Advertisement

एसटीला 'या'मुळे ७ कोटी ८२ लाखांचा धनलाभ

गणेशोत्सवाच्या कालावधीत ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान 'गणपती स्पेशल' ३२९० बसेस सोडण्यात आल्या होत्या.

एसटीला 'या'मुळे ७ कोटी ८२ लाखांचा धनलाभ
SHARES

गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांच्या वाहतुकीतून एसटीला तब्बल ७ कोटी ८२ लाख ३२ हजार रूपयांचे उत्पन्न मिळालं आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान 'गणपती स्पेशल' ३२९० बसेस सोडण्यात आल्या होत्या. या विषेश एसटी सेवेमधून सुमारे ३ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुखरूप प्रवास केल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीवर दाखविलेल्या प्रेमामुळंच कोट्यावधीचं उत्पन्न मिळालं, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवात प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा प्रदान करणाऱ्या चालक-वाहकांबरोबरच त्यांना साथ देणारे यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी यांचे ॲड. अनिल परब यांनी कौतुक केलं.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचं एक अतुट नातं आहे. त्यामुळं दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटी महामंडळानं चाकरमान्यांसाठी २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सुरक्षित प्रवास म्हणून चाकरमान्यांनी एसटीवर विश्वास दाखविल्यानं अवघ्या काही दिवसांतच जादा गणपती स्पेशल गाड्या फूल झाल्या होत्या.

चाकरमान्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळं एसटीला गणेशोत्सवादरम्यान सुमारे ३२९० गाड्या सोडाव्या लागल्या. ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान तब्बल ३२९० बसेसद्वारे ८२९९ फेऱ्या पार पडल्या. यामधून एसटीला ७ कोटी ८२ लाख ३२ हजार रूपयांचे उत्पन्न मिळालं.

'यंदा गणेशोत्सवादरम्यान कोणतेही विघ्न न येता जादा वाहतूक सुरळीत पार पडली. एसटी महामंडळाच्या नियोजनबद्ध सेवेमुळे भाविकांना मुंबई, ठाणे, पालघर व आसपासच्या परिसरातून थेट गावापर्यंत सुरक्षित पोहचविण्याचे अभिवचन एसटीने पूर्ण केले आहे. भविष्यातहि चाकरमान्यांच्या मदतीला एसटी नेहमीच तत्पर असेल', अशी आशा मंत्री, ॲड. परब यांनी व्यक्त  केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा