Advertisement

म्हाडाचा ढिसाळ कारभार; अनेक गिरणी कामगारांनी अर्ज भरलेच नाहीत


म्हाडाचा ढिसाळ कारभार; अनेक गिरणी कामगारांनी अर्ज भरलेच नाहीत
SHARES

गिरण्यांच्या जमिनीवरील हक्काच्या घराच्या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी अर्ज न भरलेल्या गिरणी कामगारांची अखेर शुक्रवारी प्रतिक्षा संपली. शुक्रवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने अर्ज न भरलेले गिरणी कामगार आणि त्यांचे वारस खूश होते. पण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा? याची अशिक्षित गिरणी कामगारांना काहीच कल्पना नसल्याने, त्यातच म्हाडाची हेल्पलाईन पहिल्याच दिवशी कोलमडल्याने, तसेच कोटक महिंद्रा बँकेत शुल्क भरून घेतलेच जात नसल्याने गिरणी कामगारांच्या-वारसांच्या पदरी पहिल्या दिवशी निराशाच पडली. नोंदणी झाली पण शुल्क न भरता आल्याने गिरणी कामगारांचा हिरमोड झाला. तर दुसरीकडे ऑनलाईन प्रक्रियाच न समजल्यामुळे नोंदणी करता न आल्याने अनेक गिरणी कामगार-वारस पहिल्या दिवशी नोंदणी वा अर्ज भरू शकले नसल्याची माहिती गिरणी कामगार संघटनांनकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा -

अर्ज न भरलेल्या गिरणी कामगारांना दुसरी संधी


सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान 67 गिरणी कामगारांनी नोंदणी केल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे. मुळात गिरणी कामगार अशिक्षित असल्याने ऑनलाईन अर्ज कसा भरायचा? हाच मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेत अर्ज भरण्यासाठी गिरणी कामगारांना वेळ लागत असल्याची माहिती गिरणी कामगार कल्याणकारी संघाच्या चेतना राऊत यांनी दिली आहे. आधी नोंदणी आणि त्यानंतर चलानाद्वारे कोटक महिंद्रा बँकेच्या तीन शाखांमध्ये ऑनालाईन 150 रुपये शुल्क भरल्यानंतर प्रत्यक्षात अर्ज भरता येणार आहे. त्यानुसार नोंदणी करत बँकेत शुल्क भरण्यासाठी काही कामगार गेले असता त्यांचे शुल्क भरून घेण्यात आले नाही. म्हाडाकडून अद्याप यासंबंधीच्या काहीच सूचना न आल्याने हे शुल्क भरून घेतले जाणार नाही, असे कामगारांना बँकेकडून सांगण्यात आल्याने कामगार निराश होऊन परतल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. आता या कामगारांना सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे.


हेही वाचा - 

गिरणी कामगारांना मिळणार 7700 घरे, राज्य सरकारचा निर्णय


म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. दरम्यान, गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनीही पहिल्या दिवशी कामगार गोंधळले असल्याचे सांगितले आहे. तर गिरणी कामगारांना आवश्यक ती मदत म्हाडाने करायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचवेळी गिरणी कामगारांना अर्ज भरून देण्यास मदत व्हावी, यासाठी गिरणी कामगार संघर्ष समितीकडूनही आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अजब...खणखणाट वाढला म्हणून हेल्पलाईनच केली बंद -

सकाळी 11 वाजता अर्ज भरण्यास सुरूवात होणार म्हणून सकाळपासूनच हेल्पलाईनवर कामगारांचे फोन येऊ लागले. हळूहळू फोनचा खणखणाट वाढतच गेला आणि काही वेळातच ही हेल्पलाईन बंद पडली. खूप फोन येत असल्याने फोन बंद केल्याची चर्चा म्हाडात होती. त्यामुळे 'मुंबई लाइव्ह'ने त्वरीत म्हाडाच्या मुबंई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी (अतिरिक्त पदभार) ए. डी. दहिफळे यांच्याशी संपर्क साधत यासंबंधी तक्रार केली. दहिफळे यांनी त्वरीत लक्ष घालून हेल्पलाईन सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार दुपारी तीनच्या दरम्यान हेल्पलाईन सुरू झाली आणि कामगारांना म्हाडाशी संवाद साधता येऊ लागला. दरम्यान, म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हेल्पलाईन बंद होती, दुपारी या तांत्रिक अडचणी दूर करत हेल्पलाईन पुन्हा सुरू केल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ –http://millworker.mhada.gov.in

प्रशासकीय शुल्क 150 रुपये भरण्यासाठीच्या कोटक महिंद्रा बँकेच्या शाखा पुढील प्रमाणे - 

वरळी शाखा- शॉप नं. 3-10, तळमजला, सिटी व्ह्यू, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई -18. दूरध्वनी क्र. - 022-67474200

लालबाग शाखा- वीर महल स. गृ. सं. तळमजला, शॉप नं. 9-12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई-10. दूरध्वनी क्र. 022-65991958-90

वांद्रे पूर्व- हॉलमार्क प्लाझा, तळमजला, गुरूनानक हॉस्पिटल जवळ, वांद्रे पूर्व, मुंबई-51. दूरध्वनी क्र. 022-66056612

म्हाडा हेल्पलाईन नंबर - 9869988000, 022-26598921 ते 24

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा