Advertisement

ऑगस्टमध्ये म्हाडाच्या 800 घरांची लॉटरी!


ऑगस्टमध्ये म्हाडाच्या 800 घरांची लॉटरी!
SHARES

मागील 10 ते 12 वर्षांपासून दरवर्षी मे महिन्यात मुंबईतील घरांची लाॅटरी काढून हजारो जणांच्या हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले आहे. पण यंदा मुंबई मंडळाच्या ताब्यात लाॅटरीसाठी घरेच नसल्याने म्हाडाचा मे महिन्याचा मुहूर्त चुकला. यामुळे म्हाडा आता नवीन घरांची लॉटरी कधी काढणार? याच प्रतिक्षेत सर्वसामान्य होते. परंतु सर्वसामान्यांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार असून 'देर आये, दुरूस्त आये' या म्हणीनुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाने ऑगस्टमध्ये 800 घरांसाठी लॉटरी काढण्याचे ठरवले आहे. या संदर्भातील जाहिरात येत्या 15 दिवसांत निघेल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


शोधून काढली 800 घरे -

मुंबई मंडळाकडे नवीन घरांच्या निमिर्तीसाठी मोकळी जागाच उपलब्ध नसल्याने गेल्या काही वर्षांत नवीन प्रकल्पच सुरू झालेले नाहीत. त्यामुळे मागील तीन-चार वर्षांपासून मंडळाला लाॅटरीसाठी तयार घरे शोधून काढावी लागत आहेत. म्हणूनच अगदी 20 वर्षे जुनी घरेही मागच्या दोन वर्षांपासून लाॅटरीत समाविष्ट केली जात आहेत. यंदा तर मे महिन्यापर्यंत मुंबई मंडळाच्या ताब्यात घरेच नसल्याने म्हाडाने लॉटरी काढली नाही. त्यावरुन मुंबई मंडळाला बरीच टीकाही सहन करावी लागली. पण मुंबई मंडळाने प्रयत्नपूर्वक 800 घरे शोधून काढत ऑगस्टमध्ये लाॅटरी काढण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा - 

गोरेगावातल्या 'त्या' जमिनीवर म्हाडा बांधणार ३००० घरं



घरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न -

सध्या 800 घरांसाठी लाॅटरी काढण्यात येणार असली तरी पुढच्या दहा दिवसांत घरांचा आकडा 1000 पर्यंत नेता येईल का? याचा प्रयत्नही मंडळाकडून सुरू आहे. यंदाच्या लाॅटरीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्वच गटातील घरांचा समावेश असल्याचेही म्हैसकर यांनी सांगितले.


'महारेरा'त नोंदणी -

लाॅटरीत समाविष्ट करण्यात येणाऱ्या काही घरांची 'महारेरा'त नोंदणी झाली असून उर्वरित घरांची नोंदणी आठवड्याभरात करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढच्या 15 दिवसांत मुंबईकरांची लाॅटरीची प्रतिक्षा संपणार असून परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची नवी संधी मुंबईकरांना मिळणार आहे.


या परिसरातील घरांसाठी निघेल लाॅटरी -

चारकोप, तुंगा- पवई, सिद्धार्थनगर-गोरेगाव, महावीरनगर-कांदिवली, कन्नमवार नगर-विक्रोळी, गव्हाणपाडा-मुलुंड


हेही वाचा - 

म्हाडाचा अट्टाहास पत्राचाळीतील 306 विजेत्यांना पडणार भारी?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा