर बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना चालक म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं चालक म्हणून पात्रता पूर्ण होत असल्यास या मुलांना बस चालक म्हणून रोजगाराची संधी मिळणार असल्याच दावा बेस्टनं केला होता.

बस थांब्यासमोर पिवळा स्टॉपर बॉक्स

बेस्टच्या प्रवासादरम्यान अनेकदा बसचालक बसगाडी थांब्याच्या पुढे थांबवताना पाहायला मिळतं. प्रवाशांनाही त्याठिकाणी जाऊन बसमध्ये चढावं लागतं असून त्यामुळं प्रवाशांची मोठी गैर सोय होते. त्यामुळं बस थांब्यांवर पिवळ्या रंगाचे स्टॉपर बॉक्स बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील ६ हजार बस थांब्यावर हे पिवळे स्टॉपर बॉक्स बसविण्यात येणार आहेत. यासाठी सध्या २० टक्के प्रमुख बस थांबे निश्चिंत करण्यात आलं.

१० इलेक्ट्रीक बस दाखल

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ होत असल्यानं बसगाड्यांचा ताफाही वाढविण्याच्या निर्णय बेस्टनं घेतला. बेस्टनं भाडेतत्वावर ४०० वातानुकूलित बसगाड्या घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याचसोबत आणखी १२५० मिडी, मिनी व इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा निर्णय घेतला. या इलेक्ट्रिक बसमधील १० बस बेस्टच्या धारावी आगारात दाखल झाल्या असून, मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत.

बेस्टचं ट्विटर अकाऊंट

ट्विटरवर बेस्टनं MyBESTBus आणि MyBESTElectric या नावानं ट्विटर हॅण्डल सुरू केलं आहे. त्यामुळं प्रवाशांना बेस्टच्या संपाबाबत तसंच, निर्णयांबाबत सहज महिती मिळणार आहे.

बेस्ट बससाठी स्मार्ट कार्ड

बेस्ट उपक्रम उपनगरीय रेल्वे, मेट्रो-मोनो रेल्वे आणि बेस्ट या परिवहन सेवांसाठी नोव्हेंबरपासून एकच ‘स्मार्ट कार्ड’ ही एकात्मिक तिकीट प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार आहे.

'BEST PRAWAS' बेस्टचं अॅप लॉंच

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता बसचं नेमकं ठिकाणं कुठं आहे हे समजण्यात मदत होणार आहे. कारण बेस्टचं बसबाबत माहिती देणारं अॅप लॉंच करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट उपक्रमाचा 'बेस्ट प्रवास' (BEST PRAWAS) या बस ट्रॅकिंग अॅपचं लोकार्पण केलं.

नाणी संपुष्टात आणण्यासाठी नवीन कल्पना

बेस्टकडं सुट्ट्या नाण्यांचा खच पडू लागला आहे. मागील काही महिन्यांपासून बेस्टकडं ५, १० रुपयांच्या नाण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बेस्टनं ही चिल्लर सर्व बसडेपोंमध्ये सुट्ट्यांची निकड असलेल्यांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे

 • मध्य रेल्वेची राजधानी एक्स्प्रेस
 • आधी बिल घ्या, नंतर पैसे द्या
 • डिजिटल तिकीट
 • मध्य रेल्वेवर दररोज धावणार राजधानी एक्स्प्रेस
 • रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय
 • परळ टर्मिनसचे लोकर्पण
 • 'एमयूटीपी ३ए' ला केंद्र सरकारची मंजूरी
 • रेल्वे रूळांच्या साफसफाईसाठी 'मक स्पेशल लोकल'
 • ४ लोकल्सना अतिरिक्त थांबा
 • सीएसएमटी ते डोंबिवली १५ डब्यांची लोकल
 • लोकलखोळंबा टाळण्यासाठी पर्जन्यमापक यंत्रणा
 • मध्य रेल्वेचं मोबाईल अॅप
 • हार्बरवर येणार सिमेन्सच्या ३ लोकल
 • दुसरी व तिसरी एसी लोकल
 • एसी लोकलच्या तिकीट दरात वाढ
 • एसी लोकलसाठी २ नवे रेल्वे कारशेड
 • २० बंबार्डिअर लोकल
 • लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी वेगळे रेल्वे रुळ
 • पश्चिम रेल्वेच्या १२० लोकलला जोडणार ३ डबे
 • पनवेलहून थेट गोरेगाव लोकल
 • विकेंडलाही धावणार एसी लोकल
 • एटीव्हीएम करणार जलद गतीनं कार्य
 • महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकल
 • ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांना फर्स्ट क्लासमधून प्रवास करण्याची मुभा
 • माय लेफ्ट इज माय राइट उपक्रम सुरू
 • नव्या वेळापत्रकानुसार धावणार मध्य रेल्वेच्या लोकल
 • ४२ लोकलच्या वेळेत बदल
 • साध्या लोकललाही स्वयंचलित दरवाजे
 • अर्धवातानुकूलीत लोकलला आरडीएसओची मंजूरी
 • अवघ्या ४९ पैशात १० लाखांचा विमा
 • बायोमेट्रिक टोकन
 • मोटरमनच्या केबिनमध्ये सिग्नलचा ऑडिओ अलार्म
 • एका तिकीटवर तिन्ही मार्गावर प्रवास करण्याची मुभा
 • एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपयांची तरतूद
 • धीम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल
 • नव्या पुलांच्या बांधकामासाठी कार्बनचा वापर
 • दगडफेकीला आळा घालण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती
 • रेल्वे प्रवासात स्टंट केल्यास ५ वर्षांची शिक्षा
 • बॉम्ब शोधक-नाशक पथक दाखल होणार
 • मेल-एक्स्प्रेस डब्यांचं रूपांतर 'उत्कृष्ट' डब्यांमध्ये
 • अतिरिक्त १५०० सीसीटीव्ही उभारण्याचा निर्णय
 • मध्य रेल्वेच्या ६ स्थानकांवर 'क्यूआरटी' नियूक्ती
 • एक्सरे बॅग मशिन
 • पनवेल-वसई रेल्वेमार्गावर १७० फेऱ्या चालवण्याचं नियोजन
 • चाक वंगण यंत्रणा
 • डेक्कन क्विनचा प्रवास जलद


मध्य रेल्वेची राजधानी एक्स्प्रेस

रेल्वे प्रशासनानं राजधानी एक्सप्रेस १९ जानेवारीपासून मध्य रेल्वेवरून नाशिकमार्गे नेण्याचा निर्णय घेतला. ही राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी टर्मिनसमधून नाशिकमार्गे हजरत निझामुद्दिनला (दिल्ली)धावत आहे.

आधी बिल घ्या, नंतर पैसे द्या

ग्राहकांना पुरवण्यात येणारे खाद्यपदार्थ हे मुळ किंमतीपेक्षा अधिक किंमतीने विकले जात असल्याच्या तक्रारी येत असल्यानं पश्चिम रेल्वेकडून 'आधी बिल घ्या, नंतर पैसे द्या' असं आवाहन प्रवाशांना करण्यात आलं होतं. पश्चिम रेल्वेनं या मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वेवरील विविध स्थानकांवरील प्रवाशांना बिलाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्नही केला होता.

डिजिटल तिकीट

डिजिटल तिकीट सेवा अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहचावी आणि प्रवाशांनी हे अॅप आपलंसं करावं यासाठी शनिवार-रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील काही स्थानकातील तिकीट खिडक्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चर्चगेट, प्रभादेवी, वांद्रे, अंधेरी, कांदिवली, बोरीवली या रेल्वे स्थानकावरील खिडक्या बंद ठेवण्यात येत आहेत.

मध्य रेल्वेवर दररोज धावणार राजधानी एक्स्प्रेस

राजधानी एक्स्प्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद लक्षात घेता रेल्वेनं आठवड्यात दोन दिवस मुंबईतून तर दोन दिवस दिल्लीतून सुटणारी राजधानी आता दररोज सोडण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला.

रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय

लाखो मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मुंबईतील लोकल गाड्यांच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करण्यात आलं. या नियोजनानुसार लोकलच्या पुरुष डब्यांमध्ये ४ आणि महिला डब्यांमध्ये ६ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

परळ टर्मिनसचे लोकर्पण

मध्य रेल्वेवरील परळ टर्मिनसचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण झालं. तसंच, त्यांनी परळ टर्मिनसहून सुटणाऱ्या १६ लोकलला हिरवा कंदील दाखवला.

'एमयूटीपी ३ए' ला केंद्र सरकारची मंजूरी

५४ हजार ७७७ कोटींच्या ‘एमयूटीपी ३ए’ला गुरुवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली. या रकमेचा वापर मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) कामांसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या डब्यांना निळा दिवा

धावती लोकल पकडताना होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं लोकलच्या प्रत्येक दरवाजावर निळ्या रंगाचा दिवा बसवण्याचा निर्णय घेतला होता.

रेल्वे रूळांच्या साफसफाईसाठी 'मक स्पेशल लोकल'

पश्चिम रेल्वेनं रूळांच्या साफसफाईसाठी आता 'मक स्पेशल लोकल'ची बांधणी केली आहे. खास रूळांच्या साफसफाईकरता 'मक स्पेशल लोकल'ची बांधणी करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेनं २५ वर्षे जून्या लोकलचा पुर्नवापर केला आहे. या लोकमधील सर्व आसनं आणि विभाजक काढून लोकल पूर्णपणे मोकळी केली आहे. जेणेकरून कर्मचारी रूळांवरील कचरा काढून रूळांच्या बाजूला लावतील आणि मग हा कचरा या मक स्पेशल लोकलमध्ये भरण्यात येईल.

४ लोकल्सना अतिरिक्त थांबा

चर्चगेट ते मुंबई सेट्रल स्थानकांमधील मरिन लाइन्स, चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड या स्थानकांवर चार लोकल्सना अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. या चार लोकल्मसमधील तीन विरार, तर एक डहाणू लोकल असेल.

सीएसएमटी ते डोंबिवली १५ डब्यांची लोकल

सीएसएमटी ते डोंबिवली या मार्गावर सकाळच्या गर्दीच्या वेळेत १५ डब्यांची लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.

लोकलखोळंबा टाळण्यासाठी पर्जन्यमापक यंत्रणा

मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यानं रेल्वे मार्गांवरील रुळांवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे पावसाळ्यात होणारा हा लोकलखोळंबा टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनानं रेल्वे मार्गावर पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला.

मध्य रेल्वेचं मोबाईल अॅप

एखादी लोकल स्थानकात येण्याची योग्य वेळ प्रवाशांना स्थानकातील इंडीकेटर्सवर दिसते. मात्र, स्थानकातील काही इंडिकेटर्स बिघडले असल्यामुळं प्रवाशांना लोकलसाठी स्थानकात थांबून राहावं लागतं. त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी मोबाईल अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला.

वेगवान ४७ एसी लोकल

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-३ अंतर्गत उपनगरीय रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक ४७ वातानुकूलित लोकल मिळणार आहेत. या लोकलमधील प्रत्येक २ डब्यांच्या मागे एक मोटर असणार आहे. त्यामुळं लोकलचा वेग वाढणार आहे.

हार्बरवर येणार सिमेन्सच्या ३ लोकल

मुंबईतील हार्बर मार्गावर सर्वच्या सर्व सिमेन्सच्या लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक बंबार्डिअर लोकल असून आणखी २ बंबार्डिअर लोकल पुढील १५ दिवसांत येणं अपेक्षित आहे. या लोकल आल्यावर मध्य रेल्वेच्या ३ सिमेन्सच्या लोकल हार्बर मार्गावर आणण्यात येतील.

दुसरी व तिसरी एसी लोकल

२५ डिसेंबर २०१७ पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल सुरू झाली. त्यानंतर प्रवाशांना आणखी लोकलची प्रतिक्षा होती. त्यानुसार, पश्चिम रेल्वेनं दुसरी व तिसरी लोकल सुरू करण्याच निर्णय यंदाच्या वर्षात घेतला.

एसी लोकलच्या तिकीट दरात वाढ

एसी लोकलच्या तिकीट दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही वाढ १ जूनपासून ही दरवाढ लागू करण्यात आली. त्यानुसार एकदिशा मार्गाचं किमान तिकीट ६५ आणि कमाल तिकीट २२० रुपये असणार आहे.

एसी लोकलसाठी २ नवे रेल्वे कारशेड

मुंबई रेल्वेच्या ताफ्यात येणाऱ्या एसी लोकलसाठी २ नवीन कारशेड उभारण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. नवीन कारशेड अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत.

२० बंबार्डिअर लोकल

मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी रेल्वे मंडळानं अतिरिक्त २० बंबार्डिअर लोकल देण्याचा निर्णय घेतला आहे. यांपैकी ७ लोकल मुंबई रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत उर्वरित १३ लोकल डिसेंबरअखेर दाखल होणार आहेत.

लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी वेगळे रेल्वे रुळ

मध्य रेल्वे प्रशासनानं कल्याण स्थानकातल लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळे रेल्वे रुळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. लोकल गाड्यांसाठी ४ रेल्वे रुळ बांधण्यात येणार असून, लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठी ६ रेल्वे रुळ बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी ९६१ कोटी रुपये खर्च होणार असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पश्चिम रेल्वेच्या १२० लोकलला जोडणार ३ डबे

पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळं प्रवाशांची होणारी ही गैर सोय लक्षात घेत पश्चिम रेल्वे प्रशासनानं १२ डब्बा लोकलला आणखी ३ डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ताफ्यातली १२० लोकल गाड्यांना ३ डबे जोडण्याचं काम २०२० वर्षाअखेरी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. ३ डबे जोडल्यानंतर म्हणजे १५ डबा लोकल सुरुवातील विरार ते अंधेरी या मार्गावर चालविण्यात येणार असून, ४ मिनिटांनी एक लोकल धावणार आहे.

पनवेलहून थेट गोरेगाव लोकल

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-गोरेगाव लोकलची चाचणी घेण्यासाठी तपासणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. ही तपासणी यशस्वी ठरल्यास पनवेलवरून गोरेगाव लोकल मार्गस्थ होणार आहे. त्यामुळं हार्बर मार्गावरील प्रवाशांची लोकल बदलण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे.

विकेंडलाही धावणार एसी लोकल

आठवड्याचे ५ दिवस धावणारी एसी लोकल आता शनिवार आणि रविवारी देखील धावणार आहे. त्यामुळं आता एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुट्टीच्या दिवशीही प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

एटीव्हीएम करणार जलद गतीनं कार्य

रेल्वे स्थानकांतील 'एटीव्हीएम'ही (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन) जलद गतीनं कार्य करणार आहे. त्यासाठी नव्या मशिनचा वापर करण्यात येणार असून या मशिनच्याआधारे अवघ्या एका क्लिकवर तिकीट घेता येणार आहे.

महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकल

पश्चिम रेल्वे प्रशासनानं महिला प्रवाशांसाठी खास महिला स्पेशल लोकल सुरू केली आहे. ही लोकल मंगळवारी संध्याकाळी ६.१५ वाजता चर्चगेट ते विरार या रेल्वे मार्गावर धावणार आहे. या गाडीच्या डब्यांमध्ये चांगली आसनं, आपत्कालीन बटण, सामानासाठी जास्त जागा असणार आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही यंत्रणाही या लोकलमध्ये कार्यन्वित करण्यात आलेली आहे.

ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांना फर्स्ट क्लासमधून प्रवास करण्याची मुभा

प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनानं साध्या लोकलमधील प्रथम दर्जाच्या एका डब्यामध्ये द्वितीय दर्जाच्या प्रवाशांना प्रवास करू देण्याची मुभा देण्याची तयारी करत आहे.

माय लेफ्ट इज माय राइट उपक्रम सुरू

लोकल, एक्स्प्रेसमध्येमध्ये चढताना अनेकवेळा धक्काबुक्की होऊ वाद होतात. या वादाचं रुपांतर मारामारीतही होते. हे वाद थांबवण्यासाठी 'माय लेफ्ट इज माय राइट' हा उपक्रम सुरू केला आहे.

नव्या वेळापत्रकानुसार धावणार मध्य रेल्वेच्या लोकल

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा या मुख्य उपनगरीय मार्गावर नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे. मागील वर्षभरात नवीन मेल-एक्स्प्रेस गाड्यांची पडलेली भर आणि त्यामुळं लोकलचं बिघडलेलं वेळापत्रक लक्षात घेत उपनगरीय वेळापत्रकात बदल करण्यात आलं आहेत. १४ डिसेंबरपासून हे नवे वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे.

४२ लोकलच्या वेळेत बदल

मेल-एक्स्प्रेस गाड्यांमुळं बिघडलेला लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी ४२ लोकलच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. नवीन वेळापत्रकानुसार परळ स्थानकातून सुटणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये आणखी काही फेऱ्यांची भर पडली आहे.

साध्या लोकललाही स्वयंचलित दरवाजे

पश्चिम रेल्वे प्रशासनानं साध्या लोकललाही स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंचलित दरवाजे बसवून १५ डब्यांची विनावातानुकूलित लोकल चालवणं शक्य आहे का, हे तपासण्यासाठी लवकरच लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे.

अर्धवातानुकूलीत लोकलला आरडीएसओची मंजूरी

६ डबे वातानुकूलित व ६ डबे साधारण अशा १२ डब्यांच्या उपनगरी रेल्वेच्या चाचणीला रेल्वेच्या रिसर्च डिझाईन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेननं (आरडीएसओ) मंजुरी दिली आहे. तसंच, या लोकलची चाचणी पुढील आठवड्यापासून करण्याचा विचार केला जात आहे.

अवघ्या ४९ पैशात १० लाखांचा विमा

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) अवघ्या ४९ पैशात १० लाखांचा विमा देण्यात येणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून प्रवाशांनी रेल्वेचे तिकीट खरेदी केल्यास हा विमा मिळणार आहे. मात्र, ज्या प्रवाशांचे तिकीट आरसी अथवा कन्फर्म असेल त्यांनाच या विम्याचा लाभ मिळणार आहे.

बायोमेट्रिक टोकन

अनारक्षित मेल व एक्स्प्रेस गाड्यांची जनरल तिकिटे खरेदी केल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या अंगठ्याचा ठसा उमटवून 'बायोमेट्रिक टोकन' दिले जाणार आहे. गाडी सुटण्यापूर्वी हे टोकन दाखवताच त्यांना बुकिंगच्या वेळेप्रमाणं आसनं देण्याची योजना मध्य रेल्वेनं आखली आहे.

मोटरमनच्या केबिनमध्ये सिग्नलचा ऑडिओ अलार्म

मध्य रेल्वेनं लोकलच्या मोटरमननं रेल्वे मार्गावरील रेड सिग्नल जंप करू नये यासाठी लोकलच्या मोटरमनच्या केबिनमध्ये सिग्नलचा ऑडिओ अलार्म बसविण्यात आला होता. या सिग्नलचा ऑडिओ अलार्म वाजण्याच्या सुविधेमुळं मोटरमनकडून चुका होण्याचे प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळं मध्य रेल्वेचा सिग्नल रेड आहे की ग्रीन असे सांगणारा हा बोलका सिग्नल प्रकल्प यशस्वी झाला असून उर्वरित लोकलमध्येही ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

एका तिकीटवर तिन्ही मार्गावर प्रवास करण्याची मुभा

पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर एकाच तिकीटानं प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसंच, या एका तिकीटावर प्रवशांना संपुर्ण दिवस तिन्ही मार्गावर अनलिमिटेड प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना रेल्वेचं तिकीट एक दिवसासह ३ आणि ५ दिवसांसाठी देखील काढता येणार आहे. संपुर्ण एक दिवसासाठी लोकलमधील सेकंड क्लास डब्याची तिकीट ७५ रुपये असेल, तर ३ दिवसांसाठी रेल्वे तिकीट ११५ रुपये असेल तसंच, ५ दिवसांसाठी रेल्वेचं तिकीट १३५ रुपये असणार आहे. त्याचप्रमाणं फस्ट क्लास डब्याची एक दिवसासाठी तिकीट २५५ रुपये असेल, तर ३ दिवसांसाठी रेल्वे तिकीट ४१५ रुपये असेल तसंच, ५ दिवसांसाठी रेल्वेचं तिकीट ४८५ रुपये असणार आहे.

एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांसाठी ५७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं आता सीएसएमटी ते कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत यांसह अनेक प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गासाठी १६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसंच, पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार धिम्या मार्गावर १५ डबा प्रकल्पासाठी देखील १२ कोटी रुपये मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

धीम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची आगामी वर्षात धकाबुक्कीच्या प्रवासातून सुटका होण्याची शक्यता आहे. कारण रेल्वे अर्थसंकल्पात अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल चालविण्याच्या प्रकल्पासाठी १२ कोटी मंजुर करण्यत आले आहेत. त्यामुळं नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात १५ डबा लोकल धावण्यास सुरूवात होणार आहे.

नव्या पुलांच्या बांधकामासाठी कार्बनचा वापर

नव्या पुलांच्या बांधकामावेळी पश्चिम रेल्वे गंज लागू नये यासाठी स्टेनलेस स्टील, उच्च प्रतीचं काँक्रीट आणि मजबूत तसंच हलक्या वजनाच्या कार्बनचा वापर करणार आहे. पश्चिम रेल्वे प्रथमच कार्बनचा वापर करणार आहे.

दगडफेकीला आळा घालण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती

मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा दलानं विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेत स्थानकांदरम्यान गस्त घालणे, झोपडपट्टीमधील रहिवाशांमध्ये जनजागृती करणं, साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती इत्यादींचा समावेश आहे.

रेल्वे प्रवासात स्टंट केल्यास ५ वर्षांची शिक्षा

स्टंटबाजांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलानं कलम १५३ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या स्टंटबाजावर या कलमानुसार कारवाई करण्यात येणार असून त्यात तो दोषी ठरल्यास त्याला ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

बॉम्ब शोधक-नाशक पथक दाखल होणार

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे सुरक्षा बलामध्ये 'बॉम्ब शोधक-नाशक पथक' दाखल होणार आहे. मध्य रेल्वे आरपीएफच्या ताफ्यातील 'बॉम्ब शोधक-नाशक पथक' हे पहिलेच विशेष पथक असणार आहे. या पथकात १२ आरपीएफ जवानांचा समावेश असून, त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

मेल-एक्स्प्रेस डब्यांचं रूपांतर 'उत्कृष्ट' डब्यांमध्ये

उत्तम आसनव्यवस्था, बायोटॉयलेट, एलईडी दिवे या सुविधा आता सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्येही उलब्ध होणार आहेत. मार्च अखेरपर्यंत एकूण ३० मेल-एक्स्प्रेस डब्यांचं रूपांतर 'उत्कृष्ट' डब्यांमध्ये करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

अतिरिक्त १५०० सीसीटीव्ही उभारण्याचा निर्णय

रेल्वे स्थानकांतील अनियंत्रित गर्दीवर नियंत्रण मिळविण्यसाठी रेल्वे आणि एसटी प्रशासनानं सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानक सुरक्षा योजनेंतर्गत ३० रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त १५०० सीसीटीव्ही उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या ६ स्थानकांवर 'क्यूआरटी' नियूक्ती

मुंबईकरांना भयमुक्त प्रवास करता यावा, यासाठी मध्य रेल्वेनं मुंबई विभागातील सर्वाधिक गर्दीच्या ६ जास्त रेल्वे स्थानकांवर क्वीक रिस्पॉन्स टिमची (क्यूआरटी) नियुक्ती केली आहे. त्याशिवाय संशयास्पद वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी २८ श्वान पथकांनाही पाचारण केलं आहे.

एक्सरे बॅग मशिन

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी १६ एक्सरे बॅग मशिन रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं शस्त्रास्त्रधारी प्रशिक्षित जवानांसह गर्दी नियंत्रण करण्यासाठी होमगार्ड आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचेही जवान तैनात करण्यात आले आहेत.

पनवेल-वसई रेल्वेमार्गावर १७० फेऱ्या चालवण्याचं नियोजन

पनवेल-वसई रेल्वेमार्गावर दररोज १७० फेऱ्या चालवण्याचं नियोजन मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने (एमआरव्हीसी) केलं आहे. पनवेल-वसई रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

चाक वंगण यंत्रणा

ट्रान्स हार्बर मार्गावर असलेल्या वळणांमुळं लोकलच्या चाकांचं घर्षण होतं. त्यामुळं लोकलमध्ये बिघाड निर्माण होतात. त्यामुळं हे बिघाड थांबविण्यासाठी मध्य रेल्वेनं नवीन 'चाक वंगण यंत्रणा' आणली आहे.

डेक्कन क्विनचा प्रवास जलद 

'डेक्कन क्विन'ला ताशी १६० किमी वेगानं धावण्यास पूरक लिकें हॉफमन बूश (एलएचबी) डबे जोडून 'डायनिंग कार' वातानुकूलित करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. तसंच, इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) डब्यांची वेगानं धावण्याची क्षमता कमी असल्यानं 'एलएचबी' डबे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 


एसटी महामंडळ

 • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एकरकमी मिळणार
 • एसटी महामंडळाची मालवाहतूक आणि गोदाम सेवा
 • एसटीमध्ये ही जीपीएस यंत्रणा
 • हॉटेल चालकांकडून जादा दर आकारणार
 • एसटीचे स्मार्ट कार्ड
 • ४०० शिवशाही एसी बस
 • एसटी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ
 • वाहतूक नियम मोडल्यास एसटी चालकांचा कापणार पगार
 • एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार
 • २० किलोपेक्षा जास्त वजनाचं सामान नेल्यास पाचपट भाडं
 • एसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड
 • इलेक्ट्रीक बस
 • पूरग्रस्तभागातील एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार ३ महिन्यांचा पगार
 • महाराष्ट्र एसटी महामंडळाचा कर्नाटक महामंडळाला भाडेवाढीचा सल्ला
 • प्रवाशांना पाण्याची सुविधा
 • दिव्यांग प्रवाशांसाठी एसटीच्या बस थांब्यावर व्हिलचेअर
 • एसटीची हंगामी भाडेवाढ मागे
 • नवीन बनावटीच्या बस
 • गर्दीवर नियंत्रण मिळविण्यसाठी सीसीटीव्ही
 • परळ-पाटगाव या मार्गावर नवी एसटी बस
 • कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात
 • खर्चात कपात करण्याचा निर्णय
 • स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ


सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एकरकमी मिळणार

महामंडळाच्या १ एप्रिल २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला आहे.

एसटी महामंडळाची मालवाहतूक आणि गोदाम सेवा

सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटीच्या मालवाहतूक आणि गोदामांच्या सेवेसंदर्भात निर्णय परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला.

एसटीमध्ये ही जीपीएस यंत्रणा

ओला-उबेरप्रमाणं'एसटी'मध्ये ही ‘जीपीएस’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘जीपीएस’ यंत्रणेमुळं प्रवाशांना एसटी नेमकी कुठे आहे? हे समजण्यात मदत होणार आहे. तसंच, प्रवाशांकरीता एसटी स्थानकांकर डिजिटल बोर्ड लावण्यात येणार असून, या बोर्डवर एसटीची निश्चित वेळ समजणार आहे. तसंच, मोबाईल अॅपच्या माध्यमातूनही एसटी कुठे आहे? हे समजणार आहे.

हॉटेल चालकांकडून जादा दर आकारणार

एसटीच्या कोणत्याही बसमधून प्रवास करताना प्रवासादरम्यान थांबा घेणाऱ्या ठिकाणावरील हॉटेल चालकांकडून जादा दर आकारण्यात निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे.

एसटीचे स्मार्ट कार्ड

मुंबईतील लोकल रेल्वेच्या एटीव्हीएम या कॅशलेस प्रणालीच्या धर्तीवर एसटीचे हे स्मार्ट कार्ड असणार आहे. त्यामुळं एसटी प्रवासादरम्यान स्मार्ट कार्डाचा वापर करत प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे.

४०० शिवशाही एसी बस

२०१९-२०या वर्षात ४०० एसी शिवशाही बसेस त्याचप्रमाणं विना-वातानुकूलित आणि शयनप्रकारच्या अनुक्रमे २०० व ७०० नवीन बस आणण्याची योजना आखली असून, ४०० एसी शिवशाही बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याची माहिती रावते यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

एसटी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ

एसटी महामंडळाच्या विविध सवलतींसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असून, अनेक प्रवाशांनी हे स्मार्ट कार्ड काढलं नव्हतं. त्यामुळं या प्रवाशांना या कार्डाचा लाभ मिळावा यासाठी १ जानेवारी २०२० पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला.

वाहतूक नियम मोडल्यास एसटी चालकांचा कापणार पगार

एसटी चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी, संबंधित एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार

एसटी महामंडळाच्या बसचं लोकेशन दर्शविणाऱ्या आणि ही माहिती एलसीडी टीव्ही संचाद्वारे बसस्थानकांवर प्रसारीत करणाऱ्या वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणालीचा (vehicle tracking and passenger information system) परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या नव्या प्रणालीमुळं एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे, हे प्रवाशांना समजणार आहे. तसंच, बस स्थानकावर एलसीडी टीव्ही संचाद्वारे एसटी गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची व सुटण्याची वेळ कळणार आहे.

२० किलोपेक्षा जास्त वजनाचं सामान नेल्यास पाचपट भाडं

२० किलोपेक्षा अधिक वजनाचं सामान असल्यास पाचपट भाडं आकारण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय राज्यातील प्रत्येक आगारांमध्ये पाठविण्यात आला आहे. तसंच, सामानाच्या भाडेवाढीच्या निर्णयबाबत प्रवाशांना माहिती मिळावी यासाठी प्रत्येक आगारातील फलकावर याबाबत पत्रकं लावण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांकडं असलेलं सामान २० किलोपेक्षा कमी वजनाचं असल्यास प्रवाशांना समान मोफत नेता येणार आहे.

एसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड

एसटी महामंडळानं बसचं स्टेअरींग आता महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १६३ महिला चालक तथा वाहकांची निवड करण्यात आली आहे.

इलेक्ट्रीक बस

इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पहिल्या एसटी बसचं लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. 'शिवाई' असं या बसचं नाव ठेवण्यात आलं असून ही बस दादर ते पुणे दरम्यान धावणार आहे. या पर्यावरणपूरक बसमुळे एसटी महामंडळा (MSRTC)च्या खर्चात बचत होणार आहे. विजेवर चालणाऱ्या अशा एकूण १५० बस एसटी महामंडळ खरेदी करणार असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

पूरग्रस्तभागातील एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार ३ महिन्यांचा पगार

राज्यभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथील भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळं अनेक कुटुंबीय बेघर झाली होती. यामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून, त्यांचंही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं. त्यामुळं या एसटी कर्मचाऱ्यांना ३ महिन्याचं वेतन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एसटी महामंडळाचा कर्नाटक महामंडळाला भाडेवाढीचा सल्ला

कर्नाटक एसटी महामंडळाच्या एसटीचं तिकीट भाडं कमी असल्यानं ते महाराष्ट्र एसटी मंडळानं वाढविण्यास सांगितल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी महाराष्ट्र एसटी महामंडळानं कर्नाटक एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार करून, महाराष्ट्र एसटी महामंडळासारखे जादा भाडे आकरण्यास सांगितलं.

प्रवाशांना पाण्याची सुविधा

रेल्वेप्रामणं 'रेलनीर'च्या धर्तीवर एसटीनं बाटलीबंद पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एसटी स्थानकं आणि आगारांमध्ये बाटलीबंद पाणी विकण्याच्या नावाखाली प्रवाशांची लूट होते. बाटली थंड करण्याच्या नावाखाली एका बाटलीसाठी २२ ते २५ रुपये आकारण्यात येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी एसटी महामंडळानं खासगी कंपनीच्या माध्यमानं बाटलीबंद पाणी विकण्याचा निर्णय घेतला.

दिव्यांग प्रवाशांसाठी एसटीच्या बस थांब्यावर व्हिलचेअर

दिव्यांग प्रवाशांसाठी प्रत्येक बस स्थानकावर व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबत एसटी महामंडळानं राज्यातील प्रत्येक विभागाला सूचना दिल्या आहेत.

एसटीची हंगामी भाडेवाढ मागे

एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली. त्यानुसार ६ नोव्हेंबरपासून एसटीचे नियमित तिकीट दर आकारण्यात येत आहेत.

नवीन बनावटीच्या बस

एसटीच्या ताफ्यात नवीन बनावटीच्या २० बस दाखल झाल्या आहेत. विनावातानुकूलित ३० आसनी आणि १५ स्लीपर असा ४५ सीटच्या बस कोल्हापूर आगारात दाखल झाल्या आहेत.

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यसाठी सीसीटीव्ही

एसटी आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. मुंबई सेंट्रल, कुर्ला-नेहरूनगर, परळ स्थानकांसह राज्यातील एकूण ४९३ एसटी स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी सद्यस्थितीत ३६३ एसटी स्थानकांतील सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहेत.

परळ-पाटगाव या मार्गावर नवी एसटी बस

परळ-पाटगाव या मार्गावर नवी एसटी बस धावणार आहे. ही बस गुजरात एसटी महामंडळाच्या धर्तीवर राज्याच्या एसटी महामंडळात दाखल करण्यात आली आहे. सीटर कम स्लीपर बस (शयनयान आणि आसन) ही बस मंगळवारी परळ-पाटगाव या मार्गावर मार्गस्थ करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात

उत्पन्न नसल्यानं महामंडळाला आर्थिक डबघाईला सामोरं जावं लागत आहे. डिझेल खरेदीसाठी काही आगारांकडे पैसे नसल्याचं समजतं. तसंच, पैसे उभे करण्यासाठी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पगाराची कपात केली जात आहे.

खर्चात कपात करण्याचा निर्णय

आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळानं आपल्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील विविध विभागातील महाव्यवस्थापकांसह विभाग नियंत्रकांना अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.

स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीनं (एसटी) विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासभाडं सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्टकार्ड’ योजना बंधनकारक करण्यास १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे.


मोनो व मेट्रो (एमएमआरडीए)

 • मेट्रोच्या ३ प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी
 • १० बूम लिफ्टस् ट्रकची खरेदी
 • सुटे भाग मागवण्याचा निर्णय
 • मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान खाद्यपदार्थावर बंदी
 • ठाणे शहरासाठी वर्तुळाकार मेट्रो
 • डेबिट, क्रेडिट कार्डाद्वारे घेता येईल मेट्रोचं तिकीट
 • ६ मेट्रो मार्गिकांचं काम २०२२ पर्यंत पूर्ण
 • मेट्रो रूट सर्च सुविधा
 • पहिली प्रोटोटाइप मेट्रो ट्रेन
 • मेट्रो ४ A मार्गिकेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती
 • मोनोरेलला आणखी हायटेक बनवणार
 • मोनोरेल स्थानकांवर सोलार पॅनल
 • मोनोच्या ताफ्यात आणखी १० लोकल

मेट्रोच्या ३ प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-१०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई मेट्रो मार्ग-११), कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाच्या (मुंबई मेट्रो मार्ग १२) या तिन्ही प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मेट्रो मार्ग १० हा एकूण ११.२ किमी लांब असणार आहे, त्यासाठी ४ हजार ४६७ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे, यापाठोपाठ मेट्रो मार्ग ११ हा ११.४ किमी तर मेट्रो १२ ही २०.७५ किमीचा असणार आहेयासाठी अनुक्रमे ८ हजार ७३९ कोटी व ४ हजार १३२ कोटी इतका खर्च येणार आहे. मेट्रो ११ प्रकल्पातील ८ स्थानके ही भुयारी असणार आहेत.

१० बूम लिफ्टस् ट्रकची खरेदी

मोनोच्या प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास यामधून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएनं १० बूम लिफ्टस् ट्रक खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं आहे.

सुटे भाग मागवण्याचा निर्णय

प्रवाशांची गैर सोय होऊ नये आणि मोनो रेल्वेच्या गाड्या सुस्थितीत रहाव्यात, बिघाड झाला तर वेळीच दूर करता यावा, यासाठी पुन्हा एकदा एमएमआरडीए सुटे भाग मागवण्याचा निर्णय घेतला.

मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान खाद्यपदार्थावर बंदी

मुंबई मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ नेण्यावर मुंबई मेट्रो प्रशासनाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना मेट्रोमध्ये केवळ पाणी घेऊन प्रवास करता येणार आहे. नियमाचं उल्लंघन झाल्यास संबंधीत प्रवाशाकडून दंड आकारला जाणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.

ठाणे शहरासाठी वर्तुळाकार मेट्रो

ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्यातील दाट वस्तीच्या भागातील वाहतुकीची समस्या यामुळे सुटण्यास मदत होणार आहे.

डेबिट, क्रेडिट कार्डाद्वारे घेता येणार मेट्रोचं तिकीट

मेट्रोचा प्रवास कॅशलेस करण्यासाठी 'मुंबई मेट्रो १' कंपनीनं सर्व स्थानकांवर तिकिटांचे पैसे देण्यासाठी एमटीएम डेबिट आणि क्रेडिट कार्डांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

६ मेट्रो मार्गिकांचं काम २०२२ पर्यंत पूर्ण

मेट्रो मार्ग -२ बी, ३,४,४ ए, ५ आणि ६ यामार्गाचे ११९ किलोमीटरचं तसंच अतिरिक्त १६९ किलोमीटर मार्गिकेचं काम २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल.

मेट्रो रूट सर्च सुविधा

पेटीएम कंपनीनं मेट्रो रूट सर्च सुविधा सुरु करणार असल्याचं जाहीर केलं असून, या सुविधेचा फायदा मेट्रो रेल्वे प्रवाशांना होणार आहे.

पहिली प्रोटोटाइप मेट्रो ट्रेन

जुलै २०२० पर्यंत मुंबईला पहिल्या प्रोटोटाइप मेट्रो ट्रेनची डिलिव्हरी मिळणार आहे. याबाबत मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं माहिती दिली आहे. या प्रोटोटाइप मेट्रो ट्रेन दहिसर ते डी.एन. नगर (2A), डी.एन. नगर ते मंडाले (2 B) आणि अंधेरी ते दहिसर (7) या मार्गांवर चालवण्यात येणार आहेत.

मेट्रो ४ A मार्गिकेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कासारवडवली ते गायमुख या मेट्रो ४ A मार्गिकेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.

मोनोरेलला आणखी हायटेक बनवणार

वडाळा डेपो आणि जेकब सर्कल या मार्गावर प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे. आता मोनोरेल प्रशासनाने मोनोरेलला आणखी हायटेक बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

मोनोरेल स्थानकांवर सोलार पॅनल

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेल स्थानकांच्या छतांवर सोलार पॅनल लावण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या विजबिलावर अंकुश घालण्यासाठी मोनोरेल प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मोनोच्या ताफ्यात आणखी १० लोकल

मोनोच्या स्थानकांवर मोनोच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ व्हावी, यासाठी आणखी १० मोनो विकत घेण्याचा निर्णय एमएमआरडीए प्राधिकरणानं घेतला आहे.


पुणे-मुंबई हायपरलूप

डीपी वर्ल्ड एफझेडई आणि हायपरलूप टेक्नॉलॉजी, आयएनसी यांच्या भागीदारी समूहाला प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यात आलं. पुणे-मुंबई या दोन महानगरांना हायपरलूप (हवा विरहित पोकळी) तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा हा अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. हा प्रकल्प पुणे-मुंबई (वाकड ते कुर्ला बीकेसी) दरम्यान ११७.५० कि.मी. अंतरासाठी केला जाणार आहे. त्यासाठी ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक होणार असून अशा प्रकारचा हा देशातील पहिला प्रकल्प आहे.वाहतुकीच्या नियमांत बदल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे बहुप्रतिक्षीत मोटर वाहन संशोधन विधेयक २०१९ राज्यसभेत मंजूर झाले. अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणं, विना परवाना वाहतूक, धोकादायक पद्धतीनं वाहन चालवणं, दारु पिऊन गाडी चालवणं, वेगानं गाडी चालवणं, आणि निश्चित सीमेपेक्षा अधिक लोकांची वाहतूक करणं अशा अनेक गोष्टींसाठी कायद्यात शिक्षेची आणि दंडाची तरतुद करण्यात आली आहे.

नवे दंड आणि शिक्षा

मुलांसाठी :

या नव्या कायद्यात सेक्शन १९४-बी नुसार ४ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना कारमध्ये सीटबेल्ट तर दुचाकीवर हेल्मेट बंधनकारक असणार आहे. जर हे पाळले नाही तर वाहन मालकावर १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल.

‘रिकॉल ऑफ व्हेईकल’ :

या कायद्यामुळं पर्यावरणाला हानी करणाऱ्या आणि प्रदुषणाची निश्चित मर्यादा ओलांडणाऱ्या गाड्यांना बाजारातून हटवण्याचं अधिकार सरकारला मिळाले आहेत.

थेट इंजिनिअर अथवा ठेकेदार दोषी :

या जून्या कायद्यात रोड निर्मितीतील दोषांमुळं अपघात झाल्यास दोषी ठेकेदार अथवा इंजिनिअरवर कारवाईची कोणतीही तरतुद नव्हती. मात्र, या नव्या कायद्यात यासाठी विशेष तरतुद आहे. यात ठेकेदाराला १ लाख रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो.

अल्पवयीन चालक :

लहान मुलांच्या हातात वाहन दिल्यास जुन्या कायद्यामध्ये १ हजार रुपयांच्या दंडाची तरतुद करण्यात आली होती. मात्र, नव्या कायद्यात हा दंड २५ हजार रुपये करण्यात आला आहे. ३ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षाही ठेवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलावरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

‘हिट अँड रन’ :

धडक देऊन फरार झालेल्या वाहन चालकावर जुन्या कायद्यात पीडित जखमी असेल तर १२ हजार ५०० रुपयांचा दंड होता. तसंच, पीडिताचा मृत्यू झाला तर आरोपी वाहन चालकावर २५ हजार रुपयांच्या दंडाची तरतुद केली होती. मात्र, नव्या कायद्यानं या गुन्ह्यांना अनुक्रमे ५० हजार आणि २ लाख रुपये दंड ठेवण्यात आला आहे.

विना हेल्मेट :

दुचाकी चालकाकडं हेल्मेट नसल्यास जून्या कायद्यात १०० रुपयां दंडाची तरतुद होती. मात्र, आता १,००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

विनाविमा वाहन :

जून्या कायद्यात विनाविमा वाहन चालवल्यास १०० रुपये दंडाची तरतुद होती. मात्र नव्या कायद्यात आता २,००० रुपये दंडांची तरतुद केली आहे.

वाहनांची सदोष बनावट :

वाहनाच्या सदोष बनावटीमुळे अपघात झाल्यास डिलरवर १ लाख रुपये आणि वाहन निर्माता कंपनीवर १०० कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

वेग मर्यादेचं उल्लंघन :

जून्या कायद्यात वेग मर्यादेचं उल्लंघन केल्यास ४०० रुपये दंडाची तुरतुद होती. मात्र, नव्या कायद्यात २ ते ४ हजार रुपये दंडांची तरतुद केली आहे.

ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह :

दारु पिऊन वाहन चालवल्यास २ हजार रुपयांऐवजी १०,००० रूपये दंड, तुरुंगवासाचीही शिक्षा सुनावली जाणार आहे.

सीट बेल्ट :

वाहन चालवताना सीट बेल्ट न घातल्यास १,००० रुपये दंड आकारला जाणार आहे. याआधी १०० रुपये दंड आकारले जात होते.

रॅश ड्रायव्हिंग :

वाहन चालवतेवेळी रॅश ड्रायव्हिंग केल्यास ५०० रुपयांऐवजी ५,००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

धोकादायक वाहतूक :

धोकादायक वाहतूक आढळल्यास १,००० रुपयांऐवजी ५,००० रुपये दंड ठोठावला जाणार आहे.


जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय

मुंबई पोर्ट ट्रस्टनं जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनेक प्रकल्प पोर्ट ट्रस्टनं हाती घेतले आहेत. त्यामध्ये वाॅटरटॅक्सी हा एक प्रकल्प मोडतो. त्यानुसार या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यानिविदेला ३ कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. या निविदेनुसार अखेर खासगी टॅक्सीसेवेतील आघाडीच्या अशा उबरच्या माध्यमातून वाॅटरटॅक्सी सुरू करण्याचा निर्णय पोर्ट ट्रस्टनं घेतला आहे.


विमानसेवा

 • मुंबई ते प्रयागराज विमानसेवा
 • बारकोड स्कॅन करुन थेट विमानानं प्रवास
 • इंडिगो एअरलाइन्सची आंतरदेशी व आंतरराष्ट्रीय विमान सेवा
 • मुंबई-लंडनदरम्यान आठवड्याला तब्बल ३३ विमान फेऱ्या
 • मुख्य धावपट्टी १०२ दिवस बंद

मुंबई ते प्रयागराज विमानसेवा

मुंबई ते थेट प्रयागराजपर्यंत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो एअरलाईन्सने घेतला. २० एप्रिल पासून बमरोली एअरपोर्ट ते मुंबई एअरपोर्ट अशी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली. ही विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू आहे.

बारकोड स्कॅन करुन थेट विमानानं प्रवास

प्रवासांना थेट मोबाईलद्वारे बोर्डिंग पासवरील बारकोड (क्युआर कोड) स्कॅन करता येणार आहे. दरम्यान अशा पद्घतीचा तंत्रज्ञानाचा वापर करणार मुंबई विमानतळ हे देशातील पहिलं विमानतळ ठरलं आहे. या निर्णयानुसार मुंबई विमानतळावरील प्रवाशांचा बोर्डिंग पासवर शिक्का मारण्यासाठी गर्दीत उभ न राहता, तुम्ही तात्काळ त्यावरील बारकोड (क्यूआर कोड) स्कॅन करून विमानतळावर प्रवेश करू शकता. या बोर्डिंग पास प्रिंट करण्याचीही तुम्हाला गरज लागणार नाही. यामुळं प्रवाशांना सिक्युरिटी चेकसाठी लागणारा वेळ वाचणार आहे.

इंडिगो एअरलाइन्सची आंतरदेशी व आंतरराष्ट्रीय विमान सेवा

भारतातील नागरिकांना कमी दरात विमान सेवा देणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सनं मुंबईतून नवीन आंतरदेशी आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई-लंडनदरम्यान आठवड्याला तब्बल ३३ विमान फेऱ्या

मुंबई-लंडनदरम्यान आठवड्याला तब्बल ३३ विमानसेवा सुरू केली आहे. व्हर्जिन अटलांटिक कंपनीनं बोइंग ८७८-९०० या विमानाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनमधील हिथ्रो विमानतळासाठी थेट विमानसेवा लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सुरू केली.

मुख्य धावपट्टी १०२ दिवस बंद

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीची डागडुजी व दुरुस्ती करण्यात येणार आहे. डागडुजी व दुरुस्तीचं कामामुळं तब्बल १०२ दिवस मुख्य धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा