दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा 'या' महिन्यात होणार

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा यंदा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा विचार राज्यमंडळाकडून करण्यात येत आहे. यापूर्वी या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येत होत्या. पण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहेत.

मात्र, या फेरपरीक्षा घेण्यास पालकांनी विरोध केला आहे. याबाबत काही संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

५ वर्षांपूर्वी मंडळानं नियमात बदल करून फेरपरीक्षा जुलैमध्ये घेण्यास सुरूवात केली. जुलै-ऑगस्टमधील परीक्षांचा निकाल साधारण महिन्याभरात जाहीर करून विद्यार्थ्यांना त्याचवर्षी अकरावीला प्रवेश दिला जात होता. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षांचे निकाल दरवर्षीपेक्षा उशीरा जाहीर झाले. फेब्रुवारी-मार्चमधील परीक्षांचे निकालच जुलै महिन्यात जाहीर झाले. त्यामुळे यंदा जुलैमध्ये फेरपरीक्षा घेणं शक्य झालं नाही.

हेही वाचा : अकरावी ऑनलाईन प्रवेशाची ३० ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी

आता ऑक्टोबरमध्ये फेरपरीक्षा घेण्याचा विचार राज्यमंडळ करत आहे. याबाबत गुरूवारी मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानुसार ६ ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याचे संभाव्य वेळापत्रक मंडळानं तयार केलं आहे. विभागीय मंडळांकडून या वेळापत्रकावर १७ ऑगस्टपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत. विभागीय मंडळाच्या सूचनांनंतर आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून मंडळाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच अकरावीला प्रवेश देण्यात येणार का? याबद्दल अजूनही संभ्रम आहे. अजून तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यांत विद्यार्थ्यांना एटीकेटी किंवा फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. पण कोरोनाच्या संकटामुळे सर्वच पुढे ढकललं जात आहे.


हेही वाचा

अक्षरांमध्ये अडखळणाऱ्या विद्यार्थ्याला दहावीत ९० टक्के गुण!

कर्करोगाशी झुंजत अमृतानं दहावीत मिळवले ८४ टक्के गुण!

पुढील बातमी
इतर बातम्या