Advertisement

४ ट्रेनमध्येच आहे पॅनिक बटण! मुंबईत महिलांची सुरक्षा रामभरोसेच!

महिलांंच्या सुरक्षेसाठी गेल्या वर्षी 'पॅनिक बटण' ही सुविधा सुरू करण्यात आली होती. पण, अजूनही या सुविधेवर अंमलबजावणी झाली नसल्याने एका तरुणीने आपली अब्रू वाचवण्यासाठी चालत्या ट्रेनमधून उडी मारली. जर यावेळी ही 'पॅनिक बटण'ची सुविधा ट्रेनमध्ये उपलब्ध असती, तर कदाचित ही घटना टाळता आली असती.

४ ट्रेनमध्येच आहे पॅनिक बटण! मुंबईत महिलांची सुरक्षा रामभरोसेच!
SHARES

गेल्या २४ तासांत शहराला हादरवून टाकणाऱ्या दोन विनयभंगाच्या घटना मुंबईत घडल्या आणि लोकलने रोज प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला.


काय घडलं २४ तासांत?

पहिल्या घटनेमध्ये सीएसटी स्टेशनवर एका विकृताच्या अश्लील चाळ्यांमुळे घाबरलेल्या तरूणीने चालत्या लोकलमधून थेट बाहेर उडी मारली. तिच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत. तर दुसऱ्या घटनेमध्ये सीएसटी स्थानकावरच चालत्या ट्रेनमध्ये एका विकृताने महिलांकडे पाहून अश्लिल चाळे करायला सुरुवात केली. यावर डब्यातील तरुणीने त्याचा व्हिडिओ काढून पोलिसांना दिला. या विकृताला लागलीच पोलिसांनी अटकही केली. मात्र त्यामुळे मुंबईत महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.


पॅनिक बटणाचं झालं काय?

महिलांंच्या सुरक्षेसाठी गेल्या वर्षी 'पॅनिक बटण' ही सुविधा सुरू करण्यात आली होती. पण, अजूनही या सुविधेवर अंमलबजावणी झाली नसल्याने एका तरुणीने आपली अब्रू वाचवण्यासाठी चालत्या ट्रेनमधून उडी मारली. जर यावेळी ही 'पॅनिक बटण'ची सुविधा ट्रेनमध्ये उपलब्ध असती, तर कदाचित ही घटना टाळता आली असती.

या पॅनिक बटणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी रेल्वे प्रशासन आणि सरकारला विचारत सरकारवर जोरदार टीका केली. रेल्वेने गाजावाजा करून महिला सुरक्षेसाठी पॅनिक बटणाची सोय केल्याचे सांगितले, मात्र कुठे आहे ते पॅनिक बटण? असा सवाल त्यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे.

मध्य रेल्वेकडून महिलांच्या सुरक्षेसाठी मे २०१६ मध्ये 'पॅनिक बटण'ची सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. पण,ही सुविधा अजूनही पूर्णत: अंमलात आलेली नाही. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील दोन आणि पश्चिम रेल्वेच्या दोन लोकलमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. पण, १ वर्ष उलटूनही ही यंत्रणा प्रत्येक ट्रेनमध्ये बसवण्यात आलेली नाही. या विषयी 'मुंबई लाइव्ह'ने मध्य रेल्वेचे डिव्हीजन रेल्वे मॅनेजर एस. के. जैन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांंनी हा प्रस्ताव अजूनही अंमलात आला नसल्याचं सांगतिलं.

पॅनिक बटण ही सुविधा आम्ही प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. आधी आम्ही सर्व ट्रेन्समध्ये सीसीटीव्ही बसवणार आहोत. हार्बरच्या दोन ट्रेनमध्ये आम्ही पॅनिक बटण बसवले होते. पण, प्रवासी कधी-कधी त्याचा गैरवापर करतात. त्यामुळे पॅनिक बटण या सुविधेवर आम्ही लवकरच पुनर्विचार करु.

एस. के. जैन, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे

शिवाय, महिलांच्या सुरक्षेसाठी डब्ब्यात सीसीटीव्ही, गार्ड, रेल्वे पोलीस स्थानकांत पोलीस बंदोबस्त अशा विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. पण, तरीदेखील महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होत नाहीत, असंही एस. के. जैन यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केलं आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तत्काळ कशा पद्धतीने सुरक्षा पुरवली जाईल? यावर लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलतांना स्पष्ट केलं आहे.


कसं काम करेल पॅनिक बटण?

महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेच्या विद्युत विभागातील अस्मिता श्रीवास्तव आणि सूद या दोन अधिकाऱ्यांनी 'पॅनिक बटण' तयार केलं आहे.


  • महिलांच्या डब्यात दोन आसनांच्या मध्ये लाल रंगाचे एक ‘पॅनिक बटण’ असेल
  • आपात्कालीन परिस्थितीत हे बटण दाबताच त्याच डब्याबाहेरील निळ्या रंगाचा लाईट सुरू होईल
  • लाईटसोबतच अलार्मही वाजू लागेल
  • बाजूने एखादी लोकल जात असल्यास किंवा एखाद्या स्टेशनवर लोकल आल्यास धोक्याची सूचना स्टेशन मास्तर, कर्मचाऱ्यांना मिळेल
  • पॅनिक बटण वाजताच मोटरमनच्या केबिनमध्येही निळ्या रंगाचा दिवा लागेल



हेही वाचा

धावत्या लोकलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याला अटक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा