हिवाळी अधिवेशनात आम्ही कुणाला प्रश्न विचारायचे? खातेवाटपावरून फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अजूनही होऊ शकलेला नाही. त्यातच हिवाळी अधिवेशन तोंडावर आल्याने या अधिवेशनात आम्ही कुणाला प्रश्न विचारायचे असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा- 'कॅब' विधेयकावरून शिवसेनेचं भांगडा पाॅलिटिक्स सुरू, ओवेसी यांची बोचरी टीका

नागपूरचे अधिवेशन फक्त ६ दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. कारण मंत्रीमंडळ विस्ताराचा विषय तर दूरच अजून मंत्रीमंडळाचं खातेवाटप देखील झालेलं नाही. त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून हे अधिवेशन घेतलं जात आहे. हे अधिवेशन किमान २ आठवड्यांचं असावं, अशी मागणी आम्ही कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली; पण सरकारने ती फेटाळली. अशा स्थितीत आगामी अधिवेशनात आम्ही कोणाला कोणते प्रश्न विचारायचे? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. 

अधिवेशन कितीही दिवसांचं घ्या पण आधी शेतकऱ्यांना मदत करा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. परंतु ही मदत तर सोडाच, आमच्या सरकारने जाहीर केलेली मदतही शेतकऱ्याला मिळू शकलेली नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना मदत देण्याची आग्रही मागणी केली.

हेही वाचा- भाजप, शिवसेना एकत्र येणार?, मनोहर जोशींनी केलं खळबळजनक वक्तव्य

शिवाय नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने लोकसभेत मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मात्र भूमिका बदलली, महाराष्ट्रातील सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसच्या दबावाला शिवसेना बळी तर पडली नाही ना? असा सवालही उपस्थित करत शिवसेना हे विधेयक तसंच एनआरसीबद्दलची भूमिका बदलणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुढील बातमी
इतर बातम्या