Advertisement

करीरोड पादचारी पुलासाठी ४ फेब्रुवारीला ६ तासांचा विशेष ब्लॉक


करीरोड पादचारी पुलासाठी ४ फेब्रुवारीला ६ तासांचा विशेष ब्लॉक
SHARES

करीरोड स्थानकातील पादचारी पुलासाठी येत्या ४ फेब्रुवारीला मध्य रेल्वेतर्फे स्पेशल ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेकडून या पुलाच्या कामासाठी ६ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

करीरोड येथील पादचारी पुलाचा एक भाग खासगी मालकीचा असल्याने मध्य रेल्वेने ही जागा ५ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. त्यात काही दिवसांचा कालावधी गेल्याने तिथलं काम पूर्ण होण्यास अडचणी आल्या. त्यानंतर पुलाचं काम करण्यासाठी जागेची आवश्यकता होती, त्या जागेचं भाडं देखील रेल्वेला त्या खासगी कंपनीला द्यावं लागत आहे.


४ फेब्रुवारीला विशेष ब्लॉक

महिन्याला ३ लाख रुपये या दराने तीन महिन्यांसाठी ११ लाख रुपये रेल्वेने कंपनीला देऊ केलं आहे. त्यानंतर, आता हे काम सुरू करण्यात आलं आहे. परिणामी, पुलाच्या कामाला विलंब लागला असल्याचं कर्नल यांनी स्पष्ट केलं आहे. पण, आता हे काम ४ फेब्रुवारीला विशेष ब्लॉक घेऊन करण्यात येणार आहे.

लष्कराने हे तिन्ही पूल उभारण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी मागितला होता, तेवढ्याच कालावधीत पूल उभारण्यात येत आहे. पण, रेल्वे-लष्कर हे दोन्ही स्वतंत्र विभाग असल्यामुळे त्यांच्यात समन्वय होऊन विविध तांत्रिक गोष्टी पूर्ण होईपर्यंत बराच वेळ गेला असल्याचं देखील मोहन यांनी स्पष्ट केलं आहे.


गर्डर टाकण्याचं काम पूर्ण

एल्फिन्स्टन - परळ स्थानकात लष्करामार्फत उभारण्यात येणाऱ्या पुलाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालं आहे. शिवाय, या जोडपुलाचं गर्डर टाकण्याचं काम देखील शनिवारी विशेष ब्लॉक घेऊन करण्यात आलं आहे. तरीही हा पूल प्रवाशांसाठी खुला करायला आणखी १५ ते २൦ दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती कर्नल धीरज मोहन यांनी दिली आहे. २७ जानेवारी म्हणजेच शनिवारी या जोडपुलाचं गर्डर टाकण्याचं काम करण्यात आलं. या पुलाची लांबी २४൦ फूट तर रुंदी १२ फूट इतकी आहे.


आणखी १५ दिवस लागण्याची शक्यता 

एल्फिन्स्टन-परळ जोडपुलाप्रमाणेच आणखी दोन स्थानकांकडील पादचारी पूल तयार करण्यासाठी लष्कराच्या सॅपर्स इंजिनीअरिंग विभागाची नियुक्ती करण्यात आली आहे. तिन्ही पूल ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होतील असं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु, जोडपूल आणि करीरोड येथे उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे त्याला आणखी किमान १५ ते २० दिवस लागणार आहेत.


एल्फिन्स्टन रोड-परळ जोडपुलासाठी लष्कराने खास डोकलामहून पुलाचे गर्डर मागवले आहेत. ६ जानेवारीला पुलासाठी लागणारे तिन्ही गर्डर रेल्वेने कल्याण स्थानकापर्यंत आणले. पहिला गर्डर यशस्वीपणे टाकल्यानंतर शनिवारी दुपारी दुसरा गर्डर टाकण्यात आला. तर तिसरा गर्डर शनिवारी रात्री टाकण्यात आला. गर्डर टाकण्याच्या कामानंतर तो परळ स्थानकातील कल्याण दिशेला असलेल्या पादचारी पुलाला जोडण्याचं काम लष्कराला करावं लागणार आहे. त्यामुळे, या कामासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे.


एल्फिन्स्टन-परळ जोडपुलाच्या आरेखनासाठी ३ आठवड्यांचा कालावधी लागला आहे. पुलाचं गर्डर टाकण्यासाठी तब्बल ३५० टनची क्रेन वापरण्यात आली. या पुलासाठी वापरण्यात आलेल्या सामानासाठी आणि इतर खर्च पाहता तब्बल ८ कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. हा पूल ५० ते ६० वर्षे टिकणारा असून यावरून लष्कराचा रणगाडा सोडला तर इतर सर्व वाहने ये-जा करू शकतील, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच हा पूल ९ टनचा आहे.

संबंधित विषय
Advertisement