Advertisement

कर्करोगाशी झुंजत अमृतानं दहावीत मिळवले ८४ टक्के गुण!

अत्यंत प्रेरणादायी, खरीखुरी गोष्ट आहे, सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमधील अमृता महेंद्र कालुष्टे या विद्यार्थिनीची.

कर्करोगाशी झुंजत अमृतानं दहावीत मिळवले ८४ टक्के गुण!
SHARES

जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर जग जिंकता येतं, असं एनेकदा ऐकलं असेल. पण मुंबईच्या एका १० वीत बसलेल्या ‘ती’नं ही म्हण खरी करून दाखवली. हाडांचा कर्करोग... त्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना... या अडचणी तिच्यावर हावी नाही झाल्या. या अडचणींचा जिद्दीनं तिनं सामना केला. ती लढली आणि ही लढाई तिनं जिंकली. ही अत्यंत प्रेरणादायी, खरीखुरी गोष्ट आहे, सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमधील अमृता महेंद्र कालुष्टे या विद्यार्थिनीची.

हाडांचा कर्करोग झाल्यामुळे अमृता एकाच ठिकाणी फार वेळ बसू शकत नव्हती. त्यामुळे बोर्डाचे लेखी पेपर सोडवणं तर अशक्यच होतं. केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि दहावीचा अभ्यास अशा सर्वच आघाड्यांवर 'ती' लढत होती. पण काहीही करुन 'ती'ला दहावीचं वर्ष वाया घालवायचं नव्हतं. अखेर 'ती'नं लेखन मदतनीस घेऊन दहावीची परीक्षा दिली आणि ८३.६० टक्के गुण मिळवून 'ती' उत्तीर्णही झाली.

अमृताची आई ज्योती कालुष्टे यांनी सांगितलं की, "कर्करोगाचं निदान झाल्यावर अमृता आठवीचं वर्ष शाळेत जाऊ शकली नाही. नववीत सहामाहीनंतर ती शाळेत जाऊ लागली. दहावीच्या वर्षातही तिच्या आजारपणामुळे तिला नियमित शाळेत जाता आलं नाही. घरी असली तरी ती तिचा अभ्यास मात्र नियमित करायची. शाळेतील शिक्षक तिला मार्गदर्शन करायचे."

अमृताचे वडील महेंद्र कालुष्टे हे पोलीस खात्याच्या सेवेत असून कालुष्टे कुटुंब कुर्ल्याच्या डोंगरचाळ इथं राहतात. अमृताला हाडांचा कर्करोग असल्याचं निदान २०१७ साली झालं. तेव्हापासून ती केमोथेरपी घेत होती. दहावीच्या परीक्षेच्या एक महिना आधीच तिच्यावर एक लहानशी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. असं असतानाही जिद्दी स्वभावाच्या अमृतानं लेखन मदतनीसच्या (रायटर) मदतीनं दहावीची परीक्षा दिली.

“आजारपणामुळे दहावीच्या वर्षात मला नियमितपणे शाळेत जाता आले नाही. पण शाळेतील शिक्षक आणि मैत्रिणींच्या सहकार्यानं मी अभ्यास केला. बोर्डाच्या परीक्षेत ८३ टक्के गुण मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. आता मला वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा असून बॅंकिंगमध्ये करीअर करायची इच्छा आहे." 

आई वडिलांसोबतच तिच्या शाळेचा देखील मोलाचा वाटा तिच्या यशात आहे. आजारपणामुळे तिला शाळेत जाता नाही यायचं. पण कधी शाळेनं तिच्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती केली नाही. तिला सांभाळून घेतलं.

"डी. एस. हायस्कूल मराठी माध्यमाच्या शाळेचा निकाल यंदा ९९.८२ टक्के लागला याचा आम्हाला आनंद आहेच. पण त्याहून आनंद झाला तो अमृता कालुष्टे या विद्यार्थिनीच्या विशेष यशामुळे. कर्करोगासारख्या संकटाशी झुंजत तिने ८३.६० गुण मिळवून सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेला खरोखरच अभिमान वाटतो, असं डी.एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं.हेही वाचा

मेहनतीला मिळालं यश, दहावी परीक्षेत मिळाले ९९.६० टक्के

संबंधित विषय