संक्रमण शिबिरातील घरे लाटणारा दलाल जावेद पटेलला अटक

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील घरे लटणाऱ्या आणि ही घरे देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या म्हाडातील जावेद पटेल या नामचीन दलालाच्या मुसक्या अखेर खेरवाडी पोलिसांनी आवळल्या आहेत.

संक्रमण शिबिरातील घर देण्याच्या नावे फसवणूक केल्याप्रकरणी जावेदला अटक करण्यात आल्याची माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

म्हाडातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने संक्रमण शिबिरातील घरे लाटली जातात. तरी म्हाडा कसे मूग गिळून गप्प आहे, यासंबंधीचे वृत्त नुकतेच 'मुंबई लाइव्ह'ने दिले होते. जावेदच्या अटकेमुळे या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.

बेस्ट कर्मचारी विजय कांबळे यांच्या तक्रारीनुसार जावेदला अटक करण्यात आली आहे. संक्रमण शिबिरातील घर देतो म्हणून जावेदने कांबळे यांच्याकडून १९ लाख रुपये घेतले. पण घर दिले नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या कांबळे यांनी महिन्याभरापूर्वी म्हाडा दक्षता विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार दक्षता विभागाने चौकशी करत जावेदविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती दक्षता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

कोण आहे जावेद पटेल?

जावेद पटेल हा म्हाडातील नामचीन दलाल असून तो गोरेगाव, बिंबीसार नगर म्हाडा वसाहत इमारत क्रमांक ३ मध्ये राहतो. २००३ पासून तो आपला भाऊ आणि काही सहकाऱ्याच्या मदतीने संक्रमण शिबिरातील गाळे लाटत आणि घराच्या नावे सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. जावेद पटेलने आतापर्यंत मोठ्या संख्येने घरे लाटून विकल्याचा तक्रारी आहेत.

म्हाडातच सापडला

तक्रारदार विजय कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि फोटोनुसार गेल्या आठवड्यात जावेद पटेलला दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत पोलिसांकडे सुपूर्द केलं. यावरून बडे बडे दलाल म्हाडात डेरा टाकून असतात. त्यांचा म्हाडात मुक्त संचार असतो हे स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे. तर म्हाडा या दलालांकडे कानाडोळा करत त्यांना पाठीशी घालत असल्याचेही म्हटले जात आहे.

दक्षता विभागाने ताब्यात घेतलेल्या जावेदची खेरवाडी पोलिसांनी कसून चौकशी करत त्याला २२ सप्टेंबरला अटक केली. जावेदला पोलीस कोठडी देण्यात आली असून तो आजारी असल्याने त्याला गेल्या २ दिवसांपासून भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

आधिकाऱ्यांची नावे समोर येणार?

म्हाडा संक्रमण शिबिरातील घरे असो म्हाडा लॉटरी वा गिरणी कामगारांची घरे लाटण्यासाठी म्हाडा आधिकाऱ्यांची मदत हवीच. म्हाडा आधिकाऱ्यांच्या संगनमताने घरे लाटल्याचे वेळोवेळी उघडही झाले आहे. त्यामुळे जावेदच्या चौकशीतून भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे समोर येतील, असा दावा पोलिसांनी केला आहे.


हेही वाचा -

 700 म्हाडा विजेते अजूनही घराच्या प्रतिक्षेत, ओसीचा खोडा

..तर प्रकल्पासाठी रेरा नोंदणीची गरज नाही!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या