गणपती...कोकणातील महत्त्वाचा सण...गणपतीक गावाक जातलंय ना! असो प्रश्न प्रत्येक जण आपल्या नातेवाईका ईचारल्या शिवाय रवाना नाय.
खरेतर होळी आणि गणेशोत्सव या सणांना मुंबईत राहणारे अनेक चाकरमानी कोकणाला आपल्या गावी आवर्जून जातात. मात्र गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण जास्त असते. याचसाठी प्रशासनाकडून देखील योग्य खबरदारी घेतली जाते. रेल्वे प्रशासन असो किंवा एसटी प्रशासन असो जादा गाड्या या काळात सोडल्या जातात. मात्र या गाड्यांचेही तिकीट फुल झाल्याने काही जण खासगी बसचा मार्ग अवलंबतात. पण याच काळात खासगी बसकडून प्रवाशांची लूट होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यंदा देखील हेच चित्र समोर आले आहे.
मुंबईहून रत्नागिरी, सावंतवाडी, गोव्यापर्यंतच्या वातानुकूलित प्रवासासाठी प्रत्येकी तब्बल 1,500 रुपये ते 2,500 रुपये, तर बिगरवातानुकूलित प्रवासासाठी 1000 रुपयांपेक्षा जास्त शुल्क प्रवाशांना मोजावे लागत आहे.
ठिकाण | एसी बस | नॉन एसी बस |
सावंतवाडी | 1700 | 1200 |
सावंतवाडी (स्लीपर) | 2000 | 1400 |
कणकवली | 1800 | 1200 |
रत्नागिरी | 1400 | 1000 |
चिपळूण | 1700 | 1200 |
ऐन सणासुदीत खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून बसभाड्यांत वाढ केली जाते. त्यावर सरकारने नियंत्रण ठेवावे, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. साधारणपणे एक वर्षांपूर्वी या सूचना केल्यानंतरही सरकारला त्यावर अद्यापही नियंत्रण ठेवता आले नाही.
कोकणात जाणाऱ्या काही नामांकीत ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसचे तिकीट ऑनलाइन बुक केल्यास ते सवलतींसह स्वस्तात उपलब्ध होत आहे. गणेशोत्सवात बिगरवातानुकूलित कोकणापर्यंतचे तिकीट 800 ते 1000 रुपयांपर्यंत आणि वातानुकूलित प्रवास तिकीट 1,200 ते 1,400 रुपयांपर्यंत आहे.
दरम्यान सिजनमध्ये आम्हाला चार पैसे कमावण्याची संधी मिळते. इतर वेळी आमच्या गाड्या रिकाम्या जात असतात म्हणून हे दर आम्ही वाढवतो अशी प्रतिक्रिया मुंबई लाईव्हला नाव न छापन्याच्या अटीवर देण्यात आली आहे.
हेही वाचा -
गणेशोत्सवात गावी वेळेत पोहोचाल काय? एसटी कर्मचारी संपाच्या तयारीत
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन!