आता म्हाडाची फी भरा ऑनलाईन!

  Mumbai
  आता म्हाडाची फी भरा ऑनलाईन!
  मुंबई  -  

  आॅगस्टमध्ये 800 घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदाच्या लाॅटरीत आॅनलाईन प्रक्रियेमध्ये सुधारणा करून अर्जदारांना दिलासा देण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न आहे.


  पहिल्यांदाच 'एनईएफटी', 'आरटीजीएस'चा पर्याय

  त्याचाच एक भाग म्हणून अर्जदारांसह विजेत्यांना सहजपणे पैशांचे हस्तांतरण करता यावे, या उद्देशांने त्यांच्यासाठी 'एनईएफटी' आणि 'आरटीजीएस'चा पर्यायही म्हाडा यंदा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


  ऑनलाईन प्रक्रियेला अर्जदार सरावले

  म्हाडाने काही वर्षांपूर्वी डिजिटल होत आॅनलाईन अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीला अर्जदारांना ही प्रक्रिया थोडी अडचणीची वाटली. पण आता आॅनलाईन प्रक्रियेला अर्जदार सरावले आहेत.

  अर्जदारांना सुरुवातीला लाॅटरीसाठी प्रक्रिया शुल्क (अर्जासाठीची रक्कम) आणि अनामत रक्कम भरावी लागते. तर लाॅटरीत विजेते ठरल्यानंतर घराची रक्कमही म्हाडाला अदा करावी लागते.

  सद्यस्थितीत ही रक्कम भरण्यासाठी डी.डी. (डिमांड ड्राफ्ट)सोबतच ऑनलाईन बँकिंगचा पर्यायही खुला आहे. त्यात आता अर्जदारांना एनईएफटी' आणि 'आरटीजीएस' चा पर्यायही मुंबई मंडळ उपलब्ध करुन देत आहे.


  'डिमांड ड्राफ्ट'चा त्रास

  • डी.डी.साठी बँकेत लावावी लागते रांग
  • बँकेला द्यावे लागते भरमसाठ शुल्क
  • पैसे म्हाडाच्या खात्यात जमा होण्यास विलंब


  या सर्व बाबी लक्षात घेत मुंबई मंडळाने अनामत रक्कम, प्रक्रिया शुल्क आणि घराची रक्कम भरण्यासाठी एनईएफटी ( नॅशनल इलेक्ट्राॅनिक फंड ट्रान्सफर) आणि आरटीजीएस (रिअल टाइम ग्राॅस सेटलमेन्ट) चा पर्याय उपलब्ध केल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली आहे.


  डिमांड ड्राफ्टच्या पर्यायावर निर्णय घेणार

  हा पर्याय आॅगस्टमध्ये होणाऱ्या लाॅटरीपासूनच लागू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नाममात्र शुल्क भरुन पैशांचे हस्तांतरण करण्याचा हा पर्याय अर्जदार, विजेत्यांच्या फायद्याचा असेल, असेही सुभाष लाखे यांनी स्पष्ट केले आहे.

  यंदाच्या लाॅटरीत एनईएफटी, आरटीजीएससह, डी.डी.चा पर्यायही उपलब्ध असेल. या नव्या पर्यायांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून डी.डी.चा पर्याय रद्द करायचा की नाही त्याचा निर्णय घेण्यात येईल.


  'आरटीजीएस'चे फायदे

  • एका बँकेतून दुसऱ्या बँकेत विनाविलंब रकमेचे हस्तांतर
  • 2 लाख रुपये करता येतात हस्तांतरित
  • प्रतिव्यवहार 50 रुपये ते 200 रुपयांपर्यंत शुल्क
  • डिमांड ड्राफ्ट प्रत्यक्ष हाताळण्याची जोखीम टळते


  'एनईएफटी'चे फायदे

  • देशातील कोणत्याही बँकेत पैसे हस्तांतर करता येतात
  • एकावेळी 10 लाखापर्यंत पैसे हस्तांतरित होतात
  • रक्कम पाठवणारी आणि स्वीकारणारी व्यक्ती यांचे संबंधित बँकेत खाते असण्याची गरज नाही


  नेटबँकिंग करणाऱ्यांनी बँकेत न जाता घरच्या संगणकावरुन 'आरटीजीएस' किंवा 'एनईएफटी'चा पर्याय निवडावा. ज्या व्यक्तीला तुम्हाला रक्कम द्यायची आहे, त्या व्यक्तीचा खाते क्रमांक द्यावा, काही बँका 'आयएफएस कोड' विचारतात. तेव्हा हा कोड संबंधित बँकेकडून घ्यावा किंवा रिझर्व्ह बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर जाऊन संबधित बँकेचा 'आयएफएस कोड' मिळवावा.


  'आरटीजीएस', 'एनईएफटी' हस्तांतरणासाठी आवश्यक माहिती


  • खाते ज्या नावाने आहे, ते नाव
  • बॅंकेचे नाव, ब्रँच
  • म्हाडाच्या खात्याचा अकाऊंट नंबर
  • आयएफएससी को़
  • एमआयसीआर कोड
  • हस्तांतरित करण्याची निश्चित रक्कम
  हे देखील वाचा - 

  31 जुलैपर्यंत भरता येणार गिरणी कामगारांना अर्ज

  ऑगस्टमध्ये म्हाडाच्या 800 घरांची लॉटरी!  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.