अर्ज न भरलेल्या गिरणी कामगारांना दुसरी संधी


SHARE

अर्ज न भरू शकल्याने हजारो गिरणी कामगारांचे हक्काचे घराचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. आता मात्र अर्ज न भरू शकलेल्या या कामगारांचेही हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. कारण म्हाडाने अशा कामगारांना एक संधी देण्याचा निर्णय घेतला असून, त्याद्वारे या कामगारांकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार म्हाडाने यावेळी ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्षात अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

अर्ज न भरलेल्या कामगारांची संख्या खूप मोठी असल्याने कामगार आणि गिरणी कामगार संघटनांकडून अशा कामगारांना एक संधी देण्याची मागणी होत होती. अखेर ही मागणी सरकारने मान्य केल्याने म्हाडाने अर्ज भरून घेण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. याआधी बँकेच्या माध्यमातून अर्ज भरून घेण्यात आले होते. यावेळी मात्र आँनलाईन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. 

म्हाडाच्या या निर्णयामुळे अर्ज गहाळ होणे, अर्जात फेरफार, अर्जातील चुका अशा बँकेच्या चुकांमुळे कित्येक कामगार सोडतीत सहभागी होऊ शकलेले नव्हते. आँनलाईन प्रक्रियेमुळे अशा चुका होणार नसल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे. पण कामगार हा मोठ्या संख्येने गरीब-अशिक्षित असल्याने त्यांना ऑनलाईन अर्ज हे कामगार कसा भरणार? असा प्रश्न गिरणी कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे. तर कामगार वर्ग खेड्यापाड्यात विखुरलेला असल्याने त्यांच्यापर्यंत यासंबंधीची माहिती कशी पोहचणार? असाही सवाल संघटनांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील कानाकोपऱ्यातील कामगारांपर्यंत ही माहिती पोहचेल यासाठी म्हाडाने प्रयत्न करावेत, तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती मदत करावी, अशी मागणी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या