गायक अभिजीत भट्टाचार्य पुन्हा वादात

गायक अभिजीत भट्टाचार्यने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. या वेळी त्याने पाकिस्तानमध्ये भारतीय नौसैनिक कुलभूषण जाधवला फाशीची शिक्षा सुनावण्याल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्याने ट्विट केले आहे की, जर पाकिस्तानात कुलभूषण जाधवची फाशी थांबवली गेली नाही, तर भारतात कोणी पाकिस्तानी दिसल्यास त्याला झाडाला लटकवून फाशी दिली जावी. यासह त्याने बॉलिवूडच्या तीन खानवरही ट्विटवॉर केला आहे.
तसं पहायला गेलं तर, अभिजितने यापूर्वीही ट्विटरवर आक्षेपार्ह विधानं करून वाद ओढवून घेतले आहेत. गेल्या वर्षी चेन्नई इन्फोसिसमध्ये काम करणऱ्या एका महिलेच्या हत्येला अभिजितने ‘लव्ह जिहाद’ ची उपमा दिली होती. त्यावरून त्याचा एका महिला पत्रकाराबरोबर वाद सुरू झाला आणि अभिजितने तिला आक्षेपार्ह भाषेत उत्तर दिलं होतं. त्यानंतर अनेकांनी त्या महिला पत्रकाराची बाजू घेत अभिजितवर कडाडून टीका केली होती. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अभिजितवर गुन्हा दाखल केला होता.
जेव्हा पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देण्यावरून वाद झाला, तेव्हाही अभिजितने सलमान खानला अप्रामाणिक भारतीय अशी उपमा देत फवाद खानची प्रशंसा केली होती. तर बॉलिवूडचा आघाडीचा निर्माता - दिग्दर्शक करण जोहर याला सौ. फवाद खान असे संबोधून त्याची खिल्ली उडवली होती.

Loading Comments