Advertisement

बेस्ट बसमधून दीड लाख प्रवासी दररोज करतात प्रवास


बेस्ट बसमधून दीड लाख प्रवासी दररोज करतात प्रवास
SHARES

लॉकडाऊनच्या काळात बेस्टच्या बसमधून अत्यावश्यक सेवेतील तब्बल दीड लाख प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. त्यामुळं आर्थिक गर्तेत असलेल्या बेस्टच्या खिशात दररोज १० लाख रुपये उत्पन्नाची भर पडते आहे. असं असलं तरी लॉकडाऊनमुळं बेस्ट तिजोरीवर आर्थिक संकट आलं आहे. प्रवासी कमी व अत्यावश्यक सेवा यामुळं बेस्टला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बस चालविली जात आहे. दररोज दीड लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. परंतु यातील साधारणपणे १ लाख ३५ हजार प्रवाशांकडूनच तिकिटाचे शुल्क आकारले जात आहे. यामध्ये महापालिकेचे सफाई कर्मचारी, पाणी विभाग यासह विविध खात्यातील कर्मचारी, बँक कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी, मेडिकल स्टोअर चालवणारे व अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सरकारी व महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी, मंत्रालय कर्मचाऱ्यांना प्रवास मोफत आहे. त्यांच्यासाठी विशेष बस फेऱ्या चालवल्या जात आहेत. प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी बेस्ट उप्रकमाने भाडेकपात केली होती. भाडेकपातीपूर्वी बेस्टकडे १९ लाख प्रवासी होते. त्यातून दररोज २ कोटी २९ लाख रुपये उत्पन्न मिळत होते.

भाडेकपात होताच प्रवासी संख्या ३२ लाखांपर्यंत पोहोचली. ५० लाखांपर्यंत प्रवासी संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या बेस्ट उपक्रमानं बसचा ताफाही वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यात टप्प्याटप्प्यानं भर पडत आहे. मात्र कोरोनामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येवर परिणाम होऊ लागला आणि १२ मार्चपासून त्यात घट होऊ लागली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा