'एमएमआरडीए'ची लॉटरी लागली, पण सूचना पत्र कधी?

  Mumbai
  'एमएमआरडीए'ची लॉटरी लागली, पण सूचना पत्र कधी?
  मुंबई  -  

  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)च्या भाडेतत्वावरील प्रकल्पातील गिरणी कामगारांसाठीच्या 2417 घरांसाठी म्हाडाकडून 2 डिसेंबर 2016 मध्ये लाॅटरी काढण्यात आली होती. सहा महिने उलटून गेले, तरी या लाॅटरीतील विजेते अद्याप 'प्रथम सूचना पत्रा'च्या प्रतिक्षेत आहेत. ही घरे तयार असतानाही या घरांचा ताबा देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने कोणतेही पाऊल उचललेले नसल्याने विजेत्या गिरणी कामगारांमध्ये नाराजी आहे.

  मुंबईत 1 लाख 48 हजार गिरणी कामगारांना घरे देणे शक्य नसल्याने सरकारने एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील प्रकल्पातील 50 टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2 डिसेंबर 2016 मध्ये म्हाडाने एमएमआरडीएच्या 2417 घरांसाठी लाॅटरी काढली. एमएमआरडीएची घरे 160 चौ. फुटांची असल्याने दोन घरे एकत्रित करत 320 चौ. फुटाची दोन घरे कामगारांना देण्यात आली आहेत.


  हेही वाचा

  मास्टरलिस्टमधील 159 घरे मुंबईच्या लाॅटरीत!


  या तयार घरांचा ताबा देण्यासाठी विजेत्यांची पात्रता निश्चित होणे आवश्यक ठरते. त्यानुसार विजेत्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी एमएमआरडीएने आतापर्यंत 'प्रथम सूचना पत्र' पाठवले पाहिजे होते. पण अद्याप विजेत्यांना 'प्रथम सूचना पत्र' पाठवली नसल्याने विजेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती गिरणी कामगार कल्याणकारी संघाच्या चेतना राऊत यांनी दिली.

  लॉटरी विजेत्यांना 'प्रथम सूचना पत्र' पाठवण्यात न आल्याने पात्रता निश्चितीची कागदपत्रे जमा कधी करुन घेणार? पात्रता निश्चिती कधी होणार? आणि विजेत्यांना प्रत्यक्षात घरांचा ताबा कधी मिळणार? असे अनेक प्रश्न विजेत्यांना सतावत आहेत.

  यावरुन एमएमआरडीएच्या घरांचा प्रत्यक्षात ताबा मिळण्यासाठी विजेत्यांना बराच काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. याविषयी म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याने त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.