Advertisement

म्हाडाच्या 'परवडणाऱ्या' घराची किंमत 1 कोटी 61 लाख!


म्हाडाच्या 'परवडणाऱ्या' घराची किंमत 1 कोटी 61 लाख!
SHARES

मुंबईत परवडणाऱ्या दरात हक्काचे घर मिळवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे म्हाडा. पण गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या घरांच्या किमतीही वाढत चालल्याने म्हाडाची घरे महाग होऊ लागली आहेत. त्यानुसार ऑगस्टमध्ये होणाऱ्या म्हाडाच्या लाॅटरीतील घरे महागडी असतील अशी अटकळ तर होतीच; पण तुंगा, पवई येथील उच्च उत्पन्न गटातील घराची किंमत एेकून तुम्हाला नक्कीच भोवळ येईल.


सर्वात महागडी घरे

म्हाडाने तुंगा, पवईतील घरांची किंमत चक्क 1 कोटी 61 लाखांपर्यंत नेऊन ठेवल्याची माहिती म्हाडातील विश्वसनीय सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. 'मुंबई लाइव्ह'ने संबंधित विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. यावरुन ऑगस्टमध्ये होणाऱ्या म्हाडाच्या लॉटरीतील पवईमधील घरे आतापर्यंतची सर्वात महागडी घरे ठरणार आहेत.


तुंगात 740 चौ. फुटांची 168 घरे

म्हाडाचे मुंबई मंडळ आॅगस्टमध्ये अंदाजे 784 घरांसाठी सोडत काढण्याची जोरदार तयारी करत आहे. या सोडतीत तुंगा, पवई येथील अंदाजे 740 चौ. फुटां(कार्पेट एरिया)च्या उच्च उत्पन्न गटातील 168 घरांचा समावेश आहे.


'महारेरा'त नोंदणी

बिल्टअप एरियानुसार या घरांचे क्षेत्रफळ 1100 चौ. फुटाच्या वर जाते. या घरांची 'महारेरा'त नोंदणी करण्यात आली आहे. म्हाडाला या लॉटरीची लवकरच जाहिरात प्रसिद्ध करायची असल्याने या घरांची विक्री किंमत निश्चित करण्यात आली आहे.


अर्जदारांचा कसा प्रतिसाद?

त्यानुसार तुंगा, पवईतील घरांची किंमत 1 कोटी 61 लाखांच्या घरात जाणार आहे. या महागड्या घरांना आता अर्जदारांकडून आणि त्यानंतर प्रत्यक्ष विजेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


15 लाखांनी वाढली किंमत

उच्च गट-2 या वर्गात 22 मजल्याच्या तीन इमारती बांधण्यात आल्या. त्यात 740 चौ. फुटांचे 2 बीएचकेचे प्रत्येकी 84 फ्लॅट आहेत. ही घरे बांधून केव्हाच तयार आहेत. परंतु अद्याप या घरांचा लॉटरीत समावेश करण्याची म्हाडाची हिंमत होत नव्हती.


टीकेनंतर घरे वगळली

या घरांचा 2014 च्या लाॅटरीत समावेश करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. परंतु, त्यावेळी या घरांची किंमत 1 कोटी 46 लाखांच्या घरात असल्याने म्हाडावर प्रसारमाध्यमातून मोठी टीका झाली. त्यानंतर म्हाडाने ही घरे लाॅटरीतून वगळली.


आकडा वाढण्यासाठी धाडस

ही घरे धूळ खात पडून राहण्यापेक्षा कोस्टगार्ड आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पण सर्वसामान्यांची घरे या कर्मचाऱ्यांना का? यावरुनही वाद रंगल्यानंतर हा प्रस्ताव बारगळला. यंदाच्या लाॅटरीत पुरेशी घरे नसल्याने घरांचा आकडा वाढवण्यासाठी म्हाडाने या महागड्या घरांचा लाॅटरीत समावेश करण्याचे धाडस दाखवले आहे.


का वाढल्या किंमती ?

ही घरे बांधण्यासाठी डोंगर पोखरुन काढावा लागल्याने बांधकाम शुल्क आणि जमिनीचे शुल्क भरमसाठ वाढले. त्यातच महापालिकेला येथे एक म्युन्सिपल ट्रेनिंग सेंटर बांधून द्यावे लागले.


व्याजही लावले

त्यामुळे हा सर्व खर्च विक्री किंमतीत समाविष्ट करण्यात आल्याने घरांच्या किमती वाढल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. त्यातच इतर कर, प्रशासकीय खर्च आणि 2018 पर्यंतचे व्याजही किंमतीत समाविष्ट केल्यानेही किंमती वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


अल्प गटातील घरांचाही भार

महत्वाचे म्हणजे अत्यल्प आणि अल्प गटातील घरे महाग होऊ नयेत, याकरीता गरीबांसाठीच्या घरांच्या किंमतीचा भारही याच उच्च उत्पन्न गटातील घरांवर टाकल्याचे अधिकारी सांगत आहेत. मुंबईसारख्या महागड्या शहरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे भल्या-भल्यांना जमत नाही. तिथे म्हाडावर विसंबून असलेल्या सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना तर हक्काच्या घराचे स्वप्न पाहणेही महागडे ठरावे, अशा या किंमती आहेत.



हे देखील वाचा -

म्हाडाने अखेर ती 159 घरे लॉटरीतून वगळली!

आता म्हाडाची फी भरा ऑनलाईन!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा