Advertisement

एसटी संपातील १० हजार कर्मचारी निलंबित

आपल्या मागण्यांसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी मागील १ महिन्यापासून आंदोलन करत आहेत.

एसटी संपातील १० हजार कर्मचारी निलंबित
SHARES

आपल्या मागण्यांसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी मागील १ महिन्यापासून आंदोलन करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमधील पगारवाढीची मागणी राज्य सरकारनं पुर्ण केली, परंतू विलनीकरणाची मागणी अद्याप प्रलंबित असल्यानं कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. अशातच आता १० हजार ३० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे.

एसटी संपात सहभागी झालेल्या १० हजार ३० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने बुधवारी रात्री जाहीर केली. याचबरोबर दोन हजार १४ रोजंदार कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली.

एसटी कर्मचारी सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने तब्बल एक हजार ९९६ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. राज्यातील ११५ आगार पूर्णपणे, तर १३५ आगार अंशतः बंद आहेत.

मागील ४३ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह लाखो सवलतधारकांच्या खिशावर महागड्या प्रवासाचा भार पडत आहे. संपामुळे सवलतीसाठी आवश्यक स्मार्ट कार्ड नोंदणी-वितरण प्रक्रिया बंद आहे.

नव्या वर्षात, अर्थात एक जानेवारीपासून हे कार्ड नसलेल्यांना सवलत मिळणार नाही. यामुळे 'संप मिटेना, स्मार्ट कार्ड मिळेना,' अशी सवलतधारकांची स्थिती झाली आहे.

तब्बल ३० दिवसांनंतर बुधवारी राज्य परिवहन महामंडळाच्या येवला आगारातून दोन बसेस येवला ते नाशिक मार्गावर धावल्या. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी तीन चालक आणि दोन वाहक बुधवारी कामावर हजर झाले.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा