Advertisement

वाहतूककोंडी टाळण्यासाठी स्ट्रीट पार्किंगचा पर्याय

मुंबईसह आसपासच्या परिसरात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळं मुंबईतील मुख्य रस्ते व गल्लोगल्ली वाहतूक कोंडी होत आहे.

वाहतूककोंडी टाळण्यासाठी स्ट्रीट पार्किंगचा पर्याय
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळं मुंबईतील मुख्य रस्ते व गल्लोगल्ली वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय पार्किंगचा प्रश्नही समोर आला असून, वाहनाच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्यानं रस्त्यावर वाहतूक पार्क केल्याचं पाहायला मिळतं. शिवाय, पार्किंग व्यवस्था नसल्यानं वाहनं नो पार्किंगमध्ये पार्क करण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी होत आहे. यावर पर्याय म्हणून वाहतूक पोलिसांनी आता स्ट्रीट पार्किंगचा नवा उपक्रम हाती घेतला आहे.

मुंबईत सुमारे ३६ लाख वाहनं असून, त्या तुलनेत वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. मेट्रोच्या कामामुळं वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. नवीन इमारती, आस्थापनाच्या बांधकामादरम्यान वाहतूक व्यवस्था करणं बंधनकारक आहे. मात्र, आजही बऱ्याच जुन्या इमारतींमध्ये वाहतूक व्यवस्था नसल्यानं रस्त्यावरच वाहनांच्या रांगा लागत आहेत.

मागील काही दिवसांत अवैध पार्किंगविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर पावलं उचलत नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. काही ठिकाणी पोलिसांना वादालाही तोंड द्यावं लागत आहे. जागा नसल्यानं वाहनं पार्क कुठे करायची? असा सवाल काही रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पर्यायी व्यवस्था देण्याची नागरिकांची मागणी आहे.

वाहने आणि पादचाऱ्यांनी फुलून जाणाऱ्या मुंबईतील गोखले रस्ता, महर्षी कर्वे रस्ता, एल.बी.एस मार्ग, न्यू लिंक रोड आणि एस. व्ही. रोड या रस्त्यांवर कोंडीची समस्या कायम आहे. मात्र, आता प्रस्ताव आल्यास संबंधित रस्त्यावरील वाहतूक कोंडी, नो पार्किंगमध्ये वाहनं उभी केल्यास पादचाऱ्यांना होणारा त्रास, संबंधित इमारत, व्यावसायिक आस्थापनेव्यतिरिक्त अन्य वाहनं इथं उभी राहणार नाहीत, याचं नियोजन आणि अन्य निकष पडताळून त्यानंतरच वाहने पार्क करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात येणार आहे.

कफ परेडमधून ३ प्रस्ताव

स्ट्रीट पार्किंगची परवानगी मागणारे ३ प्रस्ताव कफ परेड परिसरातून प्राप्त झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. याबाबत वाहतूक पोलीस अधिक माहिती घेत आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून परवानगी मागणाऱ्यांकडं खरोखरच वाहनतळ नाही, याची खातरजमा केली जाणार आहे. या ठिकाणाहून सार्वजनिक वाहन तळ लांब आहे का? किती वाहनं संबंधित ठिकाणी उभी राहू शकतील? त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही ना? या बाबी प्रत्यक्ष पडताळून परवानगी दिली जाणार आहे.

महापालिकेला द्यावे लागेल शुल्क

हा उपक्रम मोफत नसून स्ट्रीट पार्किंगसाठी महापालिकेला शुल्क द्यावं लागणार आहे. त्यात वाहनाच्या सुरक्षेबरोबर त्या ठिकाणी परवानगी नसलेली अन्य वाहनं पार्क केली जाणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित सोसायटीवर असणार आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात याची अंमलबजावणी करून पुढे संपूर्ण मुंबईत हा उपक्रम सुरू करण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न आहे.हेही वाचा -

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा