Advertisement

मुंबई ते ठाणे प्रवास होणार सोपा, जाणून घ्या कधी धावणार मेट्रो

पहिल्या टप्प्यातील मुलुंड ते घोडबंदर मेट्रो संदर्भात मोठी अपडेट

मुंबई ते ठाणे प्रवास होणार सोपा, जाणून घ्या कधी धावणार मेट्रो
SHARES

मुंबई आणि ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रो 4 मुळे हा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. ठाणे ते मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो मार्गावर दोन टप्प्यात सेवा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात घोडबंदर ते मुलुंड दरम्यान मेट्रो धावणार आहे. यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने महत्वाचे अपडेट दिले आहे. 

2025 पर्यंत मेट्रो 4 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर मेट्रो सेवा सुरु होईल, यासाठी काम सुरु असल्याचे एमएमआरडीएने सांगितले.

मुलुंड ते ठाण्यातील घोडबंदर रोड या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गाबरोबरच स्थानकाच्या उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. या मार्गावरील अनेक स्थानकांचे सिव्हिल काम 50 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. 

स्थानकाच्या सिव्हिल कामासोबतच पहिल्या टप्प्यातील सात स्थानकांच्या फिनिशिंगचे काम सुरू करण्याची तयारी आता एमएमआरडीएने सुरू केली आहे. याअंतर्गत मुलुंड फायर ते माजिवडा जंक्शन दरम्यान सात स्थानके बांधण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 198 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत स्टेशनवर स्टेनलेस स्टील बसवणे, प्लंबिंग, टाइल्स, पेंट, प्लास्टर, डेक रूफटॉप आणि इतर सुविधा विकसित करण्याचे काम केले जाणार आहे. फिनिशिंगचे काम सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने कंत्राटदाराचा शोध सुरू केला आहे.

वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो 4-ए बांधण्यात येत आहेत. मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के तर मेट्रो 4-अ चे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे. 

मेट्रो-4 कॉरिडॉरसाठी कारशेड बांधण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रो-4, मेट्रो-4-अ साठी मोघरपाडा येथे कारशेड तयार करण्यासाठी सुमारे 905 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एलबीएस मार्गासह इतर ठिकाणी मेट्रोचे काम गेल्या वर्षीपर्यंत सुरू होऊ शकले नव्हते. यामुळे एमएमआरडीएने आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुख्य कंत्राटदाराच्या जागी उपकंत्राटदारांमार्फत रखडलेली कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

प्रशासनाच्या या निर्णयानंतर गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेल्या मेट्रो 4 मार्गाच्या कामाला वेग आला आहे. बांधकामाची कामे वेगाने सुरू झाली आहेत. एलबीएस मार्गाच्या काही भागांवर तसेच इतर मार्गांवरही बरेच काम अपूर्ण आहे. 

यापूर्वीच या मार्गाचे काम विविध कारणांमुळे विस्कळीत झाले आहे. आता निवडणुकीपूर्वी एमएमआरडीएला त्यातील काही भाग प्रवाशांसाठी खुला करायचा असल्याचे सांगितले जात आहे.



हेही वाचा

दिवाळीसाठी मुंबई, पुणे, नागपूरसाठी स्पेशल ट्रेन्स धावणार

ठाणेकरांना टोलमाफीची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा