SHARE

मुंबईतल्या ऐतिहासिक सौंदर्यस्थळांच्या दिमाखात आता नव्याने भर पडणार आहे. 'स्टार्ट फाऊंडेशन'च्या उपक्रमाद्वारे अंदाजे ३० भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार एकत्र येऊन मुंबईच्या साजात भर घालणार आहेत. याच सोबत स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना आर्ट गॅलरीपुरतं मर्यादीत न ठेवता, चर्चासत्र, वर्कशाॅप आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून अधिकाधिक वास्तववादी करण्याचा प्रयत्नही या उपक्रमातून करण्यात येणार आहे. ससून डाॅक आर्ट प्रोजेक्टच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरूवात झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, या कला उपक्रमातून शहरातील काही कानाकोपऱ्यांनी 'फंकी लूक' धारण केल्यास गोंधळून जाऊ नका. तर त्या कलाकृतीचा मनमुराद आनंद लुटून त्याला दाद द्या!


'स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल' म्हणजे काय?

शहरातील सार्वजनिक इमारती आणि रस्त्यांवर साकारण्यात येणाऱ्या कलाकृतीला 'स्ट्रीट आर्ट' असं म्हटलं जातं. त्यानुसार 'स्ट्रीट आर्ट'ला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात ७ 'स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल' आयोजित केल्यानंतर 'स्टार्ट इंडिया फाऊंडेशन' मुंबईत दुसऱ्यांदा हा फेस्टिव्हल आयोजित करत आहे. मुंबईतील महत्त्वाच्या भागाचा कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपात कायापालट या फेस्टिव्हलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी ससून डाॅक सोबतच 'माहीम आर्ट डिस्ट्रीक्ट', 'चर्चगेट स्टेशन', 'जिंदाल मेन्शन' आणि 'इनसाईड आऊट प्राेजेक्ट' हाती घेण्यात आला आहे.


कसा होणार ससूनचा मेकओव्हर?

यंदा 'स्टार्ट इंडिया फाऊंडेशन'ने आपलं संपूर्ण लक्ष १४२ वर्षे जुन्या ऐतिहासिक ससून डाॅकच्या मेकओव्हरकडे केंद्रीत केलं आहे. ससून डाॅक १८७५ साली ज्यू व्यापारी सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हीड ससून यांनी बांधलं होतं. इथूनच मुंबईकरांच्या घराघरांत आजही ताजे मासे येतात. मुंबईतला हा सर्वात जुना मासळी बाजार आहे. पुढच्या २ महिन्यांत फाऊंडेशन डाॅक परिसरात रंगरंगोटी करणं, मूर्त्या बसवणं, कलात्मक मार्गदर्शनासाठी चर्चासत्र आयोजित करून मुंबईकर कलाप्रेमींचं लक्ष वेधून घेणार आहे.


फाऊंडेशनची स्थापना कधी?

'द स्टार्ट फाऊंडेशन'ची स्थापना २०१४ मध्ये झाली. चित्रकार, मूर्तीकार, डिझायनर, फोटोग्राफर आणि फिल्ममेकर अशा ५ सदस्यांची टीम या स्थापनेमागे होती. आतापर्यंत फाऊंडेशनने दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद येथे फेस्टिव्हल आयोजित केलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या