विमानात चढायचे विसरून तो बसमध्येच झोपला!

  Mumbai Airport
  विमानात चढायचे विसरून तो बसमध्येच झोपला!
  मुंबई  -  

  प्रवासाला निघताना आपण सगळेच वेळेअगोदर पाेहोचून गाडी पकडण्याला प्राधान्य देतो. त्यात विमानप्रवास म्हटला की तासभर अगोदर पाेहोचावेच लागते. पण वेळेच्या अगोदर विमानतळावर पाेहोचूनही तुम्हाला तुमचे विमान मिळेल, याची काही शाश्वती नाही. मुंबई विमानतळाहून बंगळुरूला निघालेल्या प्रवाशाच्या अनुभवावरून तरी हेच म्हणावे लागेल. त्याचे झाले असे की, हा प्रवासी चेक इन करून विमानतळात शिरला खरा, पण विमानाकडे नेणाऱ्या बसमध्ये चक्क झोपी गेला. आश्चर्याची बाब म्हणजे, त्याला जेव्हा जाग आली, तेव्हा त्याचे विमान बंगळुरुला उरतले होते. विमान कंपनीच्या अजब कारभाराचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

  गेल्या रविवारी बंगळुरुला जाण्यासाठी हा प्रवासी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 वर आला. तेथून तो चेक इन करून विमानाकडे ( इंडिगो विमान क्रमांक- 6 ई 799) घेऊन जाणाऱ्या बसमध्ये बसला. शेवटच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला अचानक झोप लागली. त्यानंतर हा प्रवासी वगळून इतर सर्व प्रवासी विमानात चढले आणि विमान बंगळुरुच्या दिशेने उडाले देखील. तरी हा प्रवासी बसमध्येच झोपलेला! त्याला ना कुणी हटकले ना कुणी उठवले.

  कहर म्हणजे बस चालक ही बस घेऊन मेंटेनन्स एरियात गेला आणि तिथे बस लॉक करून निघूनही गेला. तब्बल पाच तास उलटून गेल्यानंतर या झोपाळू प्रवाशाला जाग आली, तेव्हा आपण विमानतळावरील एका बसमध्ये अडकल्याचे त्याच्या लक्षात आले. सुटकेसाठी आरडाओरड केल्यानंतर इतर कर्मचारी बसजवळ आले. आत अडकलेल्या प्रवाशाला पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी 'सीआयएसएफ'च्या जवानांना बोलावून अखेर या प्रवाशाची सुटका केली.

  विमानतळाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह -

  या प्रवाशाची पाच तासांनंतर सुटका झाली असली, तरी खरा प्रश्न इथूनच सुरू होतो. तो असा की, या प्रवाशाला सोडून विमान सुटलेच कसे? बोर्डिंग पास देऊन बसमध्ये चढलेले प्रवासी आणि विमानात बसलेले प्रवासी यांची मोजणी करण्यात आली होती का? प्रवासी विमानात नसतानाही प्रवाशाचे सामान घेऊन विमान उडालेच कसे? त्यानंतर, म्हणजे तब्बल पाच तास हा प्रवासी बसमध्ये बसलेला असताना कुठल्याही कर्मचाऱ्याच्या ध्यानात ही बाब कशी आली नाही? विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर घटना असून या घटनेनंतर 'सीआयएसएफ'ने सर्व एअरलाइन्सला अशी घटना पुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.