Advertisement

अक्षयसोबत अजय-रणवीर?

'सूर्यवंशी'मधील काही दृश्यांमध्ये अक्षयसोबत अजय आणि रणवीर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वी 'सिंबा'मध्येही रोहितनं हीच ट्रीक वापरत रणवीरसोबत अजयच्या चाहत्यांनाही 'सिंबा'शी जोडलं होतं.

अक्षयसोबत अजय-रणवीर?
SHARES

अक्षय कुमार सध्या 'सूर्यवंशी' या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. रोहितनं नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यावरून या चित्रपटात अक्षयच्या जोडीला अजय देवगण आणि रणवीर सिंगही दिसणार की काय, असा प्रश्न पडतो.


शूटिंगला सुरुवात

निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीनं मागील काही दिवसांपासून 'सूर्यवंशी' या आणखी एका धडाकेबाज चित्रपटावर लक्ष केंद्रित केलं आहे. करण जोहरही या चित्रपटाचा निर्माता असून, धर्मा प्रोडक्शनचाही या चित्रपटाच्या निर्मितीत हातभार लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पहिलं शेड्युल रोहितचं आवडतं आणि लकी लोकेशन असलेल्या गोव्यात पार पडलं. त्यानंतर आता मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.


पोलिस अधिकाऱ्यावर चित्रपट 

'सूर्यवंशी'च्या निमित्तानं 'सिंघम' आणि 'सिंबा'नंतर रोहित तिसऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर चित्रपट बनवत आहे. मुंबईत या चित्रपटाचं शूट सुरू झालं, तेव्हा अजय आणि रणवीरही उपस्थित होते. त्या दोघांसोबतचा अक्षय आणि करणचा फोटो रोहितनं 'अँड द युनिव्हर्स एक्सपांड्स... अवर गेम बिगीन्स' असं लिहीत शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजयनं 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न'चा, रणवीरनं 'सिंबा'चा, तर अक्षयनं 'सूर्यवंशी'चा क्लॅपबोर्ड हातात धरला आहे. तिघांच्या मागं रोहित आणि करण उभे आहेत.


वेगळं ट्विस्ट

आता हा फोटो केवळ गंमत म्हणून काढण्यात आला आहे की, यातही काही वेगळं ट्विस्ट आहे ते अद्याप समजलेलं नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'सूर्यवंशी'मधील काही दृश्यांमध्ये अक्षयसोबत अजय आणि रणवीर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वी 'सिंबा'मध्येही रोहितनं हीच ट्रीक वापरत रणवीरसोबत अजयच्या चाहत्यांनाही 'सिंबा'शी जोडलं होतं. 'सिंबा'मध्ये एका अडचणीच्या क्षणी अजय येतो आणि रणवीरसोबत गुंडांची यथेच्छ धुलाई करतो असं दाखवण्यात आलं होतं.


कतरीना अक्षयची नायिका

'सूर्यवंशी'मध्ये रोहित पुन्हा तीच जादू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील शूटसाठी रणवीर-अजयचं उपस्थित राहणं जरी याचे संकेत देत असले तरी सध्या तरी या तिघांना शूट करण्याची चिन्हे दिसत नाहीत. यदा कदाचित या चित्रपटात तिघे एकत्र दिसणार असले तरी या फोटोतील रणवीरची स्टाईल 'सिंबा'सारखी नसल्यानं त्याचं शूट तूर्तास तरी सुरू नसल्याचं जाणवतं. या चित्रपटाच्या निमित्तानं कतरीना कैफ प्रथमच रोहित शेट्टीच्या टिमसोबत काम करत असून, पुन्हा एकदा अक्षयची नायिका बनल्याचं पहायला मिळणार आहे.हेही वाचा -

आयुषमान-भूमी पुन्हा एकत्र

अबब! २००० कोटींचा चित्रपट
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा