SHARE

मुंबईसारख्या महागड्या शहरात म्हाडाच्या माध्यमातून हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाल्याने 2015 च्या म्हाडाच्या सोडतीतील मालाड, मालवणीतील अत्यल्प गटातील 224 विजेते खूश होते. आता त्यांना प्रतिक्षा होती ती हक्काच्या घरात रहायला जाण्याची. पण त्यांची ही प्रतिक्षा काही संपता संपत नव्हती. अखेर काही महिन्यांपूर्वी पात्र विजेत्यांना म्हाडाकडून घराची रक्कम भरण्यासंबंधीचे पत्र आले. 

घराची रक्कम भरली कि घराचा ताबा मिळतो. त्यामुळे हे पत्र मिळताच विजेत्यांनी कर्ज काढून घराची 100 टक्के रक्कम भरली. आता घराचा ताबा मिळणार म्हणून हे विजेते खूश होते. त्यातच कर्जाचा हप्ता सुरू झाला, पण घराचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे या विजेत्यांच्या आनंदावर पाणी पडले. संतप्त झालेल्या विजेत्यांनी गेल्या आठवड्यात म्हाडावर हल्लाबोल केला आणि तेव्हा धक्कादायक बाब उघड झाली. ती म्हणजे मालवणीतील 224 घरांना ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) नसताना या विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेत त्यांना आर्थिक संकटात टाकण्यात आलं आहे.


नियम काय सांगतो?

मालवणीतील घरांना ओसी नसतानाही काही महिन्यांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पणन विभागाने 224 पैकी 170 पात्र विजेत्यांना रक्कम भरण्याचे पत्र पाठवले, नि त्यातील काही विजेत्यांकडून 100 टक्के तर काहींकडून अर्धी रक्कम भरून घेतली. नियमाप्रमाणे घराची ओसी मिळाल्यानंतरच विजेत्यांकडून घराची रक्कम भरुन घेणे बंधनकारक आहे. जेणेकरून विजेत्यांवर आर्थिक भार पडू नये. पण हा नियम धाब्यावर बसवत पणन विभागाने मनमानी कारभार करत अनेक विजेत्यांना आर्थिक संकटात आणले आहे.

याआधी तयार, ओसी असलेल्या घरांसाठीच सोडत काढली जायची. पण गेल्या काही वर्षांपासून मुंबई मंडळाला घरांची चणचण भासू लागली. त्यामुळे मुंबई मंडळाने चालू प्रकल्पातील घरांची सोडत काढण्यास मागील पाच-सहा वर्षांपासून सुरूवात केली आहे. मात्र त्यामुळे म्हाडा चांगले अडचणीत आले आहे. कारण पात्र विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेतली जायची, पण घराचे काम आणि ओसी नसल्याने घराचा ताबा काही देता येत नव्हता.


विजेते दुहेरी संकटात

महिन्यांमागून महिने उलटले, घराचे हप्त्यावर हप्ते कापले जाऊ लागले तरी हक्काच्या घराचा ताबा मिळत नसल्याने विजेत्यांच्या अडचणी वाढू लागल्या. हक्काचे घर असतानाही भाड्याच्या घरात रहायचे, भाड्याची रक्कम भरायची आणि त्याचवेळी म्हाडाच्या घराचा हप्ताही भरायचा. अशा दुहेरी संकटात अडकलेल्या विजेत्यांच्या तक्रारी म्हाडाकडे वाढल्या. त्याअनुषंगाने तीन-चार वर्षांपूर्वी तत्कालीन उपाध्यक्षांनी ओसी मिळाल्यानंतर घराची रक्कम भरून घेण्यासंबंधीचा निर्णय घेत तशी तरतूदही केली.

पणन विभागाने मात्र मालवणी, मालाडमधील 224 पैकी 170 विजेत्यांना पत्र पाठवित पैसे भरून घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी 100 टक्के रक्कम याआधीच भरल्याने त्यांचे कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत. असे करणे हे नियमबाह्य असल्याने आता मुंबई मंडळाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात कर्जाचा हप्ता सुरू झालेल्या काही विजेत्यांनी मुंबई मंडळाच्या कार्यालयावर हल्लाबोल करत अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारत ताबा देण्याची मागणी उचलून धरली. 

दरम्यान ओसीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ताबा मिळेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे समजते आहे. याविषयी पणन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पैसे भरून घेण्यात आले असून येत्या आठवड्याभरात ओसी मिळेल. त्यानंतर लागलीच ताबा देण्यास सुरूवात करु, असे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.


निर्णय घेण्याचा अधिकार दिलाच कोणी?

ओसी मिळाल्यानंतरच पैसे भरून घेणे बंधनकारक असताना पणन विभागाने कोणत्या अधिकाराने ओसी नसताना पैसे भरून घेतले? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. कारण संबंधित कार्यकारी अभियंता विभागाने ओसी मिळाल्याचे कळवल्यानंतरच पैसे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. पण येथे ओसी नसताना, ओसी कधी मिळणार याबाबत साशंकता असताना पैसे भरून घेण्यात आले असून अद्यापही ओसी मिळालेली नाही विशेष. तर ओसी कधी मिळणार? याचे ठोस उत्तर अद्यापही मुंबई मंडळाकडे नाही. तर मनमानीपणे ही प्रक्रिया कशी आणि नेमकी कुणी सुरू केली? यावरूनच गोंधळ सुरू आहे.


म्हणे, आठवड्याभरात ओसी मिळेल...

'मुंबई लाइव्ह'ने दोन आठवड्यांपूर्वी मालवणी आणि मुलुंडमधील घरांचा ताबा रखडल्यासंबंधीचे वृत्त दिले होते. या वृत्तानुसार मुंबई मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्याने त्यावेळी 'आठ दिवसांत मालवणीतील घरांना ओसी मिळेल' असा दावा केला होता. पण पंधरा दिवस उलटून गेले तरी ओसी मिळालेली नाही. असे असताना आताही या अधिकाऱ्यांंकडून 'आठ दिवसांतच ओसी मिळेल' असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे म्हाडा मुंबई मंडळ विजेत्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप होत आहे.


मालवणीतील 2015 मधील विजेत्यांना अद्याप ताबा देण्यात आलेला नाही हे खरे आहे. पण नेमके हे प्रकरण काय आहे, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतल्यानंतरच मी यावर भाष्य करू शकेन.

सुभाष लाखे, मुख्य अधिकारी, म्हाडा


अधिकारी पालिकेत ठाण मांडून?

विजेत्यांकडून प्रचंड संताप व्यक्त होत असल्याने आणि या चुकीच्या निर्णयामुळे मंडळ चांगलेच अडचणी आल्याने आता काय करायचे? असा प्रश्न मंडळासमोर, अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर ओसी मिळावी यासाठी आता मंडळाने मुंबई महानगरपालिकेकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. 'मुंबई लाइव्ह'ला मिळालेल्या माहितीनुसार, काही अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून पालिकेत ठाण मांडून आहेत. मात्र असे असले तरी ओसी कधी मिळणार? हे अद्याप निश्चित नसल्याने पैसे भरलेल्या विजेत्यांना याचा चांगला फटका बसणार हे निश्चित.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या