गोवंडीतील धुरामुळे घाटकोपरवासिय गुदमरले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील मिठी नदीला प्रदूषित करणाऱ्या अनधिकृत भंगारवाल्यांनी आता मंडाला गोवंडीमध्ये तळ ठोकला आहे. त्यामुळे वांद्र्यातील प्रदूषण कमी झाले, तरी पूर्व उपनगरातील प्रदूषण मात्र वाढत चालले आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर लागलेल्या आगीच्या धुरातून सुटका झाल्यानंतर आता कुठे येथील जनता नि:श्वास टाकत असली, तरी या ठिकाणी जाळल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे पुन्हा एकदा डम्पिंग ग्राऊंडवरील आगीच्या धुरामुळे घाटकोपर आणि आसपासच्या परिसरातील रहिवासी गुदमरू लागले आहेत.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून घाटकोपर पूर्व भागांमध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत आहे. घाटकोपर पूर्व भागात निर्माण होणाऱ्या या धुरामुळे लोकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. या धुरामुळे नागरिक गुदमरत आहेत.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थ जाळले जात आहेत. त्यामुळे धुरांचे लोट घाटकोपरपर्यंत पसरुन लोकांचे जगणे कठीण बनले आहे. राष्ट्रवादीच्या महापालिका गटनेत्या आणि घाटकोपरमधील स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांनी गेल्या दोन दिवसांपासून निर्माण होणाऱ्या धुराची समस्या महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यानंतरही आगीमुळे निघणाऱ्या रासायनिक धुराची समस्या कायम असल्याचे राखी जाधव यांनी सांगितले. याबाबत आपण शुक्रवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वांद्रे पश्चिम भागातील मिठी नदीच्या शेजारी असलेल्या अनेक अनधिकृत गोदामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या अनधिकृत गोदामवाल्यांनी आता मंडाला गोवंडीत पुन्हा अनधिकृत गोदामे उभारली आहेत. याठिकाणी अनधिकृत रासायनिक द्रव्यांचा साठा केला जात आहे. अनेकदा तारा, टायर्स तसेच अन्य रासायनिक द्रव्यांची पिंपे जाळली जातात. त्यामुळे वातावरणात आगीच्या ज्वाला पसरून धुरांचे लोट आसपासच्या भागांमध्ये पसरतात. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.


हेही वाचा - 

गोवंडीत वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट प्रक्रियेविनाच

गोवंडीतल्या आगीत तिघे जखमी

पुढील बातमी
इतर बातम्या