म्हाडातल्या घरघोटाळ्याचा पर्दाफाश!

मुंबई - हा घ्या...म्हाडाच्या दलालांचा कबुलीजबाब! आयुष्यभर हाडाची काडं करणाऱ्या गिरणी कामगारांना हक्काचं छप्पर लाभण्यासाठीही आपल्याच मायबाप सरकारशी लढावं लागलं आणि अखेर २५ वर्षांच्या लढाईनंतर या गिरणी कामगारांना पुनर्वसन योजनेअंतर्गत घरं मिळाली... पण आज या घरांचाच बाजार मांडलाय तो राजकीय आशीर्वाद लाभलेल्या दलाल आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीनं... आता तीच घरं कशी दलालीच्या दलदलीत फसलीयेत, याचा मुंबई लाइव्हनं केलेला हा पर्दाफाश...
आमच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसणाऱ्या या दलालांनी त्यांच्या पापात साथीदार असलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावासकट कबुलीजबाब दिलाय. तो या व्हिडिओतून आम्ही तुमच्यासमोर मांडतोय... आता हे अधिकारी कोण, खरोखरच त्यांचं या दलालांशी काय नातं, हेसुद्धा तुम्हाला त्यांच्याच तोंडून हा व्हिडिओ पाहताना ऐकता येईल...
एखाद्या गिरणी कामगाराला घर लागलं रे लागलं की, दलालांची ही टोळी काम करू लागते. अनेकदा तर घर लागलंय हे म्हाडाआधी या दलालांकडूनच गिरणी कामगाराला समजतं. घर लागलेला मासा गळाला लागला की, या दलालांचं फावतं आणि या घराचा बाजार मांडला जातो... बऱ्यापैकी जास्त रक्कमेचं आमीष दाखवून घर विकण्याचा मोह व्हावा, अशीच ऑफर गिरणी कामगाराला दिली जाते... पण, या दलालांवर कुणाचाच वचक कसा नाही? कोण आहेत त्यांना सामील म्हाडाचे अधिकारी आणि कर्मचारी? कुणाच्याही लक्षात न येता ही सगळी कामं बिनबोभाट कशी होऊ शकतात आणि हा प्रकार रोखणार की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत...

Loading Comments