Advertisement

मुंबई महापालिका करणार भटक्या श्वानांचं लसीकरण

मुंबई शहर आणि उपनगरात भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्याने मुंबई महापालिकेने भटक्या श्वानांना पकडून त्यांचं निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई महापालिका करणार भटक्या श्वानांचं लसीकरण
SHARES

मुंबई शहर आणि उपनगरात (mumbai) भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्याने मुंबई महापालिकेने भटक्या श्वानांना पकडून त्यांचं निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या माेहिमेंतर्गत महापालिका क्षेत्रातील ३२ हजार श्वानांचं लसीकरण वर्षभरात करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेला एका श्वानामागे ६८० रुपयांचा खर्च येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या निर्बीजीकरण मोहिमेचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत मुंबई महापालिका (bmc) भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी मनुष्यबळासह ७ परिमंडळात ७ वाहने उपलब्ध करून देणार आहे. भटक्या श्वानांना पकडल्यानंतर त्यांचं निर्बीजीकरण केंद्रावर जाऊन निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण करण्यात येईल.

मुंबई महापालिकेने २०१४ मध्ये केलेल्या श्वानांच्या मोजणीनुसार मुंबई शहर-उपनगरातील ९५ हजार १७४ भटक्या श्वानांपैकी एकूण २५ हजार ९३५ भटक्या श्वानांचं लसीकरण शिल्लक राहिलं होतं. मुंबई महापालिकेने वर्षाला ३० टक्के भटक्या श्वानांचं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट्य समोर ठेवलं आहे. 

महापालिकेच्या श्वान नियंत्रण विभागात सद्यस्थितीत ५० टक्के पदे रिक्त आहेत. या माहिमेसाठी निधी प्राप्त झाल्यावर विभागात मनुष्यबळ वाढून पायाभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकतील.

मुंबईतील वाढलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे श्वानांकडून दंश होण्याच्या घटनादेखील वाढलेल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या या माेहिमेमुळे श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात यश येईल, परिणामी मुंबईकरांचा त्रास देखील कमी होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement