Advertisement

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू; पण प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

कोरोना संक्रमण नियंत्रणात आल्यानंतर सोमवार १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू; पण प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर
SHARES

कोरोना या जीवघेण्या व्हायरसनं गतवर्षी मुंबईसह राज्यभरात प्रवेश केला. या कोरोनामुळं मुंबईतील सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, दुकानं आणि मुंबईची लाइफलाइन लोकल सेवाही बंद झाली. याआधी केवळ बॉम्ब स्फोट व जास्तीचा पाऊस झाल्यास रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल बंद झाली होती. मात्र, गतवर्षी पहिल्यांदाच एका व्हायरसमुळं मुंबई लोकल बंद झाली. लोकल बंद झाल्यानं आपोआपचं सर्व यंत्रणा बंद झाल्या. मात्र, तब्बल मुंबई उपनगरीय लोकल सेवा अखेर ११ महिन्यांनी सुरू झाली आहे. कोरोना संक्रमण नियंत्रणात आल्यानंतर सोमवार १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे.

सर्वसामान्य प्रवासी ३ टप्प्यांत रेल्वे प्रवास करू शकतात. रेल्वे सेवा सुरू होण्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासास मुभा आहे. याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला सकाळी ७ ते दुपारी १२ ते दुपारी ४ ते ९ या वेळेत प्रवास करण्याची परवानगी नाही. रेल्वेनं गर्दी टाळण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. राज्य सरकारनं उशिरा का होईना प्रवाशांच्या आरोग्याची काळजी व दक्षता घेत तब्बल ११ महिन्यानंतर लोकल सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. 

लोकल सेवा व नियोजित वेळेसाठी दिलेली परवानगी यात अंतर असलं तरीही नोकरी धंद्यानिमित्त तसेच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत मुंबई लोकल दाखल झाली आहे. कोरोना संसर्गामुळं मागील ११ महिने ही लोकल सेवा पूर्णपणे बंद होती. मात्र सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकल सुरू झाल्यानं पहाटे पासूनच तिकीट खिडकीवर प्रवाशांची लगबल होती.

रेल्वे प्रशासनानं प्रत्येक रेल्वेस्थानकावर तिकीट खिडक्या वाढवणं गरजेचे होतं पण त्या वाढवल्या नसल्यानं तिकिटासाठी प्रवाशांना लांबच लांब रांगा लावून सुद्धा वेळेत तिकीट मिळत नसल्याचं चित्र देखील रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळालं. प्रवाशांना दिलेल्या वेळेशिवाय कुणी सर्वसामान्य नागरिक लोकल प्रवास करताना आढळून आला तर त्याला २०० रुपये दंड व एक महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्यामुळं सर्वसामान्यांना विशिष्ट वेळेतच प्रवास करावा लागणार आहे.

प्रवासाची वेळ

  • सकाळी पहिली लोकल ते सकाळी ७ वाजेपर्यंत. 
  • दुपारी १२ पासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत.
  • रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास.

प्रवास न करण्याची वेळ

  • सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत.
  • दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत.

प्रवासासाठी नियम व अटी

  • प्रवेशद्वारांवरून स्थानकात येणारे, लोकलची वाट पाहणारे आणि स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी मास्कचा वापर बंधनकारक असेल.
  • विनामास्क स्थानकावर आलेल्या प्रवाशांवर कारवाई, प्रवासास मनाई.
  • कारवाई पोलीस, महापालिका, नगरपालिकांच्या मदतीनं केली जाणार.
  • मास्कसह स्थानकात शिरताना, लोकलची वाट पाहाताना प्रवाशांनी अंतर नियम पाळावा यासाठीही उपाययोजना.
  • स्थानकाच्या कोणत्याही भागात प्रवाशांची अपेक्षेपेक्षा गर्दी होऊ नये यासाठी बॅरिकेड, दोरीच्या साहाय्याने आखणी.
  • सर्वसामान्यांना परवानगी असलेल्या वेळा, करोना नियम, सुरक्षित प्रवासासाठी सूचनेबाबत पोलीस मेगाफोनद्वारे उद्घोषणा.
  • प्रत्येक रेल्वे स्थानकात अपेक्षित गर्दीनुसार राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), गृहरक्षक आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षित जवान तैनात असतील. 
  • प्रवाशांचा ओघ पाहून प्रत्येक स्थानकातील किती प्रवेशद्वारे खुली करावी याचा निर्णय घेतला जाईल. 
  • प्रवेशद्वारावर आणि स्थानकांवर प्रवाशांची जास्त गर्दी झाल्यास ती नियंत्रित ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसाच्या मदतीनं काही कालावधीसाठी स्थानकांची प्रवेशद्वारे बंद केली जातील.
  • स्थानकांवरील गर्दी ओसरताच प्रवेशद्वारावरील प्रवांशांना स्थानकात सोडले जाईल. 
  • मुभा असलेल्या वेळेत गर्दीनुसार प्रवाशांनाही थोडा संयम पाळावा लागेल.
  • गर्दी वाढल्यास, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना केली जाईल.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आला असला तरी अद्यापही करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळं लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु होत असली तरी फेस मास्क, सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टनसिंग वापरण्याच्या सूचना वेळोवेळी होत असतात. मात्र, तरीही या सूचनांकडे प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. सर्वांना लोकल प्रवासांची मुभा देण्यात आली असली तरी लोकल प्रवासासाठी काही वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसंच, या वेळेचं बंधन नागरिकांनी पाळलं नाही तर शिक्षा व दंडही आकारण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी, बोरिवली या तिकीटघरातील सर्व एन्ट्रन्स प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहेत. जेणेकरुन अधिक गर्दी होणार नाही. त्याचबरोबर विनातिकीट प्रवास करु नये यासाठी प्रत्येक स्थानकात टीसीचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

स्थानकांवर गर्दी विभागण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील ३०१ तिकिट खिडक्या ६४२ शिफ्टमध्ये सुरु ठेवण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरील सर्व एटीव्हीएम सुरु करण्यात आल्या आहेत. सर्व स्थानकांतील सरकते जिने, लिफ्ट सुरु करण्यात आले आहे. स्थानकांतील १९८ प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहेत. त्यामुळं स्थानकात प्रवेश करण्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. सध्या ८६ प्रवेशद्वार खुले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा