Advertisement

पेट्रोल दरवाढ व लोकलबंदीमुळं सीएनजी गाडीच्या मागणीत वाढ


पेट्रोल दरवाढ व लोकलबंदीमुळं सीएनजी गाडीच्या मागणीत वाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद असून, पेट्रोलचे दरही १०६ रुपयांच्या घरांत गेलेले. यामुळे मुंबईतील चाकरमान्यांचा रोजचा खर्च वाढला आहे. त्यामुळं अनेकांनी अवैध लोकल प्रवासाला सुरुवात केली आहे. शिवाय, चारचाकी वाहनांच्या सीएनजी किटच्या मागणीत ५ टक्के वाढ झाली आहे.

सध्या लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना स्वत:च्या गाडीने कामाचे ठिकाण गाठावे लागत आहे. अशावेळी पेट्रोल खूप महागल्याने अनेकांनी सीएनजीचा पर्याय जवळ केला आहे. गाड्यांना सीएनजी किट लावून घेण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

मागील २ महिन्यांत गाडीला सीएनजी किट लावून घेण्यासंबंधी विचारणा वाढली आहे. अनेक चारचाकी सीएनजी किटसह येतात. पण काही मॉडेल्सना बाहेरून ही किट लावून घ्यावी लागते. यामुळेच पेट्रोल किंवा डिझेल गाडीच्या सीएनजी किटच्या मागणीत पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. हे किट साधारण १८ हजारापासून ते २२ हजार रुपयांच्या घरांत आहे. काही मोठ्या व चांगल्या किट ३६ हजार रुपयांच्या देखील आहेत.

पेट्रोलदर वधारल्याने व लोकल बंद असल्याने स्वत:च्या वाहनाने कामावर जाण्याखेरीज पर्याय नसल्याने रोजचा खर्च वाचविण्यासाठी साधारण २० ते २२ हजार रुपयांच्या किटला मागणी वाढती असल्याचे सध्या दिसून येत आहे. सीएनजी भरून देणाऱ्या पेट्रोल पंपांचा आकडा मुंबई महानगर क्षेत्रात २७० आहे. प्रामुख्याने महानगर गॅस लिमिटेडकडून (एमजीएल) या वायूचा पुरवठा होतो. तर सीएनजी किट लावून देणाऱ्या वितरकांचा आकडा हा मुंबई शहर व उपनगरात साधारण ३२ इतकाच आहे.


मुंबईत नोकरीनिमित्त मार्गक्रमण करायचे असल्यास किमान ३० ते ४० किमीचे अंतर दररोज एका बाजूने कापावेच लागते. आता करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवत राज्य सरकार सर्वसामान्यांना लोकलमुभा देत नाहीत. त्यामुळे नोकरदारांना स्वत:चे वाहन काढावे लागत आहे. 


याआधी त्यापोटी रोजचा खर्च साधारण २५० ते ३०० रुपये येत होता. तो आता ४५० ते ५०० रुपयांच्या घरात गेला आहे. आठवड्यातील सहा दिवसांच्या प्रवासानुसार मासिक खर्च तब्बल ७ हजार रुपयांनी वाढला आहे. दुचाकी वाहनचालकांचादेखील रोजचा खर्च ६० ते ८० रुपयांनी वाढला आहे. सीएनजीचा हाच खर्च मात्र २०० च्याच घरात असतो. त्यामुळेच सीएनजीची मागणी वाढती आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा