शरद पवार यांच्या 'सिलव्हर ओक' बंगल्यातील १२ जणांना कोरोना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी १२ संक्रमित कोरोनाव्हायरसचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दक्षिण मुंबईतील त्यांचं निवासस्थान सिलव्हर ओक इथं आढळलेले १२ पॉझिटिव्ह रुग्ण हे त्यांच्या कर्मचारी आहेत. सुरक्षा कर्मचारी आणि घरगुती कामगार यासारख्या लोकांचा यात समावेश आहे.

रविवारी शरद पवार यांना ब्रीच कँडी रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. जिथं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवानं त्यांची कोरोनाची चाचणी नेगेटिव्ह आली. कोरोना पॉझिटिव्ह आलेले त्यांचे सुरक्षारक्षक हे शदर पवार यांच्या सोबत दौऱ्यावर होते. त्यामुळे खबरदारी म्हणून पवारांचीही चाचणी घेण्यात आली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, पवारांना काही दिवस कोणत्याही राज्यात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांची चाचणी नेगेटिव्ह आली असून काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही.

हेही वाचा : शिव वडापाव, शिव थाळीनंतर येत आहेत शिव दवाखाने, भाजपची टीका

ते पुढे म्हणाले की, ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्यांच्यामध्ये काहींमध्ये लक्षणं नाहीत. तर काहींमध्ये सौम्य लक्षणं आहेत. त्या सर्वांना वरळी इथल्या एनएससीआय सुविधागृहात हलवण्यात आलं आहे.

सोमवारी, पवारांच्या मुंबई निवासस्थानी तैनात कुक आणि दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांसह चार जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हा त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली. त्यातून १२ कर्मचारी पॉझिटिव्ह आले.

पवार यांनी नुकताच सातारा जिल्ह्यातील कराडचा दौरा केला होता. त्यांनी महाराष्ट्राचे सहकार पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली होती. ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले. सातारा जिल्ह्यातील कराड इथल्या कृष्णा रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनाही कोरोनोची लागण झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात आतापर्यंत सात मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.


हेही वाचा

तुमच्या आशीर्वादामुळेच मी वाचले, नवनीत राणांनी मानले आभार

भाजपने दाखवला पडळकरांवर विश्वास, दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

पुढील बातमी
इतर बातम्या