1 नोव्हेंबरपासून मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आणि मांडव्यादरम्यान सुरू केलेली थेट वॉटर टॅक्सी सेवा प्रतिसादाअभावी अखेर बंद करण्यात आली आहे. ‘नयनतारा शिपिंग’ कंपनीने सोमवार ते शुक्रवार थेट सेवा बंद केली आहे.
यापुढे केवळ शनिवारी आणि रविवारी बेलापूर ते मांडवा मार्गे मुंबई अशी ही सेवा चालवण्यात येणार आहे.
मुंबईकरांना झटपट अलिबागला पोहोचता यावे, यासाठी १ नोव्हेंबरपासून मुंबई ते मांडवा अशी थेट वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. ही देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची, वातानुकूलित अशी ‘वॉटर टॅक्सी’ ‘नयनतारा शिपिंग’ कंपनीने सुरू केली. या वॉटर टॅक्सीने अवघ्या ४० मिनिटांमध्ये मुंबईहून अलिबागला पोहोचणे शक्य होत होते.
मुंबई – मांडवा जलमार्गावर आठवडय़ाचे सातही दिवस ही सेवा सुरू होती. दिवसाला या सेवेच्या सहा फेऱ्या चालवण्यात येत होत्या. या वॉटर टॅक्सीला पर्यटक आणि प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवातीपासूनच प्रतिसाद न मिळाल्याने तिकीट दर कमी करण्यात आले होते. ४०० आणि ४५० रुपये असलेले तिकीट दर २५० आणि ३५० रुपयांवर आणले होते. मात्र, त्यानंतरही प्रवासी संख्या वाढली नाही.
कंपनी लवकरच गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर ही नवी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. ती सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस चालवण्यात येईल.
बेलापूर ते मांडवा व्हाया मुंबई क्रूझ टर्मिनल आणि मांडवा ते बेलापूर व्हाया मुंबई क्रुझ टर्मिनल अशी सेवा केवळ शनिवार आणि रविवारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा