मिठाला कलेची गोडी

Mumbai
मिठाला कलेची गोडी
मिठाला कलेची गोडी
मिठाला कलेची गोडी
मिठाला कलेची गोडी
See all
मुंबई  -  

मिठाला कलेची गोडी आणणाऱ्या शिवाजी चौगुले यांनी चक्क जाड्या मिठापासून अनेक सुंदर सुबक मनमोहक रांगोळ्या काढल्या आहेत.शिवाजी चौगुले हेे सीएसटी येथे शासनाच्या आरोग्य विभागात शिपाई या पदावर कार्यरत असून, ते कल्याण येथे राहतात. शिवाजी चौगुले यांनी आपली नोकरी करत आपल्यातली कला जोपासली आहे. 

चौगुले यांना लहानपणापासून कलेची आवड होती. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने कलेचे शिक्षण घेणे त्यांना शक्य झालं नाही. त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेण्याची इच्छा होती. ती परिस्थितीमुळे पूर्ण झाली नाही. पण म्हणतात ना आपली इच्छाशक्ती प्रबळ असली की काहीही अशक्य नसतं. असेच काहीसे शिवाजी चौगुले यांच्याबरोबर देखील घडलं. शिवाजी यांनी आपली कला जोपासण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. या विचारातून एक सुंदर कला निर्मिती झाली आणि ती म्हणजे जाड्या मिठापासून रांगोळी काढण्याची. आता कलेला देखील या मिठाच्या सहाय्याने एक गोड चव आणण्याचा प्रयत्न शिवाजी यांनी केला आहे.

जाड्या मिठाच्या सहाय्याने मुलगी वाचवा, तसेच स्त्री भृण हत्या रोखण्याचा संदेश देणारी, तब्बल 40 किलो मिठाचा वापर करून शिवजयंतीला शिवाजी महाराजांची रांगोळी त्यांनी काढली होती. तसेच गणेशोत्सव, स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन अशा अनेक रांगोळ्या काढण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कलेची दखल घेऊन त्यांना अनेकदा सन्मानित देखील करण्यात आले आहे .

शिवाजी चौगुले यांना साथ लाभली ती आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीची. आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार यांची महत्वाची साथ लाभाली आणि नोकरी सोबत कला जोपासणे शक्य झालं, असे मत शिवाजी चौगुले यांनी व्यक्त केलं. तसेच गरजू कलाप्रेमींसाठी रांगोळीचे मोफत प्रशिक्षण सुरू करून या कलेला एक व्यापक स्वरूप देण्याचा त्यांचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या जाड्या मिठापासून त्यांनी काढलेल्या आहेत. पुढे प्रदर्शन भरवण्याचा देखील त्यांचा विचार असून, लिम्का बुकसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती शिवाजी चौगुले यांनी दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.