Advertisement

मिठी नदी प्रदूषित, फक्त किनारेच करणार सुशोभित


मिठी नदी प्रदूषित, फक्त किनारेच करणार सुशोभित
SHARES

26 जुलैच्या महापुराला कारणीभूत असलेल्या मिठी नदीचे रुंदीकरण करून नदीला जुने रुप मिळवून देण्यासाठी विकास प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्यानुसार मिठी नदी रुंदीकरणाचे काम बहुतांश पूर्ण झाले असले तरी नदी अजूनही प्रदूषित नाल्याप्रमाणेच आहे. मात्र, आता याच प्रदूषित मिठी नदीचा काठ सुशोभित करून त्यावर कोटयवधी रुपयांचा खर्च करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. कुर्ला भागातील मिठी नदीच्या किनाऱ्याचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यावर सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबईत तब्बल 17.8 किलोमीटर लांबीची मिठी नदी असून यापैकी 11.8 किलोमीटर लांबीची मिठी नदी महापालिकेकडे होती, तर उर्वरीत 6 किलोमीटर लांबीची नदी 'एमएमआरडीए'कडे होती. या दोन्ही प्राधिकरणाच्या माध्यमातून मिठी नदीचा विकास करून नदी पात्रातील अतिक्रमण हटवून रुंदीकरण करण्यात आले. परंतु आजही कुर्ल्यातील अतिक्रमणे कायम असून जी अतिक्रमणे हटवून त्यांचे पुनर्वसन केले होते, तेथे पुन्हा अतिक्रमण होत आहे. व्यावसायिक गाळे व रासायनिक कारखान्यांची अतिक्रमणे आजही कुर्ला भागात असतानाच या भागातील मिठी नदीच्या काठाचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

कुर्ल्यातील सीएसटी पूल ते एमएमआरडी पुलापर्यंतच्या परिसरात मिठी नदीच्या किनाऱ्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार अाहे. याठिकाणी पेव्हर ब्लॉक, उद्यानाची कामे, विद्युत दिवे, बेंचेस बसवण्याचे कंत्राट देण्यात येत आहे. यासाठी 'योगेश कन्स्ट्रक्शन' या कंपनीची निवड करण्यात आली असून त्यासाठी 3 कोटी 61 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मिठी नदीचे रुंदीकरण व सुशोभिकरण होणे गरजेचे आहे. परंतु सध्या अनेक भागांचे रुंदीकरण थांबलेले आहे. कुर्ल्यातच हे रुंदीकरण पूर्ण झालेले नाही. शिवाय नदी प्रदूषित आहे ती वेगळी. मग अशा नदीच्या किनाऱ्याचे सुशोभीकरण करून आपण नक्की काय साधणार आहोत? तिथे बसून लोकांनी प्रदूषित नदीमुळे आरोग्य बिघडवून घ्यायचे का? हा केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा प्रकार आहे. 

- रवी राजा, विरोधी पक्षनेते

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी हा अनाठायी खर्च असल्याचे सांगत करदात्यांचा पैसा योग्य कामांसाठीच खर्च केला जावा, ही मागणी असल्याचे सांगितले. ज्या भागाचे सुशोभिकरण होणार आहे, त्या भागाची पाहणी करण्यात यावी, म्हणजे कंत्राटदारांचे भले करण्यासाठी प्रशासन कसे उतावीळ असते, हेही समोर यईल, असे त्या म्हणाल्या.

याबाबत प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्यानंतरच मंजुरी अथवा नामंजुरीचा निर्णय घेतला जाईल.

- यशवंत जाधव, सभागृहनेते

मिठी नदीच्या पात्रातून मलवाहिनीचे जाळे जात असून या मलवाहिनीतील सांडपाणी मिठी नदीत जात आहे. त्यामुळे प्रथम ते रोखले गेले पाहिजे. हे काम अद्याप बाकी आहे. गाळ काढणे व खोलीकरण करण्याची कामे सुरु आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांची प्राथमिकता विचारात न घेता जर सुशोभीकरणाचे काम होत असेल तर ते बरोबर नाही. प्रथम मलवाहिनीतील सांडपाणी बंद केले जावे, मगच या सुशोभीकरणाचा विचार केला जाऊ शकतो, असे भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा