Advertisement

700 म्हाडा विजेते अजूनही घराच्या प्रतिक्षेत, ओसीचा खोडा


700 म्हाडा विजेते अजूनही घराच्या प्रतिक्षेत, ओसीचा खोडा
SHARES

यंदा म्हाडाच्या घरांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्याने तसेच अत्यल्प गटासाठी केवळ ८ घरेच असल्याने म्हाडावर अत्यल्पच काय सर्वच गटातील इच्छुक नाराज आहेत. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे 2015 आणि 2016 च्या सोडतीतील अंदाजे 700 घरांना अद्यापही ओसी न मिळाल्याने या घरांचा ताबा रखडला आहे. आमच्या घरांचा ताबा कधी मिळणार? याची विचारणा करण्यासाठी विजेते म्हाडाच्या पायऱ्या झिजवत आहेत, पण त्यांना म्हाडाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याने विजेते हवालदिल झाले आहेत. म्हाडाच्या नियोजनशून्य, संथ कामाचा फटका या विजेत्यांना बसत आहे.

2015 च्या लाॅटरीतील मुलुंड येथील अल्प गटातील 185 घरांचा ताबा गेल्या अडीच वर्षांपासून रखडला आहे. तर याच लाॅटरीतील मालवणी, मालाडमधील 64 विजेत्यांनाही केवळ ओसी नसल्याने घराचा ताबा मिळालेला नाही. 2015 प्रमाणेच 2016 च्या सोडतीतील 450 घरांची हीच गत आहे. 2016 च्या लाॅटरीतील गोरेगाव सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ प्रकल्पातील 306 घरांना अद्याप ओसी मिळालेली नाही. तर याच लाॅटरीतील गोरेगावसह अन्य ठिकाणच्या 150 घरांच्या ओसीचा प्रश्नही एरणीवर आहे.

घराचा हप्ताही सुरू

700 पैकी मालवणी, मालाडमधील 64 विजेत्यांचा घराचा हप्ता डिसेंबर 2016 पासूनच सुरू झाला आहे. घरांना ओसी मिळाल्याशिवाय घराची रक्कम विजेत्यांकडून वसूल करू नये, असा ठराव म्हाडाने केलेला आहे. असे असताना मुंबई मंडळाच्या पणन विभागाने यासंबंधीचे नियम धाब्यावर ठेवत मालवणीतील 232 विजेत्यांकडून घरांची रक्कम गेल्या वर्षीच भरून घेतली आहे. 

मुंबई मंडळाच्या या घोटाळ्याचा पर्दाफाश काही महिन्यांपूर्वी 'मुंबई लाइव्ह'ने केला होता. त्यानंतर मुंबई मंडळ कामाला लागले आणि मंडळाने 232 पैकी 168 घरांना ओसी मिळवून घेत या विजेत्यांना घराचा ताबा देण्यास सुरूवात केली आहे. मात्र त्याचवेळी उर्वरित 64 घरांना अजूनही ओसीची प्रतिक्षा आहे. ओसी मिळत नसल्याने या 64 विजेत्यांचा घराचा ताबा रखडला आहे तर दुसरीकडे या विजेत्यांचा घराचा हप्ता सुरू असल्याने हे विजेते आर्थिक संकटात सापडले आहेत.

ओसीची प्रक्रिया सुरू-म्हाडा

मालवणी आणि मुलुंडमधील घरांसाठी ओसी घेण्याची प्रक्रिया सुरू असून मालवणीतील घरांना आठवड्याभरात ओसी मिळेल, अशी माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर मुलुंडमधील इमारतीच्या ओसी प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी सोडवत ओसी मार्गी लावण्याचे मंडळाचे प्रयत्न सुरू असून दीड महिन्यात ओसी मिळेल, असा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे.


पत्राचाळीतील विजेते लटकले

700 विजेत्यांमध्ये पत्राचाळीतील 306 विजेत्यांचाही समावेश आहे. पत्राचाळ हा प्रकल्प वादग्रस्त ठरला असून हा प्रकल्पच रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकल्पातील घरे लाॅटरीत घेऊ नये, असे खुद्द म्हाडाच्या अभियंत्यांनी मुंबई मंडळासह प्राधिकरणाला लेखी स्वरूपात कळवले होते. मात्र मुंबई मंडळ आणि प्राधिकरणाने अट्टाहासाने 2016 च्या लाॅटरीत 306 घरांचा समावेश केलाआणि त्या घरांसाठी लाॅटरीही काढली. पण आता वर्षे उलटले तरी या घरांच्या ओसीचा पत्ता नाही.

मुळात हा प्रकल्प घोटाळ्यात अडकल्याने बिल्डरने कामच बंद केल्याचे समजते आहे. त्यामुळे घरांचे काम पूर्ण कसे होणार? आणि ओसी कशी मिळणार? हाच प्रश्न आता पत्राचाळीतील विजेत्यांन सतावत आहे.



हेही वाचा -

बीकेसीत बुलेट ट्रेन आणि आयएफएससी सेंटरही?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा