Advertisement

'डेक्कन क्वीन'चं सारथ्य 'या' महिलेच्या हाती


'डेक्कन क्वीन'चं सारथ्य 'या' महिलेच्या हाती
SHARES

जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला महिला मोटरमन ‘डेक्कन क्वीन’चं सारथ्य करणार आहे. मुंबई ते पुणे या मार्गावर ही एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे. रेल्वेतील महिलांचं स्थान या उपक्रमामुळे आणखी बळकट होईल, असं म्हटलं जात आहे.


कुणाच्या हाती कंट्रोल?

लोको पायलट सुरेखा यादव यांच्या हाती ‘डेक्कन क्वीन’चे कंट्रोल्स असणार आहेत. महिला असिस्टंट तृष्णा जोशी आणि महिला गार्ड श्वेता घुणे या देखील त्यांना साथसोबत करणार आहेत. लांब पल्ल्याची गाडी चालवण्याची एखाद्या महिला मोटरमनची ही पहिलीच वेळ असणार आहे.


पहिल्यांदाच संधी

यादव १९८९ पासून मध्य रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून कार्यरत असल्या, तरी 'डेक्कन क्वीन' चालवण्याचं काम त्या पहिल्यांदाच करणार आहेत. याशिवाय 'डेक्कन क्वीन'मध्ये पुरुष पोलिसांच्या जागी रेल्वे पोलिस फोर्सच्या (RPF) महिला काम पाहणार आहेत.


दुसरा क्रमांक

या उपक्रमातून पूर्णपणे महिलांच्या हाती नियंत्रण असलेली 'डेक्कन क्वीन' ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रेन ठरणार आहे. मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल ही हार्बर रेल्वे मार्गावरील ट्रेन महिलांनी चालवली होती.


सीएसएमटी स्थानकात तक्रार बूथ

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मध्य आणि पश्चिम रेल्वेवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात तक्रार बूथ उभारण्यात येणार आहे. ज्यात महिला आपल्या विविध तक्रारी, प्रवासाच्या दृष्टीने काही सल्ले नोंदवू शकणार आहेत.


एलटीटी स्थानकात विशेष सोय

एलटीटी स्थानकात काम करणाऱ्या महिलांसाठी विशेष सोय करण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी चेजिंग रुम, वॉशरुम्सची सुविधा देण्यात येणार आहे. सॅनिटरी नॅपकीन्स डिसपेन्सरीजची सुविधा असणार आहे.

दररोज मुंबईत लोकल ट्रेनने ४० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात २० ते २५ टक्के महिला प्रवाशांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना विशेष सुविधा देण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न असल्याचं मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा