Advertisement

वाढत्या कोरोना रुग्णांचं रेल्वे प्रशासनाला गांभिर्य नाही

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांचं रेल्वे प्रशासनाला गांभिर्य नाही
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, समान्य प्रवाशी, महिला प्रवाशी इतर कर्मचारी वर्ग यांना वेगवेगळ्या वेळेत लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी होऊ नये व समाजिक अंतराच्या नियमांचं पालन व्हावं यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाकडं रेल्वेचाच काणाडोळा होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रवाशांसाठी वेळ निश्चित करून दिली असली तरी स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.

प्रवासादरम्यान सामाजिक अंतराचा नियम पाळणं, ठरावीक वेळेत सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देणं यांसह अन्य कोरोना प्रतिबंध नियमावलीची अंमलबजावणी करण्याकडं राज्य शासन आणि रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्षच होत आहे. परिणामी, कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. सामान्य प्रवाशांना १ फेब्रुवारीपासून ठरावीक वेळेत लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. यात सकाळी ७ च्या आधी, तर दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ नंतर प्रवास करण्यास मुभा आहे. त्यामुळं अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या प्रवास वेळेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्याचं राज्य शासन व रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच प्रवाशांचे ओळखपत्र तपासून त्यांना स्थानकात प्रवेश दिला जात होता. रेल्वे पोलीस आणि तिकीट तपासनीसांना या कामासाठी तैनात करण्यात आले होते. मात्र काही दिवसच ही तपासणी झाली. हळूहळू सामान्य प्रवाशांचा विचार करता मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानक प्रवेशद्वाराजवळील तिकीट तपासणी बंद करण्यात आली. तर कालांतरानं ओळखपत्र न पाहताच ठरावीक वेळेआधी तिकीट देण्यास सुरुवात करण्यात आली.

ठरावीक वेळेतच सर्वसामान्यांना लोकल प्रवासाचे तिकीट देण्याच्या नियमाचा राज्य शासन आणि रेल्वेला विसर पडला आहे, तर स्थानकातील प्रवेशद्वारांजवळील रेल्वे पोलिसांकडून होणारी तपासणीही थांबविण्यात आली आहे. रेल्वे व राज्य शासनाच्या नियमानुसार शारीरिक अंतर ठेवून प्रवास करण्याच्या सूचना आहेत. परंतु याचे कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीत पालनच होताना दिसत नाही.

रेल्वे गाड्यांना सकाळी व संध्याकाळी असलेल्या गर्दीत सर्व आसनांवर प्रवासी असतात, तर २ आसनांच्या मध्ये उभे राहून प्रवासी प्रवास करतात. नियमानुसार कोरोनाकाळात एका लोकलमधून सरासरी ७०० प्रवाशांना प्रवासाची मुभा आहे. परंतु सर्वानाच त्याचा विसर पडला आहे. मध्य रेल्वेवरील दररोजची प्रवासी संख्या २० ते २२ लाखा जवळपास आहे. १ फेब्रुवारी २०२१ला सामान्य प्रवाशांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर २० लाख प्रवासी संख्या झाली. त्यानंतर २२ लाखांपर्यंत पोहोचली. मंगळवारी हीच संख्या पुन्हा २० लाख झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

रेल्वे स्थानकात मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्यानंतर आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर ८ हजार २०३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १३ लाख २१ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर मध्य रेल्वेवर ७ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

मध्य व पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांत सकाळी व सायंकाळी गर्दी असते. तिकीट खिडक्यांसमोर भल्या मोठ्या रांगाही लागलेल्या असतात. या वेळी प्रवाशांकडून शारीरिक अंतर न राखणं, मास्कचा वापर न करणं, सॅनिटायझरचा वापर न करणं आदींचा विसरच पडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकल गाड्यांमध्ये गर्दीच्या वेळी फेरीवाल्यांचीही घुसखोरी होते. त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.



हेही वाचा -

कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी, पंतप्रधानांचे राज्यांना निर्देश

सरकारी ड्रेस कोडमध्ये बदल, जीन्स चालेल पण टी-शर्ट नाही


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा