Advertisement

प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय


प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या २९ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने लोकल रेल्वे सेवा बहाल केली जाणार आहे. लोकल सर्वांसाठी खुली करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे.

लॉकडाऊन लागू होण्याआधी पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर नियमितपणे १ हजार ३६७ लोकल चालवण्यात येत होत्या. आजच्या निर्णयानुसार २९ जानेवारीपासून या सर्व लोकल पूर्ववत धावणार आहेत. तब्बल १० महिन्यांनंतर पश्चिम रेल्वेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेने मात्र अजूनही असा कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी येत्या एक ते दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सोमवारीच मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येऊ शकते, यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते.

या बैठकीला राज्य सरकार आणि मुंबईतील प्रमुख अधिकाऱ्यांसोबतच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीनंतर वेगाने हालचाली होत असल्याचेच संकेत पश्चिम रेल्वेच्या निर्णयातून दिसत आहेत.

दरम्यान, सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा बहाल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून होणार आहे. त्यामुळे याबाबतचे राज्य सरकारचे म्हणणे विचारात घेऊन रेल्वेकडून येत्या काही दिवसांत अंतिम होण्याची दाट शक्यता आहे. चेन्नईच्या धर्तीवर मुंबईत सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होणार की अन्य पर्याय असणार, हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे. लोकलसेवा पूर्ववत झाल्यास दूरच्या उपनगरांतून मुंबईत दररोज येजा करणाऱ्या नोकरदार व अन्य प्रवाशांना मात्र खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा