Advertisement

परिवहन मंत्री परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना 'हा' इशारा

आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर गेले आहेत.

परिवहन मंत्री परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना 'हा' इशारा
SHARES

आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर गेले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात हे कर्मचारी आंदोलन करत आहे. कर्मचाऱ्यांच्या इतक्या दिवसांच्या संपामुळं एसटी महामंडळाची एसटी धावली नसून, महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागतोय. अशातच या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मागणीला सकारत्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पगारवाढीची घोषणा केली. मात्र या पगारवाढीनंतर ही कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देत पगारवाढीचा निर्णय घेणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीच्या घोषणेनंतर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. जे कर्मचारी निलंबित झाले आहेत, ते कामावर हजर झाल्यानंतर त्यांचं निलंबन रद्द करण्यात येईल, असं परब यांनी जाहीर केलं आहे. मात्र, ही घोषणा करतानाच त्यांनी कामावर येऊ न इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दात इशाराही दिला आहे.

संपावर तोडगा काढत पगारवाढीची घोषणा करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून कामावर हजर राहावे, असं आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले.

जे कर्मचारी मुंबईत आंदोलनासाठी आले आहेत, त्यांना उद्याऐवजी परवा कामावर हजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी परवा शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत कामावर हजर व्हावे असे परब यांनी म्हटले आहे. मात्र, हे आवाहन करताना परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना इशाराही दिला आहे.

निलंबित झालेले कर्मचारी कामावर हजर झालेच नाहीत, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करेल, असे परब यांनी म्हटले आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असे आश्वासनही परब यांनी दिले आहे.

विलिनीकरणाचा निर्णय राज्य सरकार घेणार नसून, तो निर्णय उच्च न्यायालयानं नियुक्त केलेस्या त्रिसदस्यीय समितीला घ्यायचा आहे. ही समिती जो काही निर्णय घेईल तो निर्णय राज्य शासन स्वीकारेल, असं परिवहन मंत्री परब यांनी स्पष्ट केले आहे. आता हे राज्य शासनाच्या हातात राहिलं नसल्यानं कर्मचाऱ्यांनी याचा विचार करून संप मागे घ्यावा आणि कामावर यावे, असं आवाहन परब यांनी पुन्हा एकदा केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा