Advertisement

३ किलोमीटरची पायपीट वाचणार, माथेरानमध्ये ई रिक्षा धावणार

माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी येथील सुनील शिंदे यांनी तब्बल 12 वर्षे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पाठपुरावा केला होता.

३ किलोमीटरची पायपीट वाचणार, माथेरानमध्ये ई रिक्षा धावणार
SHARES

माथेरान हिलस्टेशनवर तब्बल 172 वर्षांनी पहिल्यांदाच ई रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. आजपासून या ई रिक्षा सेवेचा प्रारंभ झाला आहे.

माथेरान गिरीस्थानाचा ब्रिटिशांनी 1850 साली शोध लावला. तेव्हापासून येथील पर्यावरणाचं नुकसान होऊ नये या हेतूने माथेरानमध्ये वाहनबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना दस्तुरी पॉईंटच्या वाहन तळावर गाड्या लावून पुढे माथेरान गिरीस्थानापर्यंतचा तीन किलोमीटरचा प्रवास हा घोडा किंवा हाताने ओढाव्या लागणाऱ्या रिक्षाने करावा लागत होता.

नेरळ माथेरान दरम्यान धावणारी मिनीट्रेन सुद्धा आतापर्यंत अनियमित होती. त्यात घोडा आणि हातरिक्षाचे दरही अनेकांना परवडणारे नसल्यामुळे बहुतांशी पर्यटकांना दस्तुरी पॉईंट ते माथेरान अशी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. या सगळ्याचा माथेरानच्या पर्यटनाला मोठा फटका बसत होता.

माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी येथील सुनील शिंदे यांनी तब्बल 12 वर्षे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पाठपुरावा केला होता.

अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माथेरानमध्ये ई रिक्षा सेवेचा प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही ई रिक्षा चालवली जाणार आहे. त्यानंतर ई रिक्षा सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील धोरण नगरपालिकेकडून ठरवलं जाणार असल्याची माहिती माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली आहे.

सध्या माथेरान नगरपरिषदेकडून स्वतः ई रिक्षा चालवली जात असून त्यासाठी दस्तुरी पॉईंट ते माथेरान बाजारपेठ या तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी 35 रुपये आकारले जात आहेत.

तर विद्यार्थ्यांसाठी हा दर अवघा पाच रुपये इतका असणार आहे. या ई रिक्षा सेवेमुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यामुळे भविष्यात माथेरानच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकणार आहे. तर स्थानिक रहिवासी, वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी यांनाही या ई रिक्षा सेवेचा फायदा होणार आहे.हेही वाचा

नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या वेळात बदल, 'हे' आहे नवे वेळापत्रक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा