एम इंडिकेटरवर रेल्वेसोबतच एसटीचेही वेळापत्रक

  Mumbai
  एम इंडिकेटरवर रेल्वेसोबतच एसटीचेही वेळापत्रक
  मुंबई  -  

  एम-इंडिकेटर हे लोकल रेल्वे, एक्स्प्रेस रेल्वेगाड्या, बस गाड्यांचे नियमित वेळापत्र देणारे अॅप आहे. लोकलने प्रवास करणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात या अॅपचा वापर करतात. अशातच या एम-इंडिकेटर अॅपवर आता एसटी महामंडळाच्या राज्यभरात धावणाऱ्या नियमित बसचे वेळापत्रक देखील प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे आता एसटी चाकरमान्यांना देखील आपल्या गावी जाण्यासाठी कोणती बस आहे? बसची वेळ काय? यासंदर्भात माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

  भारतीय रेल्वेचे ऑफलाईन वेळापत्रक एम-इंडिकेटर अॅपवर आधीपासूनच उपलब्ध होते. आता, या अपडेटेट अॅपमध्ये पीएनआर नंबर, स्टेटस तपासणे, तसेच कोणत्या गाडीत आणि कुठल्या डब्यात आसने उपलब्ध आहेत. त्यानुसार आसनांचे तिकीट दर किती आहेत? यासंदर्भातील सर्व माहिती रेल्वे प्रवाशांना प्राप्त होईल. भारतीय रेल्वेच्या अपडेटेड वेळापत्रकाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. एम-इंडिकेटर अॅपची ही नवीन आवृत्ती अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनमधील गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  एम-इंडिकेटर अॅपमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसच्या वेळापत्रकाचा समावेश आताच करण्यात आला असून शिवनेरी वातानुकूलित बसेसचीही वेगळी माहिती आता चाकरमान्यांना मिळवता येणार आहे. एसटीची प्रवासी संख्या जवळपास 66 लाखांच्या घरात आहे. सध्याच्या घडीला राज्यभरात एकूण 18 हजार एसटी बसेस धावतात. एम-इंडिकेटर अॅपच्या माध्यमातून यापुढे लाखो प्रवाशांना रेल्वे आणि बेस्टसह एसटी बसेसची अपडेटेड माहिती मिळू शकणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.