Advertisement

आचारसंहितेमुळं रेल्वे प्रशासनाची प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी लगबग

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रकल्पांची लगबग आहे.

आचारसंहितेमुळं रेल्वे प्रशासनाची प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी लगबग
SHARES

मुंबईसह राज्यभरातत सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असून आचारसंहिता कधीही लागू होईल. त्यामुळं विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रकल्पांची लगबग आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते १३ सप्टेंबरला पश्चिम, मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बरवरील पादचारी पूल, सरकते जिने, वायफाय इत्यादी सुविधांचं उद्घाटन व लोकार्पण केलं जाणार आहे. त्याशिवाय, मुंबई ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून ४ वेळा धावणार असून, तिला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. तर सीएसएमटीतील रेल्वे अपघात दावा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचा देखील शुभारंभ होणार आहे.

रेल्वे सुविधांचं उद्घाटन

सीएसएमटी येथील १८ नंबर प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसंच, या कार्यक्रमाला अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यासह अनेक लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आचारसंहिता लवकरच लागणार असल्यानं रेल्वे सुविधांचं उद्घाटन व लोकार्पण करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.

एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ

रेल्वे मंत्रालयाकडून तातडीनं मुंबई ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी लागणारी अधिसूचना काढली आहे. यापुढे बुधवार आणि शनिवारीसोबतच ही गाडी सोमवार व शुक्रवारी देखील धावणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणारे अपघात आणि अपघातग्रस्त किंवा त्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईसाठी होणारा विलंब पाहता आणखी एक रेल्वे दावा लवादाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सीएसएमटी येथे नवीन इमारतीत दुसरं खंडपीठ बसणार असून त्याचे उद्घाटन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्याशिवाय खार रोड आणि विलेपार्ले स्थानकात पादचारी पूल, लोअर परळ स्थानकात सरकत्या जिन्यांचं उद्घाटन होणार आहे.

सुविधांचं लोकार्पण 

जीटीबी नगर, कळवा, दिवा, उंबरमाळी, शहाड, कुर्ला, विद्याविहार, लोअर परळ, मरिन लाइन्स, प्रभादेवी स्थानकात पादचारी पूल, परळ स्थानकातील सरकता जिना व लिफ्ट, सीएसएमटी स्थानकातील १४ ते १८ नंबर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी स्वतंत्र नवीन मार्गिका, घाटकोपर व गोवंडी स्थानकातील तिकीट कार्यालयाचं नूतनीकरण, शिवडी, जीटीबी नगर, डॉकयार्ड रोड, सॅण्डहर्स्ट रोड, आंबिवली, टिटवाळा, चुनाभट्टी, किंग्ज सर्कल, भांडुप, कांजूरमार्ग, महालक्ष्मी, प्रभादेवी, लोअर परळ, माटुंगा रोड, माहीम अशा एकूण २९ स्थानकांत वायफाय सुविधा, सीएसएमटी, चिंचपोकळी, करी रोड, जीटीबी, सायन, चुनाभट्टी यासह एकूण ९ स्थानकांत प्लॅटफॉर्मवर नवीन छप्पर, २२ स्थानकांत एलईडी इंडिकेटर या सुविधांचं लोकार्पण करण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

लाइव्ह अपडेट्स : गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा