Advertisement

नव्या वर्षांत टॅक्सींच्या छतावर 'रुफ लाइट इंडिकेटर'

प्रवाशांना काळ्या-पिवळ्या टॅक्सीची उपलब्धता समजावी यासाठी नव्या वर्षांत 'रुफ लाइट इंडिकेटर'ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या वर्षांत टॅक्सींच्या छतावर 'रुफ लाइट इंडिकेटर'
SHARES

आरामदायी व जलद प्रवासासाठी अनेकदा मुंबईकर टॅक्सीनं प्रवास करतात. शिवाय एखाद्या निश्चित स्थळी वेळेत पोहोचण्यासाठी ही मुंबईकर टॅक्सीला प्राधान्य देतात. परंतू, अनेकदा टॅक्सी चालकांच्या नाकारतेपणामुळं प्रवाशी आणि टॅक्सी चालकांमध्ये वाद होताना पाहायला मिळतात. त्यामुळं यावर तोडगा काढण्यासाठी टॅक्सीवर 'रुफ लाइट इंडिकेटर' लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, आता नव वर्षात मुंबईत टॅक्सीवर हे 'रुफ लाइट इंडिकेटर' लावण्यात येणार आहे.

प्रवाशांना काळ्या-पिवळ्या टॅक्सीची उपलब्धता समजावी यासाठी नव्या वर्षांत 'रुफ लाइट इंडिकेटर'ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टॅक्सीवर इंडिकेटर बसविण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग, स्थलांतरित झालेले चालक आणि त्यामुळं इंडिकेटर बसवण्यात आलेले अडथळे इत्यादी कारणांमुळं आजपर्यंत एकाही टॅक्सीला इंडिकेटर बसवता आलेला नाही. मात्र आता टॅक्सी चालकांना ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅक्सी सहज उपलब्ध व्हावी यासाठी त्यावर ‘रुफ लाइट इंडिकेटर’ बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला होता. त्यानुसार, टॅक्सीच्या वरच्या बाजूला ३ रंगांत प्रकाशमान होणारे एकच इंडिकेटर बसविले जाणार होते.

  • हिरवा रंग प्रकाशमान झाल्यास सेवा उपलब्ध असल्याचं प्रवाशांना समजेल.
  • लाल रंग प्रकाशमान झाल्यास टॅक्सीमध्ये प्रवासी असल्याचं समजेल.
  • पांढरा रंग प्रकाशमान झाल्यास ही सेवा बंद असल्याचं समजेल.

रुफलाइट इंडिकेटर मराठी व इंग्रजीत

‘रुफ लाइट इंडिकेटर’वर पांढरा, हिरवा, लाल असे तीन रंग प्रकाशमान होतील. मात्र त्यावर टॅक्सी सेवा उपलब्ध आहे की नाही हे नमूद करणारे शब्द मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असतील. त्यामुळे प्रवाशांसाठी ते सोयीचे होईल.

नव्याने येणाऱ्या टॅक्सींसाठी १ फेब्रुवारी २०२० पासून ‘रुफ लाइट इंडिकेटर’ बसवणे बंधनकारक करण्यात आले होते. याबाबतची आखणी सुरू असतानाच करोना संसर्गामुळे ही मोहीम खोळंबली. त्यानंतर १ जानेवारी २०२१ पासून टॅक्सीवर ‘रुफ लाइट इंडिकेटर’ बसवणे पुन्हा सक्तीचे करण्यात आले.

मात्र त्यासाठी डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु, याबाबत टॅक्सीचालकांनी उदासीनता दाखवल्याने मोहीम रखडली. नुकत्याच झालेल्या मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत टॅक्सींवर ‘रुफ लाइट इंडिकेटर’ बसवण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा